न्यूयॉर्क : विक्रमी २५व्या ग्रँडस्लॅम जेतेपदाच्या शोधात असलेल्या सर्बियाच्या तारांकित नोव्हाक जोकोव्हिचने बुधवारी अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. मुलीच्या वाढदिवशी जोकोव्हिचने दमदार विजय नोंदवून अनोख्या शैलीत सेलिब्रेशनही केले. मात्र आता त्याच्यासमोर पुन्हा एकदा स्पेनचा कट्टर प्रतिस्पर्धी कार्लोस अल्कराझचे आव्हान उभे ठाकले आहे.
वर्षातील शेवटची ग्रँडस्लॅम स्पर्धा म्हणून यूएस ओपनला ओळखले जाते. हार्ड कोर्टवर खेळवण्यात येणाऱ्या या स्पर्धेला अन्य ग्रँडस्लॅम स्पर्धांच्या तुलनेत तितकेच महत्त्व असते. २०२४मध्ये पुरुष एकेरीत इटलीचा यानिक सिनर, तर महिलांमध्ये बेलारूसच्या आर्यना सबालेंकाने विजेतेपद मिळवले होते. आता यावेळी २०२५मध्ये कोण बाजी मारणार, हे पाहणे रंजक ठरेल.
पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यात सातव्या मानांकित जोकोव्हिचने अमेरिकेच्या चौथ्या मानांकित टेलर फ्रिट्झवर ६-३, ७-५, ३-६, ६-४ असा चार सेटमध्ये विजय मिळवला. ३८ वर्षीय जोकोव्हिचने कारकीर्दीत १४व्यांदा या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. याबाबतीत त्याने जिमी कॉनर्स यांची बरोबरी साधली. तसेच अमेरिकन ओपनमध्ये प्रथमच जोकोव्हिच व अल्कराझ आमनेसामने येतील. २०२५ या वर्षात आतापर्यंत जोकोव्हिच एकाही ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचलेला नाही. त्यामुळे यावेळी तरी तो अल्कराझचा अडसर दूर करणार का, याकडे लक्ष असेल. तसेच २०२५च्या सुरुवातीला झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये उपांत्यपूर्व फेरीत जोकोव्हिचने अल्कराझला नमवले होते. म्हणून अल्कराझही पराभवाचा वचपा घेण्यास आतुर असेल.
दुसऱ्या मानांकित अल्कराझने २०व्या मानांकित जिरी लेहेझ्काचा ६-४, ६-२, ६-४ असा सहज धुव्वा उडवला. अल्कराझने या वर्षात फ्रेंच ओपनचे जेतेपद मिळवले, तर विम्बल्डनमध्ये तो अंतिम फेरीत पराभूत झाला. आता शुक्रवारी मध्यरात्री जोकोव्हिच व अल्कराझ आमनेसामने येतील.
महिलांमध्ये गतविजेत्या तसेच अग्रमानांकित सबालेंकाला प्रतिस्पर्धी मार्केट वोंड्रोसोव्हाने दुखापतीमुळे माघार घेतल्याने पुढे चाल देण्यात आली. चौथ्या मानांकित जेसिका पेगुलाने बार्बोरा क्रेजिकोव्हाला ६-३, ६-३ अशी धूळ चारली. उपांत्य फेरीत याच दोघी आमनेसामने येतील. तिसऱ्या मानांकित कोको गॉफचे आव्हान मात्र संपुष्टात आले. इगा स्विआटेक, नाओमी ओसाका यांनी उपांत्यपूर्व फेरी गाठलेली असल्याने तेसुद्धा सबालेंकाला जेतेपदासाठी आव्हान देऊ शकतात.
भारताचा युकी दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत
भारताचा ३३ वर्षीय युकी भांब्री आणि त्याचा न्यूझीलंडचा सहकारी मिचेल व्हीनस यांनी पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. १४व्या मानांकित युकी-व्हीनस यांच्या जोडीने केव्हिन क्रेट्झ व टिम पुएट्झ या जर्मनीच्या १४व्या मानांकित जोडीला ६-४, ६-४ असे नेस्तनाबूत केले. १ तास व २३ मिनिटांत त्यांनी ही लढत जिंकली. आता गुरुवारी होणाऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात युकी-व्हीनससमोर राजीव राम आणि निकोला मेकटिक या ११व्या मानांकित जोडीचे आव्हान असेल. युकीच्या रुपात एकमेव भारतीय स्पर्धक या स्पर्धेत टिकून आहे. रोहन बोपण्णाला विदेशी खेळाडूच्या साथीने खेळताना दुसऱ्या फेरीतच पराभवाला सामोरे जावे लागले. तसेच ऋत्विक, श्रीराम बालाजी यांचेही आव्हान संपुष्टात आले आहे.