
न्यूयॉर्क : अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत शुक्रवारी भारताचा युकी भांब्री आणि त्याचा न्यूझीलंडचा सहकारी मिचेल व्हीनस यांना पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला. युकीच्या पराभवामुळे भारताचेही स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. महिला एकेरीत बेलारूसची अग्रमानांकित आर्यना सबालेंका व अमेरिकेची आठवी मानांकित अनिसिमोव्हा यांनी अंतिम फेरी गाठली.
वर्षातील शेवटची ग्रँडस्लॅम स्पर्धा म्हणून यूएस ओपनला ओळखले जाते. हार्ड कोर्टवर खेळवण्यात येणाऱ्या या स्पर्धेला अन्य ग्रँडस्लॅम स्पर्धांच्या तुलनेत तितकेच महत्त्व असते. २०२४मध्ये पुरुष एकेरीत इटलीचा यानिक सिनर, तर महिलांमध्ये बेलारूसच्या आर्यना सबालेंकाने विजेतेपद मिळवले होते. आता यावेळी २०२५मध्ये कोण बाजी मारणार, हे पाहणे रंजक ठरेल.
दरम्यान, पुरुष दुहेरीच्या उपांत्य सामन्यात नील कुपस्की व जो मानांकित जोडीने सॅल्सबरी या इंग्लंडच्या सहाव्या युकी-व्हीनसवर ६-७ (२-७), ७६ (७-५), ६-४ अशी तीन सेटमध्ये पिछाडीवरून मात केली. त्यामुळे युकीचे स्वप्न उद्ध्वस्त झाले. कारकीर्दीत प्रथमच युकीने एखाद्या ग्रँडस्लॅम स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली होती. आतापर्यंत एकेरीत तो दुसऱ्या फेरीपुढेही जाऊ शकलेला नव्हता. मात्र दुहेरीत त्याने प्रथमच अशी कामगिरी नोंदवलेली. भारताचा दुहेरीतील सर्वोत्तम टेनिसपटू असणाऱ्या युकीला विविध दुखापतीने सातत्याने छेडले. मात्र आता रोहन बोपण्णानंतर तो ग्रँडस्लॅम स्पर्धांमध्ये भारताचे नाव उज्ज्वल करत आहे.
महिला एकेरीत गतविजेत्या सबालेंकाने अमेरिकेच्या चौथ्या मानांकित जेसिका पेगुलाला ४-६, ६-३, ६-४ असे नमवले. आठव्या मानांकित अनिसिमोव्हाने जपानच्या २३व्या मानांकित नाओमी ओसाकाला ६-७ (४-७), ७-६ (७-३), ६-३ असे नेस्तनाबूत करत प्रथमच अंतिम फेरी गाठली. मुख्य म्हणजे सबालेंकाने सलग तिसऱ्यांदा या स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.
पुरुष एकेरीत उपांत्य फेरीत नोव्हाक जोकोव्हिच आणि कार्लोस अल्कराझ आमनेसामने येणार आहेत. तर दुसऱ्या उपांत्य लढतीत गतविजेत्या सिनरसमोर फेलिक्सचे कडवे आव्हान असेल. त्यामुळे यांच्यापैकी कोण अंतिम फेरीत पोहोचेल, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. रविवारी मध्यरात्री महिला एकेरीची, तर सोमवारी मध्यरात्री पुरुष एकेरीची अंतिम फेरी रंगणार आहे.