
न्यूयॉर्क : भारताच्या युकी भांब्रीने गुरुवारी अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली. न्यूझीलंडचा सहकारी मिचेल व्हीनसच्या साथीने खेळताना ३३ वर्षीय युकीने हा पराक्रम केला.
वर्षातील शेवटची ग्रँडस्लॅम स्पर्धा म्हणून यूएस ओपनला ओळखले जाते. हार्ड कोर्टवर खेळवण्यात येणाऱ्या या स्पर्धेला अन्य ग्रँडस्लॅम स्पर्धांच्या तुलनेत तितकेच महत्त्व असते. २०२४मध्ये पुरुष एकेरीत इटलीचा यानिक सिनर, तर महिलांमध्ये बेलारूसच्या आर्यना सबालेंकाने विजेतेपद मिळवले होते. आता यावेळी २०२५मध्ये कोण बाजी मारणार, हे पाहणे रंजक ठरेल.
दरम्यान, एकेरीत भारताच्या सर्व खेळाडूंचे आव्हान संपुष्टात आलेले असताना दुहेरीत युकी अद्याप स्पर्धेत टिकून आहे. पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यात युकी-व्हीनस यांच्या १४व्या मानांकित जोडीने राजीव राम व निकोला मेकटिक या ११व्या मानांकित जोडीचा ६-३, ६-७ (६-८), ६-३ असा तीन सेटमध्ये पराभव केला. कोर्ट नंबर १७वरील ही लढत त्यांनी दोन तासांच्या संघर्षानंतर जिंकली. आता शुक्रवारी होणाऱ्या उपांत्य लढतीत युकी-व्हीनससमोर नील कुपस्की व जो सॅल्सबरी या इंग्लंडच्या सहाव्या मानांकित जोडीचे आव्हान असेल.
कारकीर्दीत प्रथमच युकीने एखाद्या ग्रँडस्लॅम स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. आतापर्यंत एकेरीत तो दुसऱ्या फेरीपुढेही जाऊ शकलेला नव्हता. मात्र दुहेरीत त्याने प्रथमच अशी कामगिरी नोंदवली. भारताचा दुहेरीतील सर्वोत्तम टेनिसपटू असणाऱ्या युकीला विविध दुखापतीने सातत्याने छेडले. मात्र आता रोहन बोपण्णानंतर तो ग्रँडस्लॅम स्पर्धांमध्ये भारताचे नाव उज्ज्वल करत आहे.
दरम्यान, पुरुष एकेरीत इटलीच्या सिनरने उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले. त्याने १०व्या मानांकित लॉरेंझो मुसेट्टीला ६-१, ६-४, ६-२ अशी धूळ चारली. तसेच २५व्या मानांकित फेलिक्स ऑगरने डीमिनॉरवर ४-६, ७-६ (९-७), ७-५, ७-६ (७-४) अशी मात केली. त्यामुळे आता उपांत्य फेरीत हे दोघे आमनेसामने येतील. तर अन्य उपांत्य लढतीत चाहत्यांना सर्बियाचा तारांकित नोव्हाक जोकोव्हिच व स्पेनचा दुसरा मानांकित कार्लोस अल्कराझ यांच्यातील द्वंद्व पाहायला मिळेल.
महिला एकेरीत इगा स्विआटेकचे आव्हान संपुष्टात आले. तर २३व्या मानांकित नाओमी ओसाकाने उपांत्य फेरीत आगेकूच केली. तिची आता अमांडा अनिसिमोव्हाशी गाठ पडेल. शुक्रवारी महिला एकेरीच्या उपांत्य लढती रंगतील. शनिवारी पुरुषांचे सामने होतील.