

न्यूयॉर्क : फ्रान्सच्या गेल माँफिल्सने आपल्या ४०व्या वाढदिवशी अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत विजय मिळवत आपल्या कारकिर्दीचा प्रवास आणखी पुढे नेला आहे. तसेच जर्मनीला अलेक्झांडर झ्वेरेव्ह, पोलंडची इगा स्विआटेक यांनीही दुसरी फेरी गाठली.
मंगळवारी मध्यरात्री झालेल्या पुरुष एकेरीच्या सामन्यात माँफिल्सने अडॉल्फो डॅनिएल व्हॅलेजोचा २-६, ६-१, ६-२, ६-० असा पराभव केला. या विजयासह तो यूएस ओपनच्या इतिहासात सामना जिंकणारा जिमी कॉनर्सनंतरचा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. कॉनर्सने २ सप्टेंबर १९९२ रोजी आपल्या ४० व्या वाढदिवशी जेम ऑनसिन्सचा पराभव केला होता.
अमेरिकन ओपन या वर्षातील चौथ्या व अखेरच्या ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या मुख्य फेरीला रविवारपासून प्रारंभ झाला. यंदा या स्पर्धेचे १४६वे वर्ष सुरू आहे. २०२५मध्ये स्पेनचा कार्लोस अल्कराझ आणि बेलारूसची आर्यना सबालेंका यांनी अमेरिकन ओपनचे जेतेपद मिळवले होते. पुरुषांमध्ये इटलीच्या यॅनिक सिनरच्या अनुपस्थितीत जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव्हला, तर महिलांमध्ये सबालेंकाला अग्रमानांकन प्राप्त झाले आहे.
दरम्यान, पहिला सेट २-६ असा गमावल्यानंतर माँफिल्सने जोरदार पुनरागमन केले. चौथ्या सेटमध्ये १-० अशी आघाडी असताना त्याने हवेत उडी मारून मारलेला फोरहँड शॉट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. यानंतर लुईस आर्मस्ट्राँग स्टेडियममधील प्रेक्षकांनी उभे राहून त्याला दाद दिली आणि त्याच्यासाठी वाढदिवसाचे गाणे गायले. “माझ्या ४०व्या वाढदिवशी खेळणे आणि विजय मिळवणे हा अतिशय खास अनुभव आहे,” अशी प्रतिक्रिया माँफिल्सने दिली.
या वर्षाच्या शेवटी निवृत्त होण्याचा निर्णय घेतलेल्या माँफिल्सने यापूर्वी २०१६ मध्ये या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली होती. यंदाच्या स्पर्धेत त्याने आपली पत्नी एलिना स्वितोलिना हिच्यासोबत मिश्र दुहेरीत सहभागी होत उपांत्य फेरी गाठली आहे. २०२५ च्या विंबल्डनच्या पहिल्या फेरीनंतरचा त्याचा हा पहिलाच ग्रँड स्लॅम विजय ठरला.