

न्यूयॉर्क : सर्बियाचा ३९ वर्षीय तारांकित टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिचला रविवारी मध्यरात्री अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. तब्बल २० वर्षांनी जोकोव्हिच एखाद्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत सलामीलाच गारद झाला. अर्जेंटिनाच्या २५ वर्षीय मारिआनो नावोनने जोकोव्हिचला जबर धक्का दिला.
अमेरिकन ओपन या वर्षातील चौथ्या व अखेरच्या ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या मुख्य फेरीला रविवारपासून प्रारंभ झाला. यंदा या स्पर्धेचे १४६वे वर्ष सुरू आहे. २०२५मध्ये स्पेनचा कार्लोस अल्कराझ आणि बेलारूसची आर्यना सबालेंका यांनी अमेरिकन ओपनचे जेतेपद मिळवले होते. आता अल्कराझ चार महिन्यांच्या कालावधीनंतर या स्पर्धेत जेतेपद कायम राखण्यासाठी मैदानावर परतला आहे. पुरुषांमध्ये इटलीच्या यॅनिक सिनरच्या अनुपस्थितीत जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव्हला, तर महिलांमध्ये सबालेंकाला अग्रमानांकन प्राप्त झाले आहे.
दुसरीकडे २४ ग्रँडस्लॅम जेतेपदे नावावर असलेला जोकोव्हिच गेल्या २ वर्षांपासून ग्रँडस्लॅम विजेतेपदाचा रौप्यमहोत्सव साकार करण्यासाठी प्रयत्नशील होता. मात्र आर्थर ॲश स्टेडियमवरील पुरुष एकेरीच्या सलामीच्या लढतीत नावोनने जोकोव्हिचवर पाच सेटमध्ये ७-६ (७-५), ५-७, ४-६, ६-२, ६-१ अशी मात केली. तब्बल ४ तास, ३६ मिनिटांच्या संघर्षानंतर नावोनने ही लढत जिंकली. यापूर्वी २००६च्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये जोकोव्हिच पहिल्याच फेरीत पराभूत झाला होता. त्यानंतर कारकीर्दीतील असंख्य ग्रँडस्लॅम स्पर्धांमध्ये त्याच्यावर कधीच अशी वेळ ओढवली नाही. अमेरिकन ओपनच्या इतिहासात देखील जोकोव्हिच प्रथमच सलामीला गारद झाला. त्यामुळे जोकोव्हिचच्या कारकीर्दीचा शेवट जवळ आला आहे, हेच जणू स्पष्ट होते.
सामन्यादरम्यान ३९ वर्षीय जोकोव्हिच प्रकृतीशी झुंजताना दिसला. त्याला उलट्यांचा त्रास झाला तसेच डाव्या पायात गोळा आला. चौथ्या आणि पाचव्या सेटच्या दरम्यान वैद्यकीय उपचारादरम्यान डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या त्याने घेतल्या आणि पाठीवर मालिश करून घेतली. या संपूर्ण सामन्यात जोकोव्हिचने ७० अनफोर्स एरर्स (अनावश्यक चुका) केल्या. “माझ्यासाठी कोर्टावरील हा अनुभव अत्यंत त्रासदायक होता. या वर्षी बहुतांश सामन्यांमध्ये मला उलट्यांचा आणि शारीरिक अस्वास्थ्याचा सामना करावा लागत आहे. अखेरच्या टप्प्यात शरीर साथ देईनासे झाले आणि पाठीच्या व खांद्याच्या दुखापतीमुळे खेळणे कठीण झाले,” असे जोकोव्हिचने सामन्यानंतर सांगितले.
चौथ्या मानांकित जोकोव्हिचने पहिल्या सेटमध्ये सुरुवातीला ३-० आणि ४-१ अशी आघाडी घेतली होती; मात्र ती टिकवण्यात त्याला अपयश आले. त्याची पत्नी जेलेना प्रेक्षकांमधून चिंताग्रस्तपणे सामना पाहत होती. जोकोव्हिचने दुसरा आणि तिसरा सेट जिंकून पुनरागमनाचा प्रयत्न केला, परंतु नावोनने चौथ्या व पाचव्या सेटमध्ये वर्चस्व गाजवले. या वर्षाच्या सुरुवातीला पहिले एटीपी एकेरी विजेतेपद पटकावणाऱ्या नावोनने कारकीर्दीतील पहिला पाच सेट्सचा सामना जिंकत जोकोव्हिचविरुद्ध ऐतिहासिक विजय नोंदवला.
“टेनिसच्या इतिहासातील महान खेळाडूबरोबर या भव्य कोर्टवर खेळणे आणि जिंकणे हे माझे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे आहे,” अशी प्रतिक्रिया नावोनने दिली. या पराभवामुळे सिनसिनाटी स्पर्धेतील पहिल्या फेरीतील पराभवानंतर जोकोव्हिचची खराब कामगिरी कायम राहिली आहे.