अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा: बोपण्णा-सुतियादी जोडीची उपांत्य फेरीत धडक

भारताचा वरिष्ठ खेळाडू रोहन बोपण्णा आणि त्याची इंडोनेशियन सहकारी अल्दिला सुतियादी यांनी अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे.
अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा: बोपण्णा-सुतियादी जोडीची उपांत्य फेरीत धडक
@KhelNow/ X
Published on

न्यूयॉर्क : भारताचा वरिष्ठ खेळाडू रोहन बोपण्णा आणि त्याची इंडोनेशियन सहकारी अल्दिला सुतियादी यांनी अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे.

कोर्ट क्रमांक पाचवर झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात ४४ वर्षीय बोपण्णा व २९ वर्षीय सुतियादी या आठव्या मानांकित जोडीने मॅथ्यू एब्डन आणि बार्बोरा क्रेजिकोव्हा या चौथ्या मानांकित जोडीला ७-६ (७-४), २-६, १०-७ असे तीन सेटमध्ये पराभूत केले. बोपण्णा-सुतियादी यांनी १ तास, ३३ मिनिटांच्या संघर्षानंतर ही लढत जिंकली. पुरुष दुहेरीत बोपण्णा ऑस्ट्रेलियाच्या एब्डनच्याच साथीने खेळतो. तेथे मात्र त्यांचे आव्हान तिसऱ्या फेरीत संपुष्टात आले.

आता मिश्र दुहेरीत बुधवारी होणाऱ्या उपांत्य लढतीत बोपण्णा-सुतियादीसमोर टेलर टाऊनसेंड व डोनाल्ड यंग या अमेरिकन जोडीचे आव्हान असेल. दरम्यान, बोपण्णाने कारकीर्दीत दुसऱ्यांदाच अमेरिकन ओपनच्या मिश्र दुहेरीची उपांत्य फेरी गाठली. २०१५मध्ये चीनच्या चॅन जॅनसह बोपण्णाने अशी कामगिरी केली होती.

“प्रदीर्घ वर्षांच्या कारकीर्दीत दुसऱ्यांदाच मिश्र दुहेरीची उपांत्य फेरी गाठल्याने आनंदी आहे. आम्ही सुरेख खेळ केला. एब्डनच्या साथीने मी खेळत असल्याने त्याच्या कमकुवत बाजूंचा आढावा होता. आता एक दिवस विश्रांती करून उपांत्य फेरीत पुन्हा जोमाने खेळ करू,” असे बोपण्णा म्हणाला. बोपण्णाने २०२३मध्ये अमेरिकन ओपनच्या पुरुष दुहेरीची अंतिम फेरी गाठली होती. मात्र आता त्याला मिश्र दुहेरीत अशी कामगिरी करण्याची संधी आहे. त्यामुळे भारतीयांचे त्याच्याकडे लक्ष लागून आहे.

logo
marathi.freepressjournal.in