उस्मान ख्वाजाची निवृत्ती जाहीर; ॲॅशेस मालिकेतील पाचव्या कसोटीनंतर अलविदा

सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर रविवारपासून सुरू होणाऱ्या ॲॅशेस मालिकेतील पाचव्या कसोटी सामन्यानंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे.
उस्मान ख्वाजाची निवृत्ती जाहीर; ॲॅशेस मालिकेतील पाचव्या कसोटीनंतर अलविदा
Published on

सिडनी : ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज उस्मान ख्वाजा याने शुक्रवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर रविवारपासून सुरू होणाऱ्या ॲॅशेस मालिकेतील पाचव्या कसोटी सामन्यानंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे.

पाकिस्तानात जन्मलेला उस्मान ख्वाजा हा ऑस्ट्रेलियाकडून खेळणारा पहिला मुस्लीम क्रिकेटपटू ठरला आहे. आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील त्याचा हा ८८वा आणि अखेरचा कसोटी सामना असेल. शुक्रवारी सकाळी एससीजीवर झालेल्या पत्रकार परिषदेत उस्मान ख्वाजा याने निवृत्तीची घोषणा केली. यावेळी त्याचे आई-वडील, पत्नी रेचल आणि दोन्ही मुलेही उपस्थित होती. सिडनीतील मैदानावरच त्याने आपल्या प्रथम श्रेणी क्रिकेटला सुरुवात केली होती. ख्वाजाने आपल्या कारकीर्दीतील पहिले शतकही याच मैदानावर झळकावले होते. २०१८मध्ये इंग्लंडविरुद्ध त्याने सिडनी कसोटीत १७१ धावांची खेळी केली होती.

सिडनी मैदानावरच ख्वाजाला वयाच्या ३५व्या वर्षी आपल्या कारकीर्दीला नवी कलाटणी मिळाली होती. त्यावेळी त्याने इंग्लंडविरुद्ध दोन शतके फटकावली होती. त्यानंतर ख्वाजाने पुढील दोन वर्षांत सात शतकांची बरसात केली होती. या मोसमात पर्थ येथील पहिल्या ॲशेस कसोटी सामन्यात पाठीच्या दुखापतीमुळे त्याला सलामीला येता आले नव्हते. तसेच नंतरच्या ब्रिस्बेन कसोटीत तो दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. त्यामुळेच त्याच्या कारकीर्दीविषयी साशंकता व्यक्त केली जात होती. त्याने ॲडलेड कसोटीतही खेळण्यास नकार दिला होता, मात्र स्टीव्ह स्मिथच्या व्हर्टिगोच्या समस्येमुळे ख्वाजाला पुनरागमनाची संधी मिळाली. या सामन्यात त्याने पहिल्या डावात ८२ धावांची खेळी केली होती.

“पाकिस्तानात जन्मलो असल्यामुळे तसेच धर्माने मुस्लिम असल्यामुळे मला सुरुवातीपासूनच आतापर्यंत योग्य वागणूक मिळाली नाही. वेगळ्याच पद्धतीची वागणूक मला नेहमी मिळाली. पाठीचे दुखणे मी टाळू शकलो नाही. त्यानंतर प्रसारमाध्यमे आणि माजी क्रिकेटपटूंनी माझ्यावर ज्या पद्धतीने हल्ला केला, तो पाहून मी व्यथित झालो. वर्णद्वेषी आरोप होऊ लागल्यामुळे मी थांबण्याचा निर्णय घेतला,” असे ख्वाजाने पत्रकार परिषदेत सांगितले.

“अनेकांनी मी गोल्फ खेळत असल्याचे कारण देत माझ्या पाठीच्या दुखण्याला कारणीभूत ठरवले. मात्र अनेक जण सामन्याआधी गोल्फ खेळतात आणि जायबंदी होतात, याची अनेक उदाहरणे मी देऊ शकतो. त्याचबरोबर सामन्याच्या आदल्या रात्री १५ मोठे ग्लास बिअर पिऊन अनेक जण दुखापतग्रस्त होतात, याची बरीचशी उदाहरणे मी देऊ शकतो. पण त्याबद्दल कुणी एकही अवाक्षर काढत नाही. पण मी जायबंदी झालो, त्यावेळी प्रत्येकाने माझ्या विश्वासार्हतेबद्दल शंका उपस्थित केली. त्यामुळेच माझ्या कारकीर्दीचा अस्त जवळ आला आहे, हे माझ्या लक्षात आले,” अशी खंत त्याने व्यक्त केली.

१५ वर्षांची कारकीर्द, १८ शतके

उस्मान ख्वाजाची आंतरराष्ट्रीय कारकीर्द तब्बल १५ वर्षांची राहिली, मात्र हा प्रवास सोपा नव्हता. २०११ मध्ये कसोटी पदार्पण करणाऱ्या ख्वाजाला अनेकदा संघाबाहेर बसवण्यात आले. ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक वेळा वगळले गेलेल्या खेळाडूंमध्ये त्याची गणना होते. ८७ कसोटी सामन्यांत ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ख्वाजाने १६ शतकांसह ६२०६ धावा केल्या आहेत. ४० वनडेत त्याच्या नावावर २ शतकांसह १५५४ धावा जमा आहेत. ९ टी-२० सामन्यांत त्याला फक्त २४१ धावाच करता आल्या.

logo
marathi.freepressjournal.in