वैभवच्या कांस्यपदकाचा दिलासा: पाचव्या दिवशी महाराष्ट्राला अवघे एक पदक; गुणतालिकेत पाचव्या स्थानी घसरण

टेबल टेनिसमध्ये महाराष्ट्राला ३ ते ४ पदकांची अपेक्षा असून, गुरुवारी या मोहिमेला पुरुष खेळाडूंनी विजयी सुरुवात केली.
वैभवच्या कांस्यपदकाचा दिलासा: पाचव्या दिवशी महाराष्ट्राला अवघे एक पदक; गुणतालिकेत पाचव्या स्थानी घसरण

नवी दिल्ली : खेलो इंडिया पॅरा क्रीडा स्पर्धेतील पाचव्या दिवशी महाराष्ट्राला फक्त नेमबाजीतील वैभवराजे रणदिवेच्या कांस्यपदकाचा दिलासा मिळाला. दिवसभरातील एका पदकामुळे महाराष्ट्राची पदकतालिकेत पाचव्या स्थानी घसरण झाली आहे. महाराष्ट्राच्या खात्यात सध्या ८ सुवर्ण, ६ रौप्य, १२ कांस्य अशी २६ पदके जमा आहेत. हरयाणा ८८ पदकांसह अग्रस्थानी विराजमान असून त्यानंतर अनुक्रमे उत्तर प्रदेश, तमिळनाडू, गुजरात यांचा क्रमांक लागतो.

नेमबाजीत वैभवने १०९ मीटर एअर पिस्तूल एसएच १ प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली. वैभवने पात्रता फेरीत १४३ गुणांची कमाई करताना मुख्य फेरीत प्रवेश केला होता. मुख्य फेरीत त्याचे प्रयत्न चांगले होते. पण, हरयाणाच्या मनिष नरवाल आणि राजस्थानच्या रुद्रांक्ष खंडेलवाल यांच्या अचूकतेचा त्याला सामना करता आला नाही. वैभवराजला २११.६ गुणांसह कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

टेबल टेनिसमध्ये आगेकूच

टेबल टेनिसमध्ये महाराष्ट्राला ३ ते ४ पदकांची अपेक्षा असून, गुरुवारी या मोहिमेला पुरुष खेळाडूंनी विजयी सुरुवात केली. अशोक कुमार पाल, दत्त प्रसाद चौगुले आणि विशाल तांबे यांनी पहिल्या फेरीत एकतर्फी विजय मिळविला. महिला विभागात पृथ्वी बर्वेने आगेकूच केली. नयना कांबळे आणि उर्मिला पाल यांना पहिल्या फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. पुरुष गटात स्वप्निल शेळकेचा पराभव झाला.

logo
marathi.freepressjournal.in