'वैभव'शाली कामगिरीचे देशभरात गोडवे! १४ वर्षीय सूर्यवंशीने IPL मधील ऐतिहासिक शतकानंतर उलगडला संघर्षमय प्रवास

‘असे कधी झाले आहे का, की तुम्ही फलंदाजीला येत पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला आहे?’ हाच प्रश्न इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) १८वा हंगाम सुरू झाला, तेव्हा वैभव सूर्यवंशीने राजस्थान रॉयल्स संघातील एका खेळाडूला विचारला होता.
'वैभव'शाली कामगिरीचे देशभरात गोडवे! १४ वर्षीय सूर्यवंशीने IPL मधील ऐतिहासिक शतकानंतर उलगडला संघर्षमय प्रवास
Published on

क्रीडा प्रतिनिधी/मुंबई

‘असे कधी झाले आहे का, की तुम्ही फलंदाजीला येत पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला आहे?’ हाच प्रश्न इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) १८वा हंगाम सुरू झाला, तेव्हा वैभव सूर्यवंशीने राजस्थान रॉयल्स संघातील एका खेळाडूला विचारला होता. राजस्थान संघाच्या ट्विटर अकाऊंटवर अजूनही ती चित्रफित आहे. त्यानंतर १९ एप्रिल रोजी याच १४ वर्षीय वैभवने पदार्पणाची संधी मिळाल्यावर कारकीर्दीतील पहिल्या आयपीएल चेंडूला सीमापार धाडले. हे कमी म्हणून की काय सोमवार, २८ एप्रिल रोजी त्याने गुजरात टायटन्सविरुद्ध अवघ्या ३५ चेंडूंत ऐतिहासिक शतक झळकावताना वैभवशाली कामगिरी नोंदवली. त्यामुळे मंगळवारीसुद्धा संपूर्ण भारत देश सूर्यवंशीच्या याच वैभवशाली पराक्रमाचे गोडवे गात होता.

बिहारच्या समस्तिपूर जिल्ह्यात जन्मलेल्या वैभवविषयी आयपीएलच्या १८व्या हंगामासाठी झालेल्या लिलावापासूनच चर्चा सुरू होती. राजस्थानने त्याला १.१० कोटी रुपयांमध्ये खरेदी केले. मात्र अवघ्या १४ वर्षांचा असलेल्या वैभवला इतकी रक्कम देणे गरजेचे होते का, असा प्रश्नही त्यावेळी उपस्थित झाला. तसेच राजस्थानच्या संघात आधीच ४-५ भारतीय फलंदाज असल्याने वैभवला लवकर संधी मिळणार नाही, हे पक्के होते. वैभवचे सुदैव म्हणावे की राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन जायबंदी झाला व त्याला पदार्पणाची संधी मिळाली. सुरुवातीच्या दोन लढतींमध्ये वैभवने चुणूक दाखवली.

मात्र सोमवारचा दिवस वैभवच्या कारकीर्दीला किंबहुना आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. राजस्थानला स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सामना जिंकणे अनिवार्य होते. तसेच त्यांना २१० धावांचा पाठलाग करताना गुणतालिकेत अग्रस्थानी असलेल्या गुजरातच्या अनुभवी गोलंदाजांचा मुकाबला करायचा होता. वैभवने मात्र पहिल्याच चेंडूपासून आक्रमण सुरू केले. १७ चेंडूंत अर्धशतक झळकावल्यावरही तो थांबला नाही. ३५ चेंडूंतच शतकाची वेस ओलांडून आयपीएलच्या इतिहासातील सर्वात युवा शतकवीर ठरण्याचा मान त्याने मिळवला. तसेच भारतीय खेळाडूतर्फे सर्वात वेगवान आयपीएल शतकही झळकावले. २००८मध्ये राजस्थानकडूनच खेळताना युसूफ पठाणने ३७ चेंडूंत शतक साकारले होते. त्यामुळे सध्या भारतीय क्रिकेटमध्ये फक्त वैभवची चर्चा सुरू आहे.

संस्मरणीय खेळीनंतर वैभव काय म्हणाला?

“माझ्या आई-वडिलांनी घेतलेल्या मेहनतीमुळेच मी इथवर पोहोचलो. माझी आई फक्त तीन तास झोपायची. वडिलांनीही माझ्यावर लक्ष देता यावे, यासाठी काम सोडले. माझा मोठा भाऊ त्यांचे काम पाहायचा. वडील सातत्याने मला म्हणायचे की मेहनत करत रहा, एक दिवस यश मिळेलच,” असे वैभव म्हणाला.

“राजस्थान संघासाठी आयोजित करण्यात आलेल्या सराव शिबिरात मी गेलो होतो. त्यावेळी जुबिन आणि विक्रम राठोड सरांनी मला खेळताना पाहिले. त्यावेळी त्यांनी सांगितले होते, की आम्ही कदाचित तुला लिलावात खरेदी करू, असे आश्वासन दिले होते. लिलावात मग राजस्थानचा सदस्य झाल्यावर मला त्यांनी सर्वप्रथम राहुल द्रविड यांच्याशी संपर्क साधून दिला,” असेही वैभवने सांगितले.

“१४ वर्षांच्या खेळाडूला याहून आणखी काय हवे. सुरुवातीच्या काही सामन्यांत संघाची कामगिरी चांगली झाली नाही. तसेच मला संधी मिळत नव्हती. मात्र मी एकदाही निराश झालो नाही. तसेच संघातील प्रत्येक सदस्य आणि राहुल सर सातत्याने माझ्याशी संवाद साधायचे. मी समोर कोणता गोलंदाज आहे, याचा कधीच विचार करत नाही. त्याने टाकलेला चेंडू मला माझ्या तावडीत आहे असे वाटले, तर मी पहिल्या चेंडूवरही षटकार लगावतो. रणजी आणि अन्य देशांतर्गत स्पर्धेत मी असे केले आहे,” असेही वैभवने नमूद केले.

“आता फक्त कारकीर्दीची सुरुवात झाली आहे. भारतासाठी खेळण्याचे स्वप्न आहेच. मात्र तूर्तास आयपीएलमध्ये राजस्थान संघाला अधिकाधिक कसे विजय मिळवून देता येतील, या गोष्टीवर माझे लक्ष आहे,” असे सांगून वैभव आजूबाजूच्या चाहत्यांना स्वाक्षरी देत संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये परतला.

आतापर्यंत ‘या’ बक्षिसांचा वर्षाव

- राजस्थान संघाचे मालक रणजीत बर्ठाकूर यांनी वैभवला नवी कोरी मर्सिडीज बेन्झ कार भेट म्हणून दिली. सामन्यानंतर रणजीत वैभवला चावी सोपवताना दिसले.

- बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही वैभवच्या कामगिरीची दखल घेत त्याला १० लाखांचे पारितोषिक जाहीर केले आहे.

- याव्यतिरिक्त, बूस्ट या एनर्जी ड्रिंक कंपनीनेही वैभवला जाहिरातीची ऑफर दिली आहे. मात्र वैभव आयपीएलमध्ये व्यस्त असल्याने त्याने अद्याप हा प्रस्ताव स्वीकारलेला नाही, असे समजते.

२०१७ मध्ये वैभव त्याचे वडील संजीव सूर्यवंशी यांच्यासह पुणे येथे आयपीएल सामना पाहायला आला होता. त्यावेळी वैभवचे वय अवघे सहा वर्ष होते. तसेच त्यावेळी तो रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाला पाठिंबा दर्शवत होता. मंगळवारी सगळीकडे हे छायाचित्र पसरले होते.

दिग्गजांची मते

वैभवचा निर्भिड दृष्टिकोन, बॅटची गती आणि चेंडूचा टप्पा ओळखण्याचे कौशल्य अविश्वसनीय आहे. तसेच तो चेंडूमागे ज्याप्रकारे वजनाचा तोल सांभाळतो, तेही वाखाणण्याजोगे आहे. १४व्या वर्षी ३८ चेंडूंत १०१ धावा फटकावणे कौतुकास्पद आहे. वेल प्लेड.

- सचिन तेंडुलकर

माझा आयपीएलमधील भारतीयातर्फे सर्वात वेगवान शतक झळकावण्याचा विक्रम मोडीत काढल्याबद्दल वैभव तुझे फार अभिनंदन. तुसुद्धा राजस्थानसाठीच ही कामगिरी केल्याचा अभिमान आहे. भावी आयुष्यासाठी शुभेच्छा.

- युसूफ पठाण

वयाच्या १४व्या वर्षी तुम्ही काय करत होता? हा पठ्ठ्या विश्वातील दर्जेदार गोलंदाजांविरुद्ध नेत्रदीपक खेळी साकारत आहे. भारताची युवा पिढी नीडर आहे. वैभव सूर्यवंशी हे नाव लक्षात ठेवा.

- युवराज सिंग

ज‌वळपास साडेतीन दशकांपूर्वी १७ वर्षांच्या आणि उंचीतही कमी असलेल्या सचिन तेंडुलकर नावाच्या मुलाने मला बाऊन्सरवर स्टेडियमबाहेर षटकार लगावला होता. त्यानंतर मी कधीच तशाप्रकारचे ‘टॅलेंट’ असलेला खेळाडू पाहिला नव्हता. मात्र हा १४ वर्षाचा वैभव ज्या सहजतेने वेगवान गोलंदाजांना षटकार मारत होता, ते अविश्वसनीय होते. मी त्याचे अतिकौतुक करणार नाही. मात्र भारताने या खेळाडूवर खास लक्ष ठेवावे. असे खेळाडू क्वचितच पाहायला मिळतात.

- इयान बिशप

logo
marathi.freepressjournal.in