
इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर सोमवारी १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचे शतकी वादळ घोंघावले. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात युवा शतकवीर ठरताना वैभवने अवघ्या ३८ चेंडूंत १०१ धावांची तुफानी खेळी साकारली. फक्त ३५ चेंडूत त्याने आयपीएलमधील आपले पहिले-वहिले शतक पूर्ण केले. आयपीएलच्या इतिहासातील दुसरं सर्वात जलद शतक ठोकण्याचा विक्रम त्याने आपल्या नावे केला. याशिवाय या ऐतिहासिक खेळीदरम्यान वैभवने अनेक विक्रमांना गवसणी घातली.
सर्वात लहान वयाचा टी२० शतकवीर : वैभव टी-२० क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा सर्वात लहान खेळाडू (१४ वर्ष ३२ दिवस) ठरला. याआधी हा विक्रम भारताच्याच विजय झोल (१८ वर्षे आणि ११८ दिवस) याच्या नावावर होता.
मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये सर्वात तरुण शतकवीर : वैभवने पाकिस्तानच्या जहूर इलाहीचा विक्रमही मोडला आहे. जहूर इलाहीने १९८६ मध्ये स्थानिक लिस्ट ए सामन्यात १५ वर्षे आणि २०९ दिवसांच्या वयात शतक झळकावले होते.
सर्वात जलद टी२० शतक झळकावणारा भारतीय खेळाडू : वैभवने भारत आणि राजस्थान रॉयल्सचा माजी अष्टपैलू युसुफ पठाणचा विक्रम देखील मोडला आहे. युसुफने २०१० मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध ३७ चेंडूंमध्ये शतक झळकावले होते, तर वैभवने केवळ ३५ चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले.
आयपीएलमध्ये सर्वात लहान वयात अर्धशतक झळकावणारा खेळाडू : वैभवने आयपीएलमध्ये सर्वात कमी वयात अर्धशतक झळकावण्याचा विक्रम केला आहे. याआधी हा विक्रम रियान परागच्या (१७ वर्षे आणि १७५ दिवस) नावावर होता.
आयपीएल डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम : वैभवने एका आयपीएल डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रमाचीही बरोबरी केली. त्याने एका खेळीत ११ षटकार ठोकले. २०१० मध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना मुरली विजयनेही राजस्थान रॉयल्सविरुद्ध ११ षटकार ठोकले होते.
सर्वात लवकर पहिले आयपीएल शतक करणारा भारतीय : वैभवने केवळ तीन डावातच आपले पहिले आयपीएल शतक साजरे केले आहे, जे भारतीय खेळाडूंमध्ये सर्वात जलद आहे. पहिल्या शतकासाठी मनीष पांडे, पॉल वल्थाटी आणि प्रियांश आर्य यांनी प्रत्येकी चार डाव घेतले होते.
चौकार-षटकारांद्वारे सर्वाधिक धावा करणारा खेळाडू : वैभवच्या १०१ पैकी तब्बल ९३.०६ टक्के धावा चौकार-षटकारांद्वारे आल्या. त्याने १०१ पैकी ९४ धावा सात चौकार आणि ११ षटकारांच्या मदतीने केल्या. याआधीचा विक्रम राजस्थान रॉयल्सच्या यशस्वी जैस्वालच्या नावावर होता, ज्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध १२४ धावांपैकी ९०.३२ टक्के धावा चौकार-षटकारांद्वारे फटकावल्या होत्या.
दरम्यान, वैभवच्या आक्रमक खेळीमुळे राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सचा ८ गडी आणि २५ चेंडू राखून फडशा पाडला. गुजरातने दिलेले २१० धावांचे लक्ष्य राजस्थानने अवघ्या १५.५ षटकांत गाठले.