पंधरावं वरीस 'वैभव'शाली विश्वविक्रमांचं! सूर्यवंशीच्या ऐतिहासिक द्विशतकामुळे भारत-अ उपांत्य फेरीत; २५० धावांचे लक्ष्य अवघ्या १४.२ षटकांत साध्य

युवा आशिया चषक क्रिकेट स्पर्धा : क्रिकेटच्या पटलावर नवा तारा म्हणून आधीच उदसाय आलेल्या वैभव सूर्यवंशीचा आणखी एक विश्वविक्रमी प्रताप मंगळवारी सर्वांना पाहायला मिळाला. १५ वर्षीय डावखुरा फलंदाज वैभवने अवघ्या ५३ चेंडूंत २०४ धावांची ऐतिहासिक द्विशतकी खेळी साकारली.
पंधरावं वरीस 'वैभव'शाली विश्वविक्रमांचं! सूर्यवंशीच्या ऐतिहासिक द्विशतकामुळे भारत-अ उपांत्य फेरीत; २५० धावांचे लक्ष्य अवघ्या १४.२ षटकांत साध्य
पंधरावं वरीस 'वैभव'शाली विश्वविक्रमांचं! सूर्यवंशीच्या ऐतिहासिक द्विशतकामुळे भारत-अ उपांत्य फेरीत; २५० धावांचे लक्ष्य अवघ्या १४.२ षटकांत साध्य
Published on: 

दोहा : क्रिकेटच्या पटलावर नवा तारा म्हणून आधीच उदसाय आलेल्या वैभव सूर्यवंशीचा आणखी एक विश्वविक्रमी प्रताप मंगळवारी सर्वांना पाहायला मिळाला. १५ वर्षीय डावखुरा फलंदाज वैभवने अवघ्या ५३ चेंडूंत २०४ धावांची ऐतिहासिक द्विशतकी खेळी साकारली. या खेळीदरम्यान त्याने लिस्ट-ए क्रिकेटमधील सर्वात वेगवान शतक, दीडशतक व द्विशतकाचा विक्रम नोंदवला.

वैभवच्या वादळी खेळीच्या बळावर भारत-अ संघाने कतार येथे सुरू असलेल्या रायझिंग स्टार्स आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत संयुक्त अरब अमिरातीचा (यूएई) ७ गडी व २१४ चेंडू राखून फडशा पाडला. मुख्य म्हणजे भारताने २५० धावांचे लक्ष्य अवघ्या १४.२ षटकांत म्हणजेच ८६ चेंडूंत गाठले. यांपैकी २०४ धावा या वैभवने फटकावल्या. वैभवने द्विशतकी खेळीत ७ चौकार व तब्बल २८ षटकार ठोकले. १६८ धावा त्याने षटकारानेच वसूल केल्या. हासुद्धा एक विक्रमच. त्याने तब्बल ३८४.९० च्या स्ट्राइक रेटने धावांचा पाऊस पाडला. भारताने याबरोबरच ब-गटातून दुसऱ्या स्थानासह उपांत्य फेरीत धडक मारली असून आता त्यांची गुरुवारी श्रीलंकेशी गाठ पडेल. दुसऱ्या उपांत्य सामन्यात पाकिस्तान व बांगलादेश आमनेसामने येतील.

वैभवने १६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले, मग २८ चेंडूंत शतकाची वेस ओलांडली. त्यानंतर ४० चेंडूंत दीडशतक साकारल्यावर ५२व्या चेंडूवर वैभवने द्विशतक झळकावले. ५३व्या चेंडूवर तो बाद झाला. वैभवची खेळी इतकी थक्क करणारी होती की त्याविषयी विविध विशेषणे शोधणेही कठीण जात आहे. लिस्ट-ए क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान अर्धशतकाचा विक्रमही वैभवच्याच (११ चेंडूंत) नावावर आहे. फक्त तो विक्रम त्याने जून २०२६मध्ये श्रीलंका-अ संघाविरुद्ध केला होता.

हरप्रीतचे शतक

दोहा (कतार) येथे रायझिंग स्टार्स आशिया चषक स्पर्धा सुरू असून या स्पर्धेत तिलक वर्मा भारत-अ संघाचे नेतृत्व करत आहे. नेपाळचा धुव्वा उडवल्यानंतर भारताला गेल्या लढतीत पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला. त्यामुळे यूएईविरुद्ध भारताला मोठ्या फरकाने विजय मिळवणे गरजेचे होते. यूएईकडून हरप्रीत सिंग भाटियाने १४४ चेंडूंत १३० धावांची शानदार खेळी केली. त्याच्या खेळीमुळे यूएईने ८ बाद २४९ धावा उभारल्या. हरप्रीतने १२ चौकार आणि ४ षटकार मारले. भारताकडून अर्शद खानने ४३ धावांत ४ विकेट घेतल्या. ३५ वर्षीय हरप्रीतने यापूर्वी भारतात मध्य प्रदेश आणि छत्तीसगडचे प्रतिनिधित्व केले आहे. यंदा यूएईचे नागरिकत्व मिळाल्यानंतर त्याने एप्रिलमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

वैभवचे वादळ

लक्ष्याचा पाठलाग करताना वैभव आणि अभिषेक शर्मा यांच्या जोडीने मात्र धुमाकूळ घातला. विशेषत: वैभवने १६ चेंडूंतच अर्धशतकाची वेस ओलांडून चौथ्या षटकात संघाच्याही ५० धावा फलकावर लावल्या. अभिषेक ५ चेंडूंत १२ धावांवर बाद झाला. या दोघांनी ६८ धावांची सलामी नोंदवली. वैभवने मात्र फटकेबाजी सुरू ठेवली. त्याने अवघ्या २८ चेंडूंत शतक पूर्ण करत लिस्ट-ए क्रिकेटमधील सर्वात वेगवान शतकाचा विक्रम आपल्या नावावर केला. पहिल्या दोन सामन्यांत लवकर बाद झाल्यानंतर वैभवने या सामन्यात जोरदार पुनरागमन केले. फिरकीपटू असो किंवा वेगवान, त्याने प्रत्येक गोलंदाजाची धुलाई केली.

प्रभसिमरन सिंग अवघ्या ३ धावांवर बाद झाला. मात्र दुसऱ्या विकेटसाठी त्याने वैभवसह ४० धावांची भर घातली. वैभव तुफान खेळत असल्याने यावेळी चौथ्या क्रमांकावर रिंकू सिंगला बढती देण्यात आली. या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी १३७ धावांची झटपट भागीदारी रचली. वैभवने ४०व्या चेंडूवर दीडशतक झळकावले. २८ षटकारांची आतषबाजी केल्यानंतर इब्रार अहमदच्या गोलंदाजीवर वैभवने मैदानाच्या दिशेने चौकार ठोकत ५२ चेंडूंत द्विशतकाचा ऐतिहासिक टप्पा गाठला. लिस्ट-ए क्रिकेटमधील हे सर्वात वेगवान द्विशतक ठरले. अखेर ५३ चेंडूंत २०४ धावा करून तो बाद झाला. बसील हमीदने त्याला १३व्या षटकात बाद केले. त्यानंतर रिंकू (१९ चेंडूंत नाबाद २७) व कुमार कुशाग्र (५ चेंडूंत नाबाद १) यांनी १४.२ षटकांत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. रिंकूने विजयी षटकार लगावला.

पहिल्या दोन सामन्यांत मला धावा करता आल्या नव्हत्या. खेळपट्टीचा अंदाज घेतल्यानंतर गोलंदाजांसाठी फारशी मदत नसल्याचे जाणवले. त्यामुळे मी माझ्या नैसर्गिक खेळावर विश्वास ठेवण्याचा निर्णय घेतला. - वैभव सूर्यवंशी

विक्रमांचा धावता आढावा

* लिस्ट-ए क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान द्विशतकाचा विक्रम न्यूझीलंडच्या चाड बोवेसच्या नावावर होता. त्याने २०२४ मध्ये फोर्ड ट्रॉफी स्पर्धेत कँटरबरीकडून ओटागोविरुद्ध १०३ चेंडूंत द्विशतक झळकावले होते. मात्र, वैभवने अवघ्या ५२ चेंडूंत द्विशतक पूर्ण करत हा विक्रम तब्बल ५१ चेंडूंनी मागे टाकला. या यादीत इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूक, ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज ट्रॅव्हिस हेड आणि तमिळनाडूचा फलंदाज नारायण जगदीशन यांचाही समावेश आहे. या तिघांनी प्रत्येकी ११४ चेंडूंत द्विशतकाचा टप्पा गाठला होता.

* वैभवने केवळ द्विशतकाचाच नव्हे, तर लिस्ट-ए क्रिकेटमधील सर्वात वेगवान शतकाचाही विक्रम मोडला. त्याने अवघ्या २८ चेंडूंत शतक पूर्ण केले. यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या जेक फ्रेझर-मॅकगर्कने २०२३ मध्ये २९ चेंडूंत शतक झळकावले होते. या यादीत दक्षिण आफ्रिकेचा महान फलंदाज एबी डिव्हिलियर्स तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने २०१५ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ३१ चेंडूंत शतक पूर्ण केले होते.

* वैभवने एका डावात सर्वाधिक २८ षटकार लगावण्याचा विक्रम केला. यापूर्वी वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या डार्सी शॉर्टने २०१८मध्ये क्वीन्सलँडविरुद्ध २३ षटकार ठोकले होते.

* वैभवने १५ वर्षे, २४२ दिवस इतके वय असताना लिस्ट-ए क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा सर्वात युवा फलंदाज ठरण्याचा मान मिळवला. यापूर्वी मुंबईकर यशस्वी जैस्वालने २०१९मध्ये विजय हजारे स्पर्धेत झारखंडविरुद्ध वयाच्या १७व्या वर्षी द्विशतक साकारले होते.

वैभवची खेळी म्हणजे जणू तांडव

“त्याच्या कामगिरीबद्दल काय बोलावे, शब्दच सुचत नाहीत. हे जणू काही एक जबरदस्त तांडव होते. त्याने ज्या प्रकारे फलंदाजी केली, त्यावरून पहिल्या पाच षटकांतच सामन्याचा निकाल लागला होता असे वाटते. पाच षटकांत आम्ही १०० धावा पूर्ण केल्या होत्या. त्यानंतरही त्याने ज्या प्रकारे फटकेबाजी सुरू ठेवली, ते पाहणे खूपच नेत्रदीपक होते. खरं तर, तो किती लांब षटकार मारू शकतो, हे सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे, जेव्हा तो आक्रमक फलंदाजी करत होता, तेव्हा सगळे जण जणू म्हणत होते, अजून मारा, अजून मारा! प्रत्येकजण याचा आनंद घेत होता, असे कर्णधार तिलक वर्मा म्हणाला.

संक्षिप्त धावफलक

यूएई : ५० षटकांत ८ बाद २४९ (हरप्रीत सिंग १३०, बसील हमीद नाबाद ३६; अर्शद खान ४/४३) पराभूत वि.

भारत : १४.२ षटकांत ३ बाद २५४ (वैभव सूर्यवंशी २०४, रिंकू सिंग नाबाद २७; इब्रार अहमद १/७१)

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)