

मुंबई : भारताचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याला त्याच्या नैसर्गिक शैलीत खेळण्याची मुभा दिली पाहिजे. वयाच्या अवघ्या १५व्या वर्षी त्याने आपल्या फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून, तो भारतीय क्रिकेटच्या भविष्यासाठी चांगली गुंतवणूक ठरेल, असे मत श्रीलंकेचा महान क्रिकेटपटू सनथ जयसूर्या याने व्यक्त केले.
मुंबई रॉयल्स आणि महाराष्ट्र सुपर स्ट्रायकर्स या इंडियन सॉफ्टबॉल क्रिकेट लीगमधील संघांच्या जर्सी अनावरण कार्यक्रमावेळी तो बोलत होता. जयसूर्या म्हणाला, "वैभवला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. मात्र, तो भारताच्या भविष्यासाठी एक चांगला खेळाडू आहे. त्याला त्याच्या नैसर्गिक शैलीत खेळू द्या आणि त्याचे काम करू द्या. भारतीय क्रिकेटसाठी ही एक चांगली गुंतवणूक ठरेल."
भारताचा आणखी एक युवा फलंदाज अभिषेक शर्मा याचेही जयसूर्याने कौतुक केले. “भारतात अनेक प्रतिभावान क्रिकेटपटू आहेत आणि ते चांगली कामगिरी करत आहेत. अभिषेकही सध्या उत्तम क्रिकेट खेळत आहे. अनेक भारतीय खेळाडू सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत. त्यांच्यात गुणवत्ता आहे."