

अहमदाबाद : राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा १५ वर्षीय डावखुरा फलंदाज वैभव सूर्यवंशीने रविवारी एकामागून एक पारितोषिकांची कमाई केली. वैभवने स्पर्धेत सर्वाधिक धावा करत ऑरेंज कॅप, स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू, सुपर स्ट्रायकर, इमर्जिंग प्लेयर, कार आणि एकंदर ५५ लाखांची रक्कम रविवारी अंतिम सामन्यानंतर कमावली.
राजस्थानकडून यंदाच्या हंगामात धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या वैभवला गतवर्षी १.१० कोटी रुपयांत लिलावात खरेदी करण्यात आले होते. त्यामुळे ती रक्कम तर त्याला मिळेलच. त्याशिवाय वैभवने स्पर्धेत सर्वाधिक ७७६ धावा केल्या. त्यामुळे ऑरेंज कॅपसह १० लाख त्याला मिळाले. इमर्जिंग प्लेयर म्हणजेच स्पर्धेतील सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडू ठरल्याने त्याला ट्रॉफीसह आणखी १० लाख देण्यात आले. स्पर्धेत सर्वाधिक ७२ षटकार लगावल्याने त्याला सुपर सिक्सेस पुरस्कारासह आणखी १० लाख देण्यात आले.
तसेच सर्वाधिक स्ट्राइक रेटसह फटकेबाजी केल्याने तो टाटा सियारा कारचा मानकरी ठरला. तसेच १० लाख व चषकही त्याला देण्यात आला. हे सर्व कमी म्हणून की काय स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा मानकरीदेखील वैभवच ठरला. त्यामुळे आणखी १५ लाख वैभवला देण्यात आले. एकूणच वैभवने ५५ लाख, कार अशी बरीच कमाई केली.
“यंदाच्या हंगामात दडपणाखाली कामगिरी कशी उंचवावी, हे मी शिकलो. हा हंगाम बरेच काही शिकवणारा ठरला. संघाला अंतिम फेरीपर्यंत घेऊन जाता आले नाही, याचे शल्य आहे,” असे वैभव यावेळी म्हणाला.
वैभवने पटकावलेल्या पुरस्कारांची यादी
स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू : चषक आणि १५ लाख
ऑरेंज कॅप (स्पर्धेत सर्वाधिक धावा) : १० लाख
इमर्जिंग प्लेयर (स्पर्धेतील सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडू) : १० लाख
सुपर स्ट्रायकर (सर्वोत्तम स्ट्राइक रेट) : १० लाख आणि टाटा कार
सुपर सिक्सेस (सर्वाधिक षटकार) : १० लाख