माजी क्रिकेटपटूंकडून कोहलीला मोलाचे सल्ले

इंग्लंडविरुद्धच्या निर्णायक कसोटीत तो अपयशी ठरला. त्यामुळे त्याच्या संघातील स्थानाविषयी अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
माजी क्रिकेटपटूंकडून कोहलीला मोलाचे सल्ले
Published on

सध्या कारकीर्दीतील कठीण कालखंडातून मार्गक्रमण करणाऱ्या विराट कोहलीवर अनेक जण टीका करत आहेत. तर काही त्याला मोलाचे सल्ले देतानाच दमदार पुनरागमन करण्यासाठी शुभेच्छासुद्धा देत आहेत. यामध्ये आता सुनील गावस्कर, मायकल वॉन या माजी क्रिकेटपटूंचीसुद्धा भर पडली आहे.

कोहलीने २०१९नंतर एकही शतक झळकावलेले नाही. नुकताच इंग्लंडविरुद्धच्या निर्णायक कसोटीत तो अपयशी ठरला. त्यामुळे त्याच्या संघातील स्थानाविषयी अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “इंग्लंडमधील खेळपट्ट्यांवर तुम्ही जितक्या उशिराने चेंडू खेळता, तितके सोपे जाते. परंतु कोहली या कसोटीत घाई करताना दिसला. त्यामुळे अनेकदा स्विंग होणाऱ्या चेंडूंवर तो बाचकला. २०१८मध्ये कोहली अशाप्रकारे खेळत नव्हता,” असे गावस्कर म्हणाले. गेल्या काही वर्षांपासून तो त्या लयीत नसल्यामुळे त्याच्याकडून चुकांची पुनरावृत्ती होत असावी, असेही गावस्कर यांनी नमूद केले.

इंग्लंडचा माजी कर्णधार वॉनने कोहलीला थेट तीन महिले विश्रांती घेण्याचे सुचवले आहे. “कोहलीमध्ये एकूण २० ‌वर्षे खेळण्याची क्षमता आहे. परंतु सध्याचा त्याचा फॉर्म पाहता त्याची कारकीर्द लवकर संपुष्टात येण्याची भीती आहे. त्यामुळे कोहलीने किमान तीन महिने क्रिकेटपासून दूर राहावे. कुटुंबीयांसह वेळ घालवून त्याने आत्मपरीक्षण केल्यास तो नक्कीच पूर्वीप्रमाणे धावांचे शिखर रचेल,” असे वॉन म्हणाला.

logo
marathi.freepressjournal.in