
गेल्या १२ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रोहित शर्माच्या शिलेदारांनी रविवारी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेचे संस्मरणीय जेतेपद मिळवले. एकंदर तिसऱ्यांदा भारताने ही स्पर्धा जिंकण्याची कामगिरी केली. या स्पर्धेत आपल्या 'मिस्ट्री' फिरकी गोलंदाजीमुळे युवा खेळाडू वरुण चक्रवर्तीने अनेकांचे लक्ष्य वेधले. आता अंतिम सामन्यानंतर चक्रवर्ती पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, पण यावेळी त्याच्या गोलंदाजीमुळे नव्हे तर त्याने केलेल्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे.
अबरारने मारला होता भारतीयांना टोला
चॅम्पियन्स ट्रॉफीत भारत-पाकिस्तान सामन्यात शुभमन गिलला बाद केल्यानंतर पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज अबरार अहमदने केलेले सेलिब्रेशन भारतीयांना आवडले नव्हते. त्यावरुन त्याला भारतीय नेटकऱ्यांनी ट्रोल करीत मोठी टीका केली होती. त्यानंतर अबरारने हातात चहाचा कप पकडलेला स्वतःचा एक फोटो पोस्ट केला आणि कॅप्शनमध्ये FANTASTIC आणि TEA शब्दांचा वापर केला होता. या शब्दांचा वापर पाकिस्तानच्या सोशल मीडिया वापरकर्त्यांकडून भारतीयांना चिडवण्यासाठी केला जातो.
भारतीयांना चिडवण्याचं कारण काय?
२०१९ मध्ये भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी पाकिस्तानचे एफ-१६ फायटेर जेट पाडले होते. मात्र, या संघर्षात त्यांचे मिग २१ विमान दुर्घटनाग्रस्त झाले आणि ते सीमापार पाकिस्तानच्या ताब्यात पडले. अभिनंन यांना पाकने ताब्यात घेतल्यानंतर त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओमध्ये चहा पिताना अभिनंदन इंग्रजीत Tea Is Fantastic असे म्हणाले होते. तेव्हापासून पाकिस्तानी नेटकरी भारतीयांना चिडवण्यासाठी याचा वापर करतात.
काय आहे वरुण चक्रवर्तीची पोस्ट?
एका हातात चहाचा कप आणि दुसऱ्या हातात चॅम्पियन्स कप...अशा पोजमध्ये वरुण चक्रवर्तीने फोटो पोस्ट केला आहे. फोटोसोबत "या कपची चव चाखायला बरंच अंतर कापायला लागलं" अशी कॅप्शन लिहिली असून अखेरीस डोळे मारणाऱ्या दोन इमोजींचाही वापर केला आहे. त्यामुळे वरुणने आपल्या पोस्टद्वारे पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज अबरार अहमदला ट्रोल केल्याचा दावा अनेक नेटकरी करीत आहेत.
वरुणने अबरारवरच निशाणा साधल्याचं म्हटलं जात आहे. नेटकरी वरुणच्या पोस्टखाली अनेक प्रतिक्रिया देत आहेत.