वॉशिंग्टन : अमेरिकेची अनुभवी टेनिसपटू व्हीनस विल्यम्सने बुधवारी वयाच्या ४५व्या वर्षी टेनिस कोर्टावर झोकात पुनरागमन केले. तिने वॉशिंग्टन ओपन टेनिस स्पर्धेच्या राऊंड ऑफ ३२ सामन्यात दमदार विजय नोंदवला. तसेच एखाद्या टेनिस स्पर्धेत विजय मिळवणारी ती दुसऱ्या क्रमांकाची सर्वात वयस्कर टेनिसपटू ठरली.
महिला टेनिसपटूंमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारी व्हीनस ही सेरेनाची बहीण. ४३ वर्षीय सेरेनासुद्धा टेनिसपासून दूर असली तरी व्हीनसने मात्र मार्च २०२४नंतर प्रथमच व्यावसायिक पातळीवरील एखादी लढत खेळण्याचा पराक्रम केला. तिने पहिल्या फेरीत अमेरिकेच्याच २३ वर्षीय पेट्रोन स्टर्न्सला ६-३, ६-४ अशी धूळ चारली. माजी टेनिसपटू मार्टिना नवरातिलोव्हा यांनी २००४मध्ये वयाच्या ४७व्या वर्षी महिला एकेरीतील एखादा टेनिस सामना जिंकला होता. त्यानंतर आता दुसऱ्या स्थानी व्हीनसचा क्रमांक आहे. व्हीनस या स्पर्धेत महिला दुहेरीतही सहभागी होणार आहे. त्यामुळे ती कुठवर मजल मारणार, हे पाहणे रंजक ठरेल.
“टेनिसपासून दूर राहणे माझ्यासाठी फार क्लेशदायक होते. माझ्यात अजूनही टेनिस खेळण्याची क्षमता आहे, याची मला जाणीव होती. त्याच आशेने मी आजारी असताना अथवा दुखापतीतून सावरत असताना सकारात्मक राहू शकली. आपण ठरवले, तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते,” असे व्हीनस म्हणाली.
एकेकाळी जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या व्हीनसने ऑगस्ट २०२३मध्ये अखेरची लढत जिंकली होती. त्यानंतर मात्र विविध दुखापती आणि कुटुंबाची जबाबदारी यांसारख्या विविध कारणांमुळे व्हीनस टेनिसपासून दूर राहिली. १९९४मध्ये व्हीनसने आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली होती.
व्हीनसच्या नावावर एकूण ४९ जेतेपदे आहेत. यामध्ये ७ ग्रँडस्लॅम जेतेपदांचा समावेश आहे. व्हीनसने पाच वेळा विम्बल्डनचे, तर दोन वेळा अमेरिकन ओपनचे जेतेपद मिळवले. तसेच महिला दुहेरीत तिने चारही ग्रँडस्लॅम स्पर्धांचे किमान एक वेळा जेतेपद मिळवण्याची किमया साधली आहे. मिश्र दुहेरीतही तिच्या नावावर दोन ग्रँडस्लॅम जेतेपदे आहेत.
व्हीनसने ऑलिम्पिकमध्येही छाप पाडलेली आहे. तिने एकेरीत एकदा ऑलिम्पिक सुवर्ण पटकावलेले आहे, तर दुहेरीत तिच्या नावावर तब्बल तीन ऑलिम्पिक सुवर्णपदके जमा आहेत. त्यामुळेच व्हीनसचे पुनरागमन सध्या चर्चेत असून याद्वारे युवा पिढीलाही प्रेरणा मिळणार आहे. व्हीनस कोणत्याही ग्रँडस्लॅम स्पर्धेत मात्र सहभागी होणार नाही.