ज्येष्ठ क्रीडा पत्रकार हेमंत जोगदेव यांचे निधन

राज्य परिवहन मंडळामध्ये नोकरी करीत असतानाच क्रीडा क्षेत्रासाठी मराठी वृत्तपत्रांमध्ये स्वतंत्र पान सुरू करण्यामध्ये जोगदेव यांचा मोठा वाटा होता.
ज्येष्ठ क्रीडा पत्रकार हेमंत जोगदेव यांचे निधन

पुणे : ज्येष्ठ क्रीडा पत्रकार व कबड्डी संघटक हेमंत जोगदेव यांचे वृद्धापकाळाने गुरुवारी येथे निधन झाले. निधन समयी ते ९६ वर्षांचे होते. त्यांच्या मागे विवाहित कन्या व चिरंजीव असा परिवार आहे.

राज्य परिवहन मंडळामध्ये नोकरी करीत असतानाच क्रीडा क्षेत्रासाठी मराठी वृत्तपत्रांमध्ये स्वतंत्र पान सुरू करण्यामध्ये जोगदेव यांचा मोठा वाटा होता. १९६५ ते १९९७ या कालावधीमध्ये त्यांनी दैनिक केसरी मध्ये मुख्य क्रीडा प्रतिनिधी म्हणून काम केले. ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांसाठी पहिली अधिस्वीकृती (ॲक्रिडेशन) मिळवणारे ते पहिले मराठी क्रीडा पत्रकार होते. म्युनिक, मॉन्ट्रियल, मॉस्को, लॉस एंजेलिस, बार्सिलोना येथील ऑलिम्पिक, आशियाई, क्रिकेट विश्वचषक (१९८७ व १९९५), हॉकी विश्वचषक (लाहोर १९९०) इत्यादी स्पर्धांमध्ये दैनिक केसरीचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी वार्तांकन केले. त्यांनी क्रीडाविषयक १० पुस्तके लिहिली आहेत.

logo
marathi.freepressjournal.in