
फ्रान्समधील रोलँड गॅरोस स्टेडियममध्ये फ्रेंच ओपन टेनिस २०२२ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रविवारी स्पेनचा दिग्गज टेनिसपटू राफेल नदालने नॉर्वेजियन खेळाडू कॅस्पर रूडला सरळ सेट्समध्ये ६-३, ६-३, ६-० असे नमवून विजेतेपद पटकाविले.कॅस्पर हा नदालला आपला गुरू मानून सरावदेखील नदालच्या अकादमीमध्येच करीत असल्याने गुरू-शिष्याच्या या लढाईत अखेर गुरूने बाजी मारली. नदालने आपल्या २२ व्या ग्रँडस्लॅम विजेतेपदावर नाव कोरले. फ्रेंच ओपन टेनिसचे त्याचे हे १४ वे विजेतेपद ठरले.
नदालने दोन तास आणि १८ मिनिटांत विजयावर शिक्कामोतर्ब केले. छत्तीस वर्षीय नदालने पहिला सेट ६-३ ने जिंकून सुरुवातीपासूनच वर्चस्व निर्माण करीत तेवीस वर्षीय रूडवर दबाव आणला. त्यातून रूड मग सावरू शकला नाही. नदालचा खेळ उंचावत राहिला. नदालच्या दर्जात्कम खेळापुढे रूडचा प्रतिकार निष्प्रभ ठरला.
दुसऱ्या सेटच्या सुरुवातीला रूड ३-१ ने आघाडीवर होता; परंतु लागोपाठ पाच गेम जिंकून नदालने हा सेट आपल्या नावावर केला. तिसऱ्या सेटमध्ये रूडला एकही गेम जिंकता आला नाही. ग्रँडस्लॅमच्या अंतिम सामन्यात पोहोचणारा रूड पहिला नॉर्वेजियन खेळाडू ठरला होता.
नदालने फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या विक्रमी १४ व्या अंतिम फेरीत धडक मारली होती. उपांत्य फेरीतील दुसऱ्या सेटदरम्यान नदालचा जर्मन प्रतिस्पर्धी अलेक्झांडर झ्वेरेव्हने उजव्या पायाच्या घोट्याला दुखापत झाल्यामुळे माघार घेतल्यामुळे नदाल आपोआपच अंतिम फेरीत पाहोचला होता.