
नवी दिल्ली : आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेसाठी भारतीय संघ सज्ज झाला असून कर्णधार रोहित शर्मा, स्टार फलंदाज विराट कोहली आणि दिग्गज अष्टपैलू रवींद्र जडेजा यांच्यासाठी ही अखेरची आयसीसी ट्रॉफी स्पर्धा होऊ शकते, असे वक्तव्य माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा याने केले आहे.
पुढील आयसीसीची स्पर्धा दोन वर्षांनी होणार आहे. या कालावधीत संघात बरेच बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांचे संघातील भवितव्य निश्चित नसल्याचे आकाश चोप्राला वाटते.
युवा खेळाडूंवर नजरा
एकदिवसीय संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी मिळाल्याने शुभमन गिलसाठी ही मोठी संधी आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये जवळपास ६१ च्या सरासरीने धावा करणारा हा युवा फलंदाज चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत कशी कामगिरी करतो? याकडे चाहत्यांच्या नजरा आहेत. बुमराच्या अनुपस्थितीमुळे अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा यांना स्वत:ला सिद्ध करण्याची संधी आहे. भारताच्या वेगवान गोलंदाजीची धुरा या दुकलीच्या खांद्यावर आहे.
भारतीय संघ दुबईला रवाना
कर्णधार रोहित शर्मा, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, उपकर्णधार शुभमन गिल, स्टार फलंदाज विराट कोहली यांच्यासह भारताचा संपूर्ण संघ शनिवारी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी दुबईमार्गे रवाना झाला. पांढऱ्या रंगाची टी-शर्ट्स आणि काळ्या रंगाची ट्रॅक परिधान केलेला रोहित शर्मा आपल्या कारमधून बाहेर पडला आणि संघसहकाऱ्यांच्या दिशेने गेला. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर चाहत्यांकडून रोहित भाई आणि रोहित सर अशा घोषणा देण्यात आल्या.
गतवर्षी टी-२० विश्वचषक स्पर्धा जिंकल्यानंतर आणखी एक आयसीसीची ट्रॉफी जिंकण्यासाठी भारताचा संघ सज्ज झाला आहे. स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराच्या अनुपस्थितीत भारतीय संघ २० फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्धच्या लढतीने स्पर्धेला सुरुवात करणार आहे. त्यानंतर २३ फेब्रुवारीला दुबईमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या हायव्होल्टेज लढत होणार आहे. २ मार्चला टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्ध गटातील अखेरचा सामना खेळणार आहे.
रोहित शर्मा विजेतेपद मिळवून देणार का?
आयसीसीची आगामी स्पर्धा २०२६ मध्ये टी-२० विश्वचषकाच्या रूपाने होणार आहे. मात्र टी-२० फॉरमॅटमधून रोहित, विराट आणि या तिघांनीही निवृत्ती स्वीकारली आहे. आगामी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा २०२७ मध्ये होणार आहे. या कालावधीत संघात बरेच बदल घडलेले असतील. त्यामुळे या तीन दिग्गज खेळाडूंसाठी ही आयसीसीची अखेरची स्पर्धा असू शकते असे चोप्रा म्हणाला. चोप्रा पुढे म्हणाले की, या तिघांची भारतीय संघातील निवड केवळ त्यांच्या खेळण्याच्या क्षमतेवर अवलंबून राहणार नाही, तर संघाला त्यांची गरज आहे का, यावर ठरेल, असे चोप्रा म्हणाले. भारत २० फेब्रुवारी रोजी दुबई येथे बांगलादेशविरुद्ध आपली चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. या स्पर्धेत कोहली, रोहित आणि जडेजा यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
९ भाषांमध्ये समालोचन
भारतात क्रिकेटचा चाहतावर्ग मोठा आहे. भारतातील विविध राज्यांत वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात. भारतीय चाहत्यांना आपापल्या भाषेत चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचा आनंद घेता यावा यासाठी भारतातील ९ वेगवेगळ्या भाषांमध्ये या सामन्यांचे थेट प्रक्षेपण आणि समालोचन केले जाणार आहे. त्यामध्ये इंग्रजी, हिंदी, मराठी, हरयाणवी, बंगाली, भोजपुरी, तमिळ, तेलगू आणि कन्नड अशा एकूण ९ भाषांचा समावेश आहे. त्यामुळे या ९ भाषांतील चाहते आपल्या मातृभाषेत चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचा आनंद घेऊ शकणार आहेत.