

जयपूर : कर्णधार आणि ‘लॉर्ड’ शार्दूल ठाकूरचा दबदबा सोमवारी विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेत पाहायला मिळाला. आघाडीच्या चार फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवत शार्दूलने मुंबईला छत्तीसगढवर मात केली. सलग तिसऱ्या विजयासह मुंबईने एलिट क गटात १२ गुणांसह अग्रस्थान पटकावले आहे. गोव्यानेही तीन विजयांसह १२ गुणांनिशी दुसऱ्या क्रमांकावर मजल मारली आहे.
जयपुरीया विद्यालय मैदानावर रंगलेल्या या सामन्यात शार्दूल ठाकूरची भेदक गोलंदाजी आणि शम्स मुलानीच्या अप्रतिम फिरकी माऱ्यासमोर छत्तीसगढला अवघ्या १४२ धावांवर रोखण्यात मुंबईला यश मिळाले. त्यानंतर अंगरिक्ष रघुवंशी (नाबाद ६८) आणि सिद्धेश लाड (नाबाद ४८) यांच्या सुरेख फलंदाजीच्या जोरावर मुंबईने हे आव्हान २४ षटकांत फक्त एका विकेट्सच्या मोबदल्यात पार केले.
कर्णधार शार्दूलने नाणेफेक जिंकल्यानंतर छत्तीसगढला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. आघाडीच्या चार फलंदाजांना बाद करत शार्दूलने छत्तीसगढची अवस्था पहिल्या ५ षटकांतच ४ बाद १० अशी केली होती. पहिल्या अर्ध्या तासाच्या खेळात ‘लॉर्ड’ शार्दूलचा वरचष्मा पाहायला मिळाला. पहिल्या षटकांतील दुसऱ्याच चेंडूवर शार्दूलने अनुज तिवारीला (०) पहिल्या स्लिपमध्ये सर्फराझ खानकरवी झेलबाद केले. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर मयांक वर्माच्या (३) यष्ट्या उद्ध्वस्त करत छत्तीसगढला सुरुवातीलाच दोन हादरे दिले. तिसऱ्या षटकांत आशुतोष सिंग (६) आणि पाचव्या षटकांत सुजित देसाई (१) याला बाद करत शार्दूलने छत्तीसगढला संकटात आणले.
त्यानंतर छत्तीसगढचा कर्णधार अमनदीप खरे आणि अजय मंडल यांनी पाचव्या विकेटसाठी १०५ धावांची भागीदारी रचत आपल्या संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र फिरकीपटू शम्स मुलानीच्या फिरकी माऱ्यापुढे छत्तीसगढचा डाव पुन्हा एकदा गडगडला. मुलानीने तळाच्या फलंदाजांना एकापाठोपाठ माघारी पाठवत मुंबईला या सामन्यात वरचढ स्थितीत आणून ठेवले. मुंबईने अवघ्या २७ धावा देत शेवटचे सहा बळी मिळवत छत्तीसगढचा डाव ३८.१ षटकांत १४२ धावांत संपुष्टात आणला.
छत्तीसगढचे माफक १४३ धावांचे आव्हान पार करताना, कोलकाताचा स्टार खेळाडू अंगरिक्ष रघुवंशी याने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा अवलंबत छत्तीसगढच्या गोलंदाजांवर प्रहार करण्यास सुरुवात केली. सलामीवीर इशान मुलचंदानी (१९) याला फारसा सूर गवसला नसला तरी रघुवंशी आणि सिद्धेश लाड यांनी १०२ धावांची अभेद्य भागी रचत मुंबईला विजय मिळवून दिला. रघुवंशीने ६६ चेंडूंत ६ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ६८ धावा फटकावल्या. त्याला सुरेख साथ देत सिद्धेश लाडने ४२ चेंडूंत ६ चौकार आणि १ षटकारासह नाबाद ४८ धावांची खेळी केली.
श्रेय फिजिओंना देतो - रघुवंशी
उत्तराखंडविरुद्धच्या गेल्या सामन्यात दुखापतीला सामोरे जावे लागल्यानंतर मला फिजिओ सुरेश सरांनी खूप मदत केली. बॅडपॅचमध्ये असतानाही आता चांगली खेळी केल्याने आनंद वाटत आहे. गेल्या सामन्यात १४१ धावांची भागीदारी रचताना माझ्या धावा ४० एवढ्याच होत्या. कारण एकेरी-दुहेरी धावांवर भर देत मी रोहित शर्माला जास्तीत जास्त स्ट्राइकवर आणण्याचा प्रयत्न करत होतो. रोहितला समोरून खेळताना पाहून एखाद्या चित्रपटाचा आस्वाद घ्यावा, असा अनुभव येत होता. आता मी माझ्या यष्टीरक्षणात सुधारणा करण्याबरोबरच फलंदाजीतही योगदान देण्याचा प्रयत्न करत आहे, असे १९ वर्षांखालील विश्वचषक विजेता कर्णधार अंगरिक्ष रघुवंशीने सांगितले.