'भारत श्री’ विजू पेणकर यांना जीवनगौरव; विचारे प्रतिष्ठानचे क्रीडा पुरस्कार जाहीर

कोरोनामुळे २०२२ आणि २०२३चे पुरस्कार दिले गेले नव्हते, त्या २ वर्षांच्या पुरस्कारांची घोषणा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय विचारे यांनी केली.
'भारत श्री’ विजू पेणकर यांना जीवनगौरव; विचारे प्रतिष्ठानचे क्रीडा पुरस्कार जाहीर

कै. मनोहर विचारे प्रतिष्ठान, मुंबई यांच्यातर्फे क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना मराठी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. कोरोनामुळे २०२२ आणि २०२३चे पुरस्कार दिले गेले नव्हते, त्या दोन वर्षांच्या पुरस्कारांची घोषणा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय विचारे यांनी केली. बुजुर्ग राष्ट्रीय कबड्डीपटू आणि महाराष्ट्राचे पहिले ‘भारत श्री’ किताबाचे मानकरी असलेल्या विजू पेणकर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

इतर पुरस्कार विजेत्यांमध्ये ठाण्याच्या महिला क्रिकेट पंच, सामनाधिकारी वर्षा नागरे, विश्वविजेता मल्लखांबपटू दीपक शिंदे, विश्वविजेता शरीरसौष्ठवपटू सागर कातुर्डे, ज्येष्ठ खो-खो क्रीडा संघटक मनोहर साळवी, आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू मिलिंद पूर्णपात्रे, ज्येष्ठ कबड्डीपटू-प्रशिक्षक शशिकांत कोरगांवकर, लीला कोरगांवकर, आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टर मनाली साळवी आदींचा समावेश आहे. आदर्श संस्था म्हणून ठाण्याच्या प्रख्यात श्री मावळी मंडळाचा गौरव करण्यात येणार आहे. येत्या १९ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता सीएसटी येथील मुंबई मराठी पत्रकार संघाच्या लोकमान्य सभागृहात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.

भारतीय खेळ प्राधिकरणाचे प्रादेशिक निर्देशक पांडुरंग चाटे (आयआरएस), भारतीय खो-खो संघाचे प्रशिक्षक नरेंद्र कुंदर आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू रघुनंदन गोखले यांच्या हस्ते विजेत्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. स्व. बाळकृष्ण तुकाराम साळवी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

पुरस्कार विजेत्यांची यादी

भारत श्री किताब विजेते विजू पेणकर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. याव्यतिरिक्त दीपक शिंदे (आंतरराष्ट्रीय मल्लखांबपटू), वर्षा नागरे (महिला क्रिकेट पंच आणि सामनाधिकारी), मार्क धर्माई (आंतरराष्ट्रीय दिव्यांग खेळाडू), सागर कातुर्डे (आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू), मनोहर साळवी (खो-खो क्रीडा संघटक), शशिकांत कोरगांवकर, लीला कोरगांवकर (ज्येष्ठ कबड्डीपटू, प्रशिक्षक), मिलिंद पूर्णपात्रे (आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू), मनाली साळवी (आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टर), वृषाली देवधर (आंतरराष्ट्रीय महिला बुद्धिबळपटू), दिया चितळे (आंतरराष्ट्रीय युवा टेबलटेनिसपटू), श्वेता खिळे (राष्ट्रीय तायक्वांदो खेळाडू), मोहन बने (ज्येष्ठ छायाचित्रकार), राजेश दळवी (कार्यक्रम अधिकारी दूरदर्शन सह्याद्री वाहिनी), श्री मावळी मंडळ, ठाणे (आदर्श संस्था) यांचाही गौरव करण्यात येईल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in