जेतेपद भारतीयांना समर्पित! शानदार सोहळ्यात गुकेशला जगज्जेतेपदाचा करंडक प्रदान
सिंगापूर : बुद्धिबळ विश्वातील सर्वात युवा जगज्जेता ठरलेल्या डी. गुकेशला शुक्रवारी शानदार सोहळ्यात जेतेपदाचा करंडक प्रदान करण्यात आला. यावेळी गुकेशने सर्वांचे आभार मानले. तसेच जागतिक क्रमवारीत अग्रस्थान मिळवण्यासह यापुढेही देशासाठी आंतरराष्ट्रीय जेतेपदे जिंकत राहण्याची इच्छा व्यक्त केली.
चेन्नईच्या १८ वर्षीय गुकेशने गुरुवारी जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढतीत चीनच्या डिंग लिरेनला १४व्या फेरीत धूळ चारली. गुकेश हा विश्वनाथन आनंदनंतर भारताकडून जगज्जेतेपद मिळवणारा दुसरा खेळाडू ठरला. तसेच विश्वविजेता ठरणारा तो स्पर्धेतील सर्वात युवा खेळाडूही ठरला. गुकेशने गॅरी कास्पारोव्ह आणि मॅग्नस कार्लसन यांचा विक्रम मोडीत काढला. दिवसभरात नातेवाईकांसह क्रीडा क्षेत्रातील विविध मान्यवर व राजकीय मंडळींशी संवाद साधल्यानंतर शुक्रवारी गुकेशला करंडक देण्यात आला. त्यापूर्वी फोटोशूटमध्ये गुकेशने ट्रॉफीला स्पर्धसुद्धा केला नाही. फिडेचे अध्यक्ष अर्काडी द्वोरकोव्हिच यांनी गुकेशला करंडक प्रदान केला.
“मी गेल्या काही तासांपासून स्वप्न जगत आहे. बुद्धिबळ खेळण्यास सुरुवात केली, तेव्हापासून देशासाठी जागतिक विजेतेपद मिळवण्याचे माझे स्वप्न पूर्ण झाले. आईवडील, प्रशिक्षक अन्य सहकारी आणि चाहत्यांच्या पाठिंब्यामुळे हे शक्य झाले. मात्र प्रवास आता खऱ्या अर्थाने सुरू झाला आहे. त्यामुळे यापुढेही कामगिरीत सातत्य राखेन,” असे गुकेश यावेळी म्हणाला.
समारोप झाल्यानंतर गुकेशचे हस्ताक्षर घेण्यासाठी चाहत्यांनी अफाट गर्दी केली होती. मात्र गुकेशने प्रत्येकाला हस्ताक्षर देण्यासह छायाचित्रही काढले. तसेच सभागृहातील सर्वांशी तो आदराने व नम्रतेनेच बोलताना आढळला. या जेतेपदासह गुकेश २०२६च्या जागतिक स्पर्धेसही पात्र ठरला आहे.
तमिळनाडू शासनाकडून ५ कोटींचे बक्षीस
तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी गुकेशला ५ कोटींचे बक्षीस जाहीर केले आहे. गुकेश हा तमिळनाडू राज्यातील चेन्नई शहराचा आहे. “गुकेशचे जागतिक यशासाठी अभिनंदन. तमिळनाडू शासनाकडून त्याला ५ कोटींचे बक्षीस जाहीर करताना प्रचंड आनंद होत आहे. पुढील कारकीर्दीसाठी त्याला आणखी शुभेच्छा,” असे ट्वीट स्टॅलिन यांनी केले. जागतिक स्पर्धा जिंकणाऱ्या बुद्धिबळपटूला करंडकासह १८ कोटींचे पारितोषिक फिडेकडून देण्यात येते आहे. त्यामध्ये आता आणखी भर पडली आहे. केंद्र शासनही लवकरच गुकेशचा सत्कार करणार आहे.
फडणवीस यांच्याकडून गुकेशला निमंत्रण
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी गुकेशशी दूरध्वनीद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी गुकेशचे अभिनंदन करतानाच त्याला भारतात परतल्यावर महाराष्ट्रात येण्याची विनंती केली. महाराष्ट्र शासनातर्फे तुझा सत्कार करायचा आहे, असे फडणवीस गुकेशला म्हणाले. त्यामुळे आता गुकेश भारतात कधी परतणार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागून आहे.
पॅडी अप्टन यांचा मोलाचा वाटा
२०११च्या क्रिकेट विश्वचषकात भारतीय संघासह असलेल्या पॅडी अप्टन यांचा गुकेशच्या वाटचालीत मोलाचा वाटा होता. गेल्या काही महिन्यांपासून अप्टन हे गुकेशचे मानसशास्त्रज्ञ होते. गुकेशची झोप, त्याचा आहार, व्यायाम आणि दिवसभरातील वेळेचे योग्य व्यवस्थापन करून देण्यात अप्टन यांनी मोलाची भूमिका बजावली. गुकेशनेही विजयानंतर त्यांचे आभार मानले. अप्टन यांनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघालाही मार्गदर्शन केले होते. हॉकी संघाने पॅरिसमध्ये कांस्यपदक जिंकले. खेळाडूची मानसिक तंदुरुस्ती योग्य राखण्यात अप्टन पटाईत आहेत.