पर्थमध्ये भारताची विजयी पताका! बुमराच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियावर पहिल्या कसोटीत २९५ धावांनी वर्चस्व; मालिकेत १-० अशी आघाडी

Perth Test India's Historic Win: जसप्रीत बुमराच्या नेतृत्वाखाली भारतीय गोलंदाजांनी दमदार कामगिरी नोंदवली. त्यामुळे पर्थच्या ओप्टस स्टेडियमवर सोमवारी भारतीय संघाने विजयी पताका फडकावली. पहिल्या कसोटी सामन्यात भारताने यजमान ऑस्ट्रेलियाचा तब्बल २९५ धावांनी फडशा पाडून पाच लढतींच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
पर्थमध्ये भारताची विजयी पताका! बुमराच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियावर पहिल्या कसोटीत २९५ धावांनी वर्चस्व; मालिकेत १-० अशी आघाडी
Published on

पर्थ : जसप्रीत बुमराच्या नेतृत्वाखाली भारतीय गोलंदाजांनी दमदार कामगिरी नोंदवली. त्यामुळे पर्थच्या ओप्टस स्टेडियमवर सोमवारी भारतीय संघाने विजयी पताका फडकावली. पहिल्या कसोटी सामन्यात भारताने यजमान ऑस्ट्रेलियाचा तब्बल २९५ धावांनी फडशा पाडून पाच लढतींच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

बॉर्डर-गावस्कर करंडकासाठी उभय संघांत ही मालिका खेळवण्यात येत आहे. त्यातील पहिल्या कसोटीत भारताने दिलेले ५३४ धावांच्या डोंगराइतक्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव सोमवारी चौथ्या दिवशी ५८.४ षटकांत २३८ धावांत संपुष्टात आला. बुमरा व मोहम्मद सिराज या वेगवान जोडीने प्रत्येकी तीन बळी मिळवले. त्यांना वॉशिंग्टन सुंदरने २, तर हर्षित राणा व नितीश रेड्डी यांनी प्रत्येकी १ बळी मिळवून उत्तम साथ दिली. पहिल्या डावातील फलंदाजांच्या अपयशानंतर गोलंदाजांनी ज्याप्रकारे भारताला पुनरागमन करून दिले, ते कौतुकास्पद होते. त्यामुळे लढतीत एकूण ८ बळी मिळवणाऱ्या बुमरालाच सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. आता ६ डिसेंबरपासून उभय संघांत ॲडलेड येथे गुलाबी चेंडूने प्रकाशझोतात (डे-नाईट) दुसरी कसोटी खेळवण्यात येईल. त्यापूर्वी ३० नोव्हेंबरपासून भारत एकादश विरुद्ध ऑस्ट्रेलिया इलेव्हन यांच्यात २ दिवसीय गुलाबी चेंडूनेच सराव लढत खेळवण्यात येणार आहे.

यापूर्वी पर्थमधील वॅका येथे सामने खेळवण्यात यायचे. मात्र २०२२पासून पर्थमधील ओप्टस स्टेडियमला कसोटीसाठी प्राधान्य देण्यात आले. येथे ऑस्ट्रेलियाने चारही कसोटीत विजय मिळवला होता. मात्र यावेळी भारतापुढे ऑस्ट्रेलियाने गुडघे टेकले. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची (वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप) अंतिम फेरी गाठण्यासाठी दोन्ही संघांमध्ये शर्यत सुरू आहे. त्यातच न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात मालिका गमावल्याने भारतावर दडपण अधिक वाढले असून त्यांना ही मालिका ४-० अशा फरकाने जिंकणे अनिवार्य आहे.

पहिला डाव १५० धावांत संपुष्टात आल्यावर भारताने कांगारूंना १०४ धावांत गुंडाळले. त्यानंतर दुसऱ्या डावात भारताने ६ बाद ४८७ धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे ऑस्ट्रेलियापुढे तब्बल ५३४ धावांचे लक्ष्य उभे ठाकले. प्रत्युत्तरात रविवारी तिसऱ्या दिवसअखेरच ऑस्ट्रेलियाची ३ बाद १२ अशी अवस्था झाली होती. तेथून पुढे खेळताना कांगारूंची चौथ्या दिवशीही सुरुवात खराब झाली. सिराजने उस्मान ख्वाजाला (४) बाद केले. पूलचा फटका मारताना त्याचा उंच उडालेला झेल ऋषभ पंतने धावत जाऊन टिपला.

त्यानंतर स्टीव्ह स्मिथ व ट्रेव्हिस हेड या धोकादायक फलंदाजांची जोडी जमली. पहिल्या डावात शून्यावर बाद झालेल्या स्मिथने यावेळी संयमी फलंदाजी केली. तर हेडने नेहमीच्या शैलीत आक्रमण केले. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी ६२ धावांची भर घातली. मात्र सिराजने स्मिथला १७ धावांवर पायचीत पकडले. त्यामुळे उपाहाराला ऑस्ट्रेलियाची ५ बाद १०४ अशी स्थिती होती.

दुसऱ्या सत्रात हेड व मिचेल मार्श यांनी जोरदार आक्रमण केले. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी ८२ धावांची भागीदारी रचली. त्यामुळे भारतीय गोलंदाजांवर काहीसे दडपण आले. हेडने ८ चौकारांसह कसोटीतील १७वे अर्धशतक साकारले. अखेर बुमरा दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजीसाठी परत आल्यावर त्याने हेडचा अडथळा दूर केला. हेडने १०१ चेंडूंत ८९ धावा केल्या. पाच षटकांच्या अंतरात नितीशने मार्शचा ४७ धावांवर त्रिफळा उडवला. त्याची ही कारकीर्दीतील पहिलीच विकेट ठरली. त्यानंतर मिचेल स्टार्क व ॲलेक्स कॅरी यांनी आठव्या विकेटसाठी ४५ धावांची भर घालून भारताचा विजय लांबवला. मात्र सुंदरच्या गोलंदाजीवर ध्रुव जुरेलने स्टार्कचा (१२) एकहाती झेल टिपला. त्यामुळे चहापानाला ऑस्ट्रेलियाची ८ बाद २२७ अशी स्थिती झाली.

तिसऱ्या सत्रात मग फक्त विजयाची औपचारिकता शिल्लक होती. प्रथम सुंदरने नॅथन लायनचा (०) त्रिफळा उडवला. त्यानंतर कॅरी व जोश हेझलवूड यांनी जेमतेम ११ धावांची भर घातली. मग ५९व्या षटकात हर्षितने कॅरीचा (३६) त्रिफळा उद्ध्वस्त केला आणि भारताच्या दिमाखदार विजयावर थाटात शिक्कामोर्तब केले. बुमराच्या भेदक माऱ्या यशस्वी जैस्वाल व विराट कोहलीच्या शतकांची साथ लाभल्याने भारताने कांगारूंना त्यांच्याच भूमीत नेस्तनाबूत केले. आता दुसऱ्या कसोटीत रोहित कर्णधार म्हणून परतल्यावर भारतीय संघ या कामगिरीत सातत्य राखेल, अशीच आशा चाहत्यांना आहे.

संक्षिप्त धावफलक

भारत (पहिला डाव) : १५०

ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : १०४

भारत (दुसरा डाव) : १३४.४ षटकांत ६ बाद ४८७ घोषित (यशस्वी जैस्वाल १६१, विराट कोहली नाबाद १००, के. एल. राहुल ७७; नॅथन लायन २/९६)

ऑस्ट्रेलिया (दुसरा डाव) : ५८.४ षटकांत सर्व बाद २३८ (ट्रेव्हिस हेड ८९, मिचेल मार्श ४७; जसप्रीत बुमरा ३/४२, मोहम्मद सिराज ३/५१)

सामनावीर : जसप्रीत बुमरा

हे आकडे महत्त्वाचे!

पर्थमधील ओप्टस स्टेडियमवर आतापर्यंतच्या पाचही कसोटींमध्ये प्रथम फलंदाजी करणारा संघ जिंकला आहे. यापूर्वीच्या चारही लढती ऑस्ट्रेलियाने जिंकलेल्या. मात्र यंदा भारताने त्यांचा विजयरथ रोखला.

२९५ भारताने २९५ धावांच्या फरकाने कसोटी जिंकली. धावांचा विचार करता भारताचा हा परदेशातील कसोटीत तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा विजय ठरला. यापूर्वी २०१९मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ३१८, तर २०१७मध्ये श्रीलंकेविरुद्ध ३०४ धावांनी भारताने विजय मिळवला होता.

पहिल्या डावात १५० अथवा त्यापेक्षा कमी धावा करून भारताने आजवरचा फक्त तिसरा विजय नोंदवला. यापूर्वी २००४मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या डावात १०४, तर २०२१मध्ये इंग्लंडविरुद्ध १४५ धावा करूनही भारताने कसोटी जिंकण्याचा पराक्रम केला होता.

बुमराने या कसोटीत ९च्या सरासरीने ८ बळी मिळवले. कारकीर्दीत त्याने पाचव्यांदा दोन्ही डावांत मिळून १०० पेक्षा कमी धावा देत ८ बळी मिळवले.

५४ गेल्या ५४ वर्षांत ऑस्ट्रेलियाने मायदेशात पहिली कसोटी गमावल्यावर कधीही मालिका जिंकलेली नाही. यापूर्वी १९७०मध्ये त्यांनी पहिली कसोटी गमावूनही मालिका जिंकली होती. त्यानंतर त्यांना अशी कामगिरी जमलेली नाही.

गुणतालिकेत भारत पुन्हा अग्रस्थानी

ऑस्ट्रेलियाविरुद्ध मिळवलेल्या धडाकेबाज विजयासह भारताने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत पुन्हा अग्रस्थान मिळवले. भारताचे सध्या १५ सामन्यांतील ९ विजय, ५ पराभव, १ बरोबरीसह ११० गुण झाले आहेत. त्यांची विजयाची टक्केवारी ६१.११ इतकी आहे. ऑस्ट्रेलिया ५७.६९ टक्क्यांसह दुसऱ्या स्थानी कायम आहे. त्यानंतर अनुक्रमे श्रीलंका, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका यांचा क्रमांक लागतो.

logo
marathi.freepressjournal.in