बंगळूरु : सांघिक गोलंदाजीसह सूर्यकुमार यादव, अजिंक्य रहाणे, सूर्यांश शेडगे यांच्या शानदार फलंदाजीच्या बळावर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात रविवारी मुंबईने मध्य प्रदेशला ५ विकेट राखून धूळ चारत जेतेपदाचा चषक उंचावला. स्पर्धेत ४६९ धावा करणाऱ्या अजिंक्य रहाणेला मालिकावीर, तर अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या सूर्यांश शेडगेला सामनावीर पारितोषिकाने गौरविण्यात आले.
मध्य प्रदेशने दिलेले १७५ धावांचे लक्ष्य गाठताना एक वेळ मुंबईला दबाव आला होता. मात्र फलंदाजांनी तो उत्तम हाताळला. कर्णधार रजत पाटीदारच्या ४० चेंडूंतील नाबाद ८१ धावांच्या बळावर मध्य प्रदेशने १७४ धावा जमवल्या होत्या. मुंबईने मात्र १७.५ षटकांत ५ फलंदाजांच्या बदल्यात विजयी लक्ष्य गाठले.
मुंबईचे हे सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेतील दुसरे विजेतेपद ठरले. २०२२ मध्ये मुंबईने प्रथमच ही स्पर्धा जिंकली होती. मध्य प्रदेशला पुन्हा एकदा पहिल्या जेतेपदासाठी वाट पहावी लागली.
सूर्यकुमार यादवने ३५ चेंडूंत ४ चौकार आणि ३ षटकार लगावत ४८ धावा जमवून आपल्या फलंदाजीचा क्लास दाखवून दिला. तिसऱ्या विकेटसाठी अजिंक्य रहाणेसोबत त्याने ५२ धावांची भागीदारी केली. रहाणेने ३० चेंडूंत ३७ धावा चोपल्या.
पृथ्वी शॉ आणि कर्णधार श्रेयस अय्यर हे दोन प्रमुख फलंदाज लवकर बाद झाल्यावर सूर्यकुमार यादव आणि अजिंक्य रहाणे यांनी मुंबईची धावसंख्या पुढे नेली.
१४.४ षटकांत १२९ धावांवर ५ बाद अशी मुंबईची अवस्था होती. त्यांना विजयासाठी ४६ धावांची आवश्यकता होती. सूर्यांश शेडगेने ३ चौकार आणि तितक्याच षटकारांच्या सहाय्याने १५ चेंडूंत नाबाद ३६ धावा चोपत मुंबईला विजयासमीप आणले.
याआधी रजत पाटीदारने स्पर्धेतील पाचवे अर्धशतक झळकावत मध्य प्रदेशची धावसंख्या दीडशे पार नेली. त्याला अन्य फलंदाजांची साथ लाभली नाही. मुंबईच्या शार्दुल ठाकूर आणि रॉयस्टॉन डायस यांनी प्रत्येकी २ फलंदाजांना माघारी धाडले. तर अंकोलेकर, शिवम दुबे, सूर्यांश शेडगे यांनी प्रत्येकी एका फलंदाजाला माघारी धाडले
संक्षिप्त धावसंख्या : मध्य प्रदेश : २० षटकांत १७४/८ (रजत पाटीदार नाबाद ८१ धावा,, सुभ्रांशू सेनापती २३ धावा; शार्दुल ठाकूर २/४१, रॉयस्टन डायस २/३२) पराभूत विरुद्ध मुंबई : १७.५ षटकांत १८०/५ (सूर्यकुमार यादव ४८ धावा, अजिंक्य रहाणे ३७ धावा, सूर्यांश शेडगे नाबाद ३६ धावा, त्रिपुरेश सिंग २/३४)
स्पर्धेत अजिंक्य रहाणेने ४६९ धावा जमवल्या. त्यालाच मालिकावीर म्हणून गौरविण्यात आले. अंतिम सामन्यात अजिंक्यने ३० चेंडूंत ४ चौकारांच्या साथीने ३७ धावा जमवल्या. सूर्यकुमार यादवच्या साथीने त्याने मुंबईची धावसंख्या पुढे नेली. अंतिम सामन्यात अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या सूर्यांश शेडगेला सामनावीर पारितोषिकाने गौरविण्यात आले.