

नागपूर : विदर्भाचा डावखुरा फिरकीपटू हर्ष दुबेने कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी नोंदवतनाचा रणजी स्पर्धेत लक्षवेधी कामगिरी केली. मध्य प्रदेशविरुद्ध अ-गटामधील सामन्यात त्याने अवघ्या ५३ धावा देत नऊ फलंदाजांना बाद केले. त्याच्या या शानदार कामगिरीमुळे मध्य प्रदेशचा पहिला डाव २०९ धावांत आटोपला. मात्र, प्रत्युत्तरात विदर्भाचीही अवस्था बिकट झाली असून पहिल्या दिवसअखेर यजमानांनी ४ बाद ५६ धावा केल्या आहेत.
सोमवारी सुरू झालेल्या या सामन्यात मध्य प्रदेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, हर्ष दुबेच्या फिरकीसमोर त्यांचे फलंदाज फार काळ टिकू शकले नाहीत. दुबेने २३.१ षटके गोलंदाजी करत ५३ धावांत नऊ बळी मिळवले. त्याला नचिकेत भुतेने एका फलंदाजाला बाद करत चांगली साथ दिली.
मध्य प्रदेशकडून अथर्व महाजनने सर्वाधिक ८५ धावांची झुंजार खेळी केली. त्याने १२३ चेंडूंचा सामना करताना पाच चौकार आणि तीन षटकार लगावले. मात्र, दुसऱ्या बाजूने त्याला अपेक्षित साथ मिळाली नाही. सारांश जैनने ४१ चेंडूंत ३४ धावा करत काही काळ प्रतिकार केला. आवेश खान १३ धावांवर नाबाद राहिला. अखेर मध्य प्रदेशचा डाव ६६.१ षटकांत २०९ धावांवर संपुष्टात आला. यानंतर फलंदाजीस उतरलेल्या विदर्भाची सुरुवातही निराशाजनक झाली. मध्य प्रदेशच्या गोलंदाजांनी अचूक मारा करत यजमान संघाला चार धक्के दिले.
शमीने उडवला पृथ्वीचा त्रिफळा
कोलकाता : बंगालचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने भेदक गोलंदाजी करत महाराष्ट्राला सुरुवातीलाच दोन धक्के दिले. बंगालचा पहिला डाव अवघ्या १४३ धावांत संपुष्टात आल्यानंतर शमीने भारताच्या संघातून बाहेर असलेल्या पृथ्वी शॉ यालाही त्रिफळाचीत केले. त्यामुळे पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा महाराष्ट्राची अवस्था २१ धावांत २ बाद अशी झाली होती. ईडन गार्डन्सवर सुरू झालेल्या या सामन्यात महाराष्ट्राने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ढगाळ वातावरण आणि खेळपट्टीवरील ओलाव्याचा महाराष्ट्राच्या वेगवान गोलंदाजांनी चांगला फायदा घेतला. प्रदीप दाधे (३/४५), राजवर्धन हंगरगेकर (२/४२) आणि तनय संघवी (३/४२) यांनी अचूक मारा करत बंगालच्या फलंदाजीला खिंडार पाडले.