विदर्भ तिसऱ्यांदा रणजीच्या अंतिम फेरीत; उपांत्य सामन्यात मध्य प्रदेशवर ६२ धावांनी वर्चस्व

विदर्भाने तिसऱ्यांदा रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारण्याचा पराक्रम केला.
विदर्भ तिसऱ्यांदा रणजीच्या अंतिम फेरीत; उपांत्य सामन्यात मध्य प्रदेशवर ६२ धावांनी वर्चस्व

नागपूर : यश ठाकूर (६० धावांत ३ बळी) आणि आदित्य ठाकरे (५६ धावांत २ बळी) या वेगवान गोलंदाजांनी अखेरच्या दिवशी प्रभावी मारा करून मध्य प्रदेशच्या उर्वरित चार फलंदाजांना १२ षटकांच्या आतच बाद केले. त्यामुळे विदर्भाने तिसऱ्यांदा रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारण्याचा पराक्रम केला. अक्षय वाडकरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या विदर्भाने उपांत्य सामन्यात २०२२च्या विजेत्या मध्य प्रदेशचा ६२ धावांनी पराभव केला. आता १० मार्चपासून वानखेडे स्टेडियमवर रंगणाऱ्या महाअंतिम मुकाबल्यात विदर्भासमोर मुंबईचे कडवे आव्हान असेल.

विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर झालेल्या या लढतीत अखेरच्या दिवशी विदर्भाला विजयासाठी ४ बळींची, तर मध्य प्रदेशला ९३ धावांची आवश्यकता होती. मंगळवारी मध्य प्रदेशने ३२१ धावांचा पाठलाग करताना ७१ षटकांत ६ बाद २२८ धावांपर्यंत मजल मारली होती. मात्र बुधवारी सर्वप्रथम ठाकरेने दिवसाच्या पहिल्या चार षटकांतच कुमार कार्तिकेय (०) आणि अनुभव अगरवाल (०) यांचे त्रिफळे उडवले. मग ठाकूरने सारांश जैनचा (२५) अडथळा दूर करून मध्य प्रदेशच्या आशा पूर्णपणे उद्ध्वस्त केल्या. अखेर ठाकूरनेच ८२व्या षटकात कुलवंत खेजरोलियाचा (११) त्रिफळा उडवून विदर्भाच्या विजयावर थाटात शिक्कामोर्तब केले. मध्य प्रदेशचा दुसरा डाव ८१.३ षटकांत २५८ धावांत संपुष्टात आला.

उभय संघांतील या लढतीत पहिल्या डावात विदर्भाचा १७० धावांत खुर्दा झाला. मग हिमांशू मंत्रीच्या शतकामुळे मध्य प्रदेशने २५२ धावा करून पहिल्या डावात ८२ धावांची आघाडी घेतली. तेथून मात्र विदर्भाने सामन्याला कलाटणी दिली. दुसऱ्या डावात यश राठोडची (१४१) शतकी खेळी आणि वाडकरच्या (७७) अर्धशतकामुळे विदर्भाने ४०२ धावा करून मध्य प्रदेशपुढे ३२१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र ऑफस्पिनर वाखरे (३ बळी), ठाकूर, ठाकरे, आदित्य सरवटे (२ बळी) यांच्या सांघिक कामगिरीपुढे मध्य प्रदेशचे फलंदाज अपयशी ठरले आणि एकवेळ १ बाद १२८ अशा सुस्थितीत असतानाही त्यांचा संघ २५८ धावांत गारद झाला. दुसऱ्या डावात शतक साकारणाऱ्या यशला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

संक्षिप्त धावफलक

- विदर्भ (पहिला डाव) : १७०

- मध्य प्रदेश (पहिला डाव) : २५२

- विदर्भ (दुसरा डाव) : सर्व बाद ४०२

- मध्य प्रदेश (दुसरा डाव) : ८१.३ षटकांत सर्व बाद २५८ (यश दुबे ९४, हर्ष गवळी ६७; अक्षय वाखरे ३/४२, यश ठाकूर ३/६०)

- निकाल : विदर्भ ६२ धावांनी विजयी

- सामनावीर : यश राठोड

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in