विदर्भाचे इराणी चषकावर तिसऱ्यांदा वर्चस्व

अक्षय वाडकरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या विदर्भाने रविवारी तिसऱ्यांदा इराणी चषक पटकावला. नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर झालेल्या या लढतीत त्यांनी शेष भारत संघाला ९३ धावांनी धूळ चारली.
विदर्भाचे इराणी चषकावर तिसऱ्यांदा वर्चस्व
Published on

नागपूर : अक्षय वाडकरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या विदर्भाने रविवारी तिसऱ्यांदा इराणी चषक पटकावला. नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर झालेल्या या लढतीत त्यांनी शेष भारत संघाला ९३ धावांनी धूळ चारली.

रणजी स्पर्धेचा विजेता संघ आणि उर्वरित भारतातील अन्य खेळाडूंचा मिळून एक संघ अशा दोन संघांत दरवर्षी इराणी चषकासाठी पाच दिवसीय सामना खेळवण्यात येतो. २०२५मध्ये विदर्भाने तिसऱ्यांदा रणजी स्पर्धेचे जेतपद काबिज केले. त्यामुळे त्यांच्यासमोर यावेळी रजत पाटीदारच्या नेतृत्वात खेळणाऱ्या शेष भारत संघाचे आव्हान होते. रजतने काही दिवसांपूर्वीच दुलीप ट्रॉफी स्पर्धेत मध्य विभागाचे यशस्वी नेतृत्व केले होते.

दरम्यान, उभय संघांतील या लढतीत पाचव्या म्हणजेच अखेरच्या दिवशी शेष भारत संघाला आणखी ३३१ धावांची गरज होती. चौथ्या दिवसअखेर शेष भारतने दुसऱ्या डावात ३ बाद ३० धावा केल्या होत्या. मात्र रविवारी त्यांचा संघ ७३.५ षटकांत २६७ धावांत गारद झाला. डावखुरा फिरकीपटू हर्ष दुबेने ४ बळी मिळवले. यश धूल (९२) व मानव सुतार (नाबाद ५६) यांनी दिलेली अर्धशतकी झुंज व्यर्थ ठरली. पहिल्या डावात शतक साकारणारा अथर्व तायडे सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना विदर्भाने ३४२ धावा केल्या. मग शेष भारतचा पहिला डाव त्यांनी २१४ धावांत गुंडाळून १२८ धावांची आघाडी मिळवली. वेगवान गोलंदाज यश ठाकूरने ४ बळी मिळवले. पाटीदारने ६६ धावांची झुंज दिली. मग दुसऱ्या डावात विदर्भाने २३२ धावा केल्या. अक्षय (३६) व दर्शन नळकांडे (३५) यांनी प्रतिकार केला. पहिल्या डावातील १२८ धावांच्या आघाडीमुळे विदर्भाने एकूण ३६१ धावांचे लक्ष्य शेष भारतापुढे ठेवले. मात्र पाटीदार (१०), ऋतुराज गायकवाड (७), इशान किशन (३५) यांच्या अपयशामुळे शेष भारताचा दुसरा डाव ढेपाळला. त्यामुळे विदर्भाने रणजीनंतर इराणी ट्रॉफीही जिंकली.

संक्षिप्त धावफलक

  • विदर्भ (पहिला डाव) : ३४२

  • शेष भारत (पहिला डाव) : २१४

  • विदर्भ (दुसरा डाव) : २३२

  • शेष भारत (दुसरा डाव) : ७३.५ षटकांत सर्व बाद २६७ (यश धूल ९२, मानव सुतार नाबाद ५६, इशान किशन ३५; हर्ष दुबे ४/७३, आदित्य ठाकरे २/२७)

  • सामनावीर : अथर्व तायडे

logo
marathi.freepressjournal.in