विजय हजारे करंडकावर विदर्भाचे प्रथमच वर्चस्व; अंतिम फेरीत सौराष्ट्रवर ३८ धावांनी मात; अथर्व, यश यांची चमक

देशांतर्गत क्रिकेटमधील बलाढ्य संघ म्हणून नावलौकिक मिळवलेल्या विदर्भाने रविवारी रात्री पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली. विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विदर्भाने सौराष्ट्रला ३८ धावांनी धूळ चारून प्रथमच विजेतेपद मिळवले.
विजय हजारे करंडकावर विदर्भाचे प्रथमच वर्चस्व; अंतिम फेरीत सौराष्ट्रवर ३८ धावांनी मात; अथर्व, यश यांची चमक
Photo : X
Published on

बंगळुरू : देशांतर्गत क्रिकेटमधील बलाढ्य संघ म्हणून नावलौकिक मिळवलेल्या विदर्भाने रविवारी रात्री पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली. विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विदर्भाने सौराष्ट्रला ३८ धावांनी धूळ चारून प्रथमच विजेतेपद मिळवले. शतकवीर अथर्व तायडे (११८ चेंडूंत १२८ धावा) विदर्भाच्या ऐतिहासिक विजयाचा शिल्पकार ठरला. हर्ष दुबेच्या नेतृत्वात विदर्भाने हे यश साध्य केले.

२४ डिसेंबरपासून देशातील विविध शहरांत विजय हजारे स्पर्धेच्या ३३व्या हंगामाला प्रारंभ झाला होता. १८ जानेवारीपर्यंत रंगलेल्या या स्पर्धेत रणजीप्रमाणेच ३८ संघ सहभागी झाले आहेत. त्यापैकी ३२ संघांची चार एलिट गटात, तर उर्वरित ६ संघांची प्लेट गटात विभागणी करण्यात आली होती. २०२४-२५च्या हंगामात कर्नाटकने अंतिम फेरीत विदर्भाला नमवून पाचव्यांदा ही स्पर्धा जिंकली होती. मात्र यंदा विदर्भाने उपांत्य फेरीत कर्नाटकचाच पराभव करून सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारलेली. तर दोन वेळच्या विजेत्या सौराष्ट्रने पंजाबला उपांत्य सामन्यात नमवले होते.

बीसीसीआयने गेल्या वर्षीपासून प्रमुख खेळाडूंनाही रणजी स्पर्धेत अथवा अन्य देशांतर्गत स्पर्धेत खेळणे अनिवार्य केले आहे. एखादा खेळाडू भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत नसल्यास त्याने त्यावेळी सुरू असलेल्या देशांतर्गत स्पर्धेत खेळणे गरजेचे आहे. तसेच दुखापतीमुळे खेळाडू भारतीय संघाबाहेर गेला, तरी त्याला देशांतर्गत स्पर्धेत खेळून पुन्हा लय मिळवण्यासह तंदुरुस्ती सिद्ध करणे अनिवार्य आहे. विदर्भाचे खेळाडू मात्र देशांतर्गत स्पर्धांमध्ये सातत्याने छाप पाडत असतानाही त्यांना भारतीय संघात क्वचितच स्थान लाभते. विदर्भाने २०२५मध्ये रणजी स्पर्धेचे जेतेपदसुद्धा मिळवले होते. आता रणजीच्या दुसऱ्या टप्प्याला २२ जानेवारीपासून प्रारंभ होईल.

दरम्यान, अंतिम फेरीत प्रथम फलंदाजी करताना विदर्भाने ५० षटकांत ८ बाद ३१७ धावांचा डोंगर उभारला. अथर्वने १५ चौकार व ३ षटकारांसह कारकीर्दीतील तिसरे शतक ६६ चेंडूंतच साकारले. त्याला सातत्यपूर्ण कामगिरी करणारा यश राठोड (५४) व प्रतिभावान अमन मोखाडे (३३) सुरेख साथ लाभली. अनुकूल पन्वरने ४ बळी मिळवले.

लक्ष्याचा पाठलाग करताना सौराष्ट्र ४८.५ षटकांत २७९ धावांत गारद झाला. प्रेरक मंकड (८८) व चिराग जागी (६४) यांनी अर्धशतकी झुंज दिली. मात्र वेगवान गोलंदाज यश राठोडने ४, तर नचिकेत भुतेने ३ बळी मिळवून विदर्भाला विजयी केले. अथर्वला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. तर १० सामन्यांत ५ शतकांसह तब्बल ८१४ धावा कुटणारा अमन मोखाडे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला. उस्मान घानी यांच्या प्रशिक्षणात विदर्भाने हे यश मिळवले.

विदर्भाकडे दुहेरी जेतेपद

विदर्भाने २०२५मध्ये रणजी स्पर्धेचे जेतेपद मिळवले होते, तर आता त्यांनी विजय हजारे स्पर्धाही जिंकली. म्हणजेच देशांतर्गत स्पर्धेतील प्रथम श्रेणी व लिस्ट-ए प्रकारांतील विजेतेपद सध्या विदर्भाकडे आहे. फक्त मुश्ताक अली स्पर्धेत (टी-२०) विदर्भाला यावेळी उपांत्य फेरीसुद्धा गाठता आली नाही. आता रणजीच्या दुसऱ्या टप्प्यात ते चमकदार कामगिरी करून जेतेपद राखण्यास आतुर असतील. विदर्भाचा संघ अ-गटात तूर्तास अग्रस्थानी असून त्यांचे आंध्र प्रदेश व उत्तर प्रदेशविरुद्ध उर्वरित साखळी सामने होतील.

logo
marathi.freepressjournal.in