
जयपूर : गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, विदर्भ आणि बडोदा या संघांनी गटातून अव्वल स्थान मिळवत विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत थेट प्रवेश केला.
झारखंडच्या उत्कर्षने शतक झळकावत लक्ष वेधून घेतले. उत्कर्षने १२० चेंडूंत १०२ धावा जमवत संघाला गोवाविरुद्धच्या सामन्यात ३१ धावांनी विजय मिळवून दिला. ‘ए’ गटातील या लढतीत झारखंडने निर्धारित ५० षटकांत ७ विकेट गमावून ३२० धावा केल्या. दर्शन मिसाळने १११ चेंडूंत १५१ धावा केल्या. मात्र त्याची खेळी व्यर्थ ठरली. गोव्याची मजल ५० षटकांत ९ फलंदाज गमावून २८९ धावांपर्यंत गेली. या सामन्यात झारखंडने विजय मिळवला असला तरी ते पात्र ठरले नाहीत. गुजरातचा संघ गटातून अव्वल असून त्यांनी थेट पात्रता मिळवली आहे. हरयाणाचा संघ दुसऱ्या स्थानी असून झारखंड तिसऱ्या स्थानावर आहे.
गुजरातने ओदिशाला १०० धावांनी पराभूत करत गटातील सर्वच्या सर्व सामने जिंकण्याचा विक्रम केला आहे. तसेच त्यांनी थेट पात्रता मिळवली आहे. प्रथम फलंदाजी करताना गुजरातचा संघ ४७.५ षटकांत २५२ धावांवर सर्वबाद झाला. उर्विल पटेल (४५ धावा), हेमांग पटेल (४८ धावा) आणि रवि बिश्नोई (४० धावा) यांच्या फलंदाजीत चमक दाखवली. प्रत्युत्तरार्थ फलंदाजीला आलेल्या ओदिशाचा संघ १५२ धावांवर आटोपला. बिश्नोईने १७ धावा देत ४ बळी मिळवले, चिंतन गजाने २८ धावा देत ३ फलंदाजांना माघारी धाडले.
मणिपूर विरुद्धच्या सामन्यात हरयाणाने सहा विकेट आणि ९४ चेंडू राखून सहज विजय मिळवला.
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात रेल्वेने महाराष्ट्रला ३२ धावांनी धूळ चारली. परंतु ‘ब’ गटातून अव्वल स्थान गाठणे त्यांना जमले नाही. साहब युवराज सिंह (७९ धावा) आणि सूरज अहुजा (५५ धावा) यांच्या बळावर रेल्वेने ७ फलंदाज गमावून २८४ धावा केल्या आणि महाराष्ट्राला २५२ धावांवर रोखले. पूर्नंक त्यागीने ५७ धावा देत ५ विकेट मिळवल्या. त्याला ३ विकेट मिळवणाऱ्या राज चौधरीची चांगली साथ मिळाली. या गटात महाराष्ट्र अव्वल स्थानी, तर राजस्थानचा संघ दुसऱ्या स्थानी राहिला.
सी गटात रविवारी कोणतेही धक्कादायक निकाल लागले नाहीत. कर्नाटकने नागालँडला, तर पंजाबने पद्दुचेरीला नमवले.
बडोद्याने ५ विकेट राखून दिल्लीवर विजय मिळवला. सलामीवीर अर्पित राणाने दिल्लीसाठी सर्वाधिक ७५ धावा केल्या. बडोद्याने १६ चेंडू राखून विजयी लक्ष्य गाठले.
गट डी सामन्यात विदर्भाने मिझोरामला १० गडी राखून पराभूत करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. अपूर्व वानखडेने ३० चेंडूंत नाबाद ५० धावा केल्या.
अन्य लढतीत तामिळनाडूने ३०१ धावांचा डोंगर उभारल्यानंतर छत्तीसगडचा ७३ धावांनी पराभव केला. वरुण चक्रवर्ती (३/३४) आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी छत्तीसगडला २२८ धावांत रोखले. तामिळनाडूसाठी बाबा इंद्रजित (७५) आणि विजय शंकर (७१) यांनी फलंदाजीत चमकदार कामगिरी केली. मध्य प्रदेशने बंगालचा सहा गडी राखून पराभव केला. ९ जानेवारीपासून स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीचे सामने होणार आहेत. १५ आणि १६ जानेवारीला उपांत्य फेरीचे दोन्ही सामने होतील. तर रविवारी १८ जानेवारीला अंतिम सामना होणार आहे.
मुंबई विजयी
रविवारच्या सामन्यात मुंबईने विजय मिळवला असला तरी त्यांना पात्रता फेरी गाठता आली नाही. ते गटातून तिसऱ्या स्थानी राहिले. मुंबईने ५ गडी आणि २४ चेंडू राखून सौराष्ट्रने दिलेल्या २९० धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला.