

बंगळुरू : विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यासह भारताचे अनेक तारांकित खेळाडू आज विजय हजारे करंडक एकदिवसीय स्पर्धेद्वारे देशांतर्गत क्रिकेटच्या रणांगणात परतत आहेत. त्यामुळे या सर्वांचे चमकदार कामगिरी करून भारतीय संघातील स्थान टिकवण्यासह निवड समितीचे लक्ष वेधण्याकडे कल असेल.
२४ डिसेंबरपासून देशातील विविध शहरांत विजय हजारे स्पर्धेच्या ३३व्या हंगामाला प्रारंभ होईल. १८ जानेवारीपर्यंत रंगणाऱ्या या स्पर्धेत रणजीप्रमाणेच ३८ संघ सहभागी झाले आहेत. त्यांपैकी ३२ संघांची चार एलिट गटात, तर उर्वरित ६ संघांची प्लेट गटात विभागणी करण्यात आली आहे. २०२४-२५च्या हंगामात कर्नाटकने अंतिम फेरीत विदर्भाला नमवून पाचव्यांदा ही स्पर्धा जिंकली होती. याबरोबरच त्यांनी सर्वाधिक वेळा विजय हजारे स्पर्धेचे जेतेपद मिळवण्याच्या यादीत तमिळनाडूसह संयुक्तपणे अग्रस्थान मिळवले.
रोहित मुंबईकडून, तर विराट दिल्लीकडून पहिले दोन सामने खेळणार असल्याचे समजते. त्याशिवाय पंत दिल्लीचे नेतृत्व करणार असून मुंबईच्या संघात सूर्यकुमार यादव, शिवम दुबे यांचाही समावेश आहे. तसेच पंजाबच्या संघात शुभमन गिल, अभिषेक शर्मा, अर्शदीप सिंग खेळताना दिसतील. गिलला नुकताच टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान लाभले नाही. त्यामुळे त्याच्या कामगिरीसह तंदुरुस्तीवर सर्वांचे विशेष लक्ष असेल.
३८ वर्षीय रोहित सध्या कसोटी व टी-२० प्रकारांतून निवृत्त झालेला असून फक्त एकदिवसीय प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे तो सिक्कीम आणि उत्तराखंड या संघांविरुद्ध पहिले दोन साखळी सामने खेळणार आहे. मुंबई क-गटात असून बुधवारी सिक्कीमविरुद्धच्या लढतीने ते आपल्या अभियानास प्रारंभ करतील. शार्दूल ठाकूरच्या नेतृत्वात मुंबईचा संघ सर्व साखळी सामने जयपूरला खेळणार आहे. येथे चाहत्यांना मोफत प्रवेश देण्यात येईल. ११ जानेवारीपासून भारताची न्यूझीलंडविरुद्ध ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका रंगणार आहे. त्यामुळे त्यापूर्वी रोहित या स्पर्धेत खेळून लय टिकवणार आहे.
दुसरीकडे ३७ वर्षीय विराटदेखील दिल्लीकडून पहिले दोन साखळी सामने खेळणार आहे. दिल्लीचा ड-गटात समावेश असून ते आंध्र प्रदेशविरुद्ध पहिला, तर गुजरातविरुद्ध दुसरा सामना खेळतील. दिल्लीचे सर्व साखळी सामने बंगळुरू येथे होतील. त्यामुळे या लढतींना गर्दी होण्याची शक्यता होती. कारण विराट आयपीएलमध्ये बंगळुरूकडूनच खेळतो. मात्र चिन्नास्वामी स्टेडियमऐवजी या लढती बंगळुरूतीलच अन्य स्टेडियममध्ये प्रेक्षकांविना खेळवण्यात येतील, असे समजते.
महाराष्ट्राचा विचार करता अनुभवी फलंदाज ऋतुराज गायकवाडकडे या संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले असून युवा सलामीवीर पृथ्वी शॉच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल. ऋतुराजने नुकताच आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेत कारकीर्दीतील पहिले शतक झळकावले. तर मुश्ताक अली व रणजी स्पर्धेत चमक दाखवल्यानंतर पृथ्वीला आयपीएल लिलावात दिल्ली कॅपिटल्स संघाने विकत घेतले. आता हे दोघेही विजय हजारे स्पर्धेतही छाप पाडण्यास आतुर असतील. महाराष्ट्रासमोर बुधवारी पंजाबचे आव्हान असेल. तसेच विदर्भाचे नेतृत्व हर्ष दुबे करणार आहे. त्यांची ब-गटात बंगालशी सलामीला गाठ पडेल.
बीसीसीआयने गेल्या वर्षीपासून प्रमुख खेळाडूंनाही रणजी स्पर्धेत अथवा अन्य देशांतर्गत स्पर्धेत खेळणे अनिवार्य केले आहे. एखादा खेळाडू भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत नसल्यास त्याने त्यावेळी सुरू असलेल्या देशांतर्गत स्पर्धेत खेळणे गरजेचे आहे. तसेच दुखापतीमुळे खेळाडू भारतीय संघाबाहेर गेला, तरी त्याला देशांतर्गत स्पर्धेत खेळून पुन्हा लय मिळवण्यासह तंदुरुस्ती सिद्ध करणे अनिवार्य आहे. काही महिन्यांपूर्वी विराट, रोहित रणजी स्पर्धेतही खेळताना दिसले होते. मात्र आता ते दोघेही टी-२० व कसोटीतून निवृत्त झाले आहेत. त्यामुळे रणजी व मुश्ताक अली स्पर्धेत खेळणे त्यांना बंधनकारक नसेल. मात्र विजय हजारे स्पर्धेत खेळून ते लय कायम राखण्याचा प्रयत्न करतील. २०२७च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या दृष्टीने दोघांनाही संघात टिकून राहायचे आहे. तसेच दोघेही सध्या उत्तम लयीत असल्याचे आफ्रिका, ऑस्ट्रेलियाविरुद्ध दिसून आले.
एकंदर आता बुधवारपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत तारांकितांकडून चौकार-षटकारांच्या आतषबाजी अपेक्षित असून त्यांच्या तंदुरुस्तीचाही कस लागणार आहे.
तब्बल १५ वर्षांनी विराट यंदा विजय हजारे स्पर्धेत सहभागी होणार आहे. यापूर्वी फेब्रुवारी २०१०मध्ये तो सेनादलविरुद्ध या स्पर्धेतील अखेरचा सामना खेळला होता. त्यानंतर सातत्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमुळे विराट या स्पर्धेत खेळताना दिसलाच नाही.
रोहित ७ वर्षांनी विजय हजारे स्पर्धेत परतला आहे. २०१८मध्ये तो हैदराबादविरुद्ध उपांत्य फेरीत मुंबईकडून खेळला होता. मुंबईने त्यावर्षी स्पर्धेचे जेतेपदही मिळवले होते. आता रोहितच्या पुनरागमनाकडे लक्ष असेल.
गिल, अभिषेक, अर्शदीप पंजाबच्या संघात
भारताच्या एकदिवसीय व कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिल, टी-२०तील आघाडीचा फलंदाज अभिषेक शर्मा व डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग यांचा पंजाबच्या संघात समावेश करण्यात आला आहे. पंजाबचा क-गटात समावेश असून २४ तारखेला ते महाराष्ट्राविरुद्ध सलामीची लढत खेळतील. मग २६ तारखेला त्यांची छत्तीसगडशी गाठ पडेल. गिल व अर्शदीप हे भारताच्या एकदिवसीय संघाच भाग असल्याने ते विजय हजारे स्पर्धेतील दोनच सामने खेळतील, असे समजते. अभिषेक मात्र ४-५ पाच सामने खेळू शकतो. ११ जानेवारीपासून भारत-न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिका सुरू होईल, तर २१ जानेवारीपासून उभय संघांत पाच टी-२० सामने खेळले जातील.
चिन्नास्वामीवरील सामने रद्द
विराट, पंत यांचा समावेश असलेला दिल्लीचा संघ त्यांचे साखळी सामने बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळणार होता. मात्र कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेने (केएससीए) एक दिवस अगोदर या लढती अन्य ठिकाणी खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. जूनमध्ये बंगळुरूने मिळवलेल्या आयपीएल जेतेपदानंतर चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या विजय मिरवणुकीत चेंगराचेंगरीमुळे ११ जणांचा बळी गेला. तेव्हापासून चिन्नास्वामीवर सामन्यांची बंदी होती. मात्र विजय हजारे स्पर्धेद्वारे येथे क्रिकेट परतणार होते. अखेर त्यास पोलिसांनी मनाई केल्यामुळे आता दिल्लीचे सामने बंगळुरूतील अन्य स्टेडियमवर प्रेक्षकांविनाच खेळवण्यात येतील.
विजय हजारे स्पर्धेची गटवारी
अ-गट : कर्नाटक, झारखंड, तमिळनाडू, केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, त्रिपुरा, पुद्दुचेरी.
ब-गट : विदर्भ, हैदराबाद, चंदिगड, बडोदा, उत्तर प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, बंगाल, आसाम.
क-गट : मुंबई, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड, पंजाब, उत्तराखंड, सिक्कीम, गोवा.
ड-गट : हरयाणा, आंध्र प्रदेश, ओदिशा, गुजरात, सौराष्ट्र, सेनादल, रेल्वे, दिल्ली.
प्लेट गट : मेघालय, नागालँड, बिहार, मणिपूर, मिझोराम, अरुणाचल प्रदेश.