

जयपूर : विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत बुधवारी पहिल्याच दिवशी भारताच्या धुरंधरांचा शतकी धडाका पाहायला मिळाला. त्यानंतर आता शुक्रवारी होणाऱ्या दुसऱ्या साखळी सामन्यातही फलंदाजांचे वर्चस्व दिसून येणार असून ते धावांचा वर्षाव करतील, हीच अपेक्षा आहे. रोहित शर्मा व विराट कोहली यांच्यासाठी ही या वर्षातील अखेरची लढत ठरू शकते.
२४ डिसेंबरपासून देशातील विविध शहरांत विजय हजारे स्पर्धेच्या ३३व्या हंगामाला प्रारंभ झाला. १८ जानेवारीपर्यंत रंगणाऱ्या या स्पर्धेत रणजीप्रमाणेच ३८ संघ सहभागी झाले आहेत. त्यापैकी ३२ संघांची चार एलिट गटात, तर उर्वरित ६ संघांची प्लेट गटात विभागणी करण्यात आली आहे. २०२४-२५च्या हंगामात कर्नाटकने अंतिम फेरीत विदर्भाला नमवून पाचव्यांदा ही स्पर्धा जिंकली होती. याबरोबरच त्यांनी सर्वाधिक वेळा विजय हजारे स्पर्धेचे जेतेपद मिळवण्याच्या यादीत तमिळनाडूसह संयुक्तपणे अग्रस्थान मिळवले.
बीसीसीआयने गेल्या वर्षीपासून प्रमुख खेळाडूंनाही रणजी स्पर्धेत अथवा अन्य देशांतर्गत स्पर्धेत खेळणे अनिवार्य केले आहे. एखादा खेळाडू भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत नसल्यास त्याने त्यावेळी सुरू असलेल्या देशांतर्गत स्पर्धेत खेळणे गरजेचे आहे. तसेच दुखापतीमुळे खेळाडू भारतीय संघाबाहेर गेला, तरी त्याला देशांतर्गत स्पर्धेत खेळून पुन्हा लय मिळवण्यासह तंदुरुस्ती सिद्ध करणे अनिवार्य आहे. काही महिन्यांपूर्वी विराट, रोहित रणजी स्पर्धेतही खेळताना दिसले होते. मात्र आता ते दोघेही टी-२० व कसोटीतून निवृत्त झाले आहेत. त्यामुळे रणजी व मुश्ताक अली स्पर्धेत खेळणे त्यांना बंधनकारक नसेल. मात्र विजय हजारे स्पर्धेत खेळून ते लय कायम राखण्याचा प्रयत्न करतील. २०२७च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या दृष्टीने दोघांनाही संघात टिकून राहायचे आहे. तसेच दोघेही सध्या उत्तम लयीत असल्याचे आफ्रिका, ऑस्ट्रेलियाविरुद्ध दिसून आले.
दरम्यान, ३८ वर्षीय रोहित व ३७ वर्षीय या दोघांनीही पहिल्याच साखळी सामन्यात आपापल्या संघाकडून शतक साकारताना दमदार विजय नोंदवून दिला. आता शुक्रवारी मुंबईची क-गटात उत्तराखंडशी गाठ पडणार आहे, तर ड-गटात दिल्लीसमोर गुजरातचे आव्हान असेल. रोहित ७ वर्षांनी, तर विराट तब्बल १५ वर्षांनी या स्पर्धेत सहभागी झाला आहे. दोन्ही खेळाडू आपापल्या संघासाठी पहिले दोन सामने खेळणार आहेत. ११ जानेवारीपासून भारताची न्यूझीलंडविरुद्ध ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका रंगणार आहे. त्यामुळे दोघेही त्यापूर्वी या स्पर्धेत खेळून लय टिकवणार आहे. शार्दूल ठाकूर मुंबईचे, तर ऋषभ पंत दिल्लीचे नेतृत्व करत आहे. दोन्ही लढती सकाळी ९ वाजता सुरू होतील. मात्र या लढतींचे थेट प्रक्षेपण नसेल. फक्त अहमदाबाद व राजकोट येथे होणाऱ्या लढतींचेच थेट प्रक्षेपण करण्यात येत आहे. त्यामुळे चाहत्यांना स्कोरकार्डद्वारेच लढतीची माहिती घेता येईल.
पंजाबचा गिल पुनरागमनासाठी सज्ज
भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिल, टी-२०तील आघाडीचा फलंदाज अभिषेक शर्मा व डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग यांचा पंजाबच्या संघात समावेश करण्यात आला आहे. पंजाबने पहिल्या सामन्यात महाराष्ट्राला धूळ चारली. मात्र गिल त्या लढतीस मुकला होता. आता गिल दुसऱ्या सामन्यासाठी तंदुरुस्त असल्याचे समजते. टी-२० विश्वचषकातून गिलला डावलण्यात आल्याने त्याला आता एकदिवसीय संघातील स्थान टिकवून ठेवण्यासाठीही स्वत:ला सिद्ध करावे लागू शकते.