मुंबई : भारताचा ‘गोल्डन बॉय’ आणि गतविजेत्या नीरज चोप्राने पुन्हा एकदा दमदार प्रदर्शन करत पहिल्याच प्रयत्नात पॅरिस ऑलिम्पिकच्या भालाफेक प्रकारात अंतिम फेरी गाठण्याची किमया केली. त्याचबरोबर महिलांच्या ५० किलो वजनी गटात कुस्तीपटू विनेश फोगटने अंतिम फेरी गाठत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
अपेक्षेप्रमाणे नीरजने ८९.३४ मीटर भालाफेक करत अव्वल स्थान प्राप्त केले असून आता त्याच्याकडून गुरुवारी होणाऱ्या अंतिम फेरीत सुवर्णपदकाची अपेक्षा आहे. आतापर्यंत फक्त तीन कांस्यपदकांवर समाधान मानावे लागलेल्या भारताकडून आता ‘गो फॉर गोल्ड नीरज, विनेश’ हा नारा गुंजत आहे.
‘दबंग गर्ल’ कुस्तीपटू विनेश फोगटने मंगळवारी धडाकेबाज कामगिरी करत लागोपाठ तीन सामने जिंकत महिलांच्या ५० किलो वजनी गटात अंतिम फेरी गाठली आहे. त्यामुळे विनेशचे किमान रौप्यपदक निश्चित झाले आहे. उपांत्य फेरीत क्युबाच्या युस्नेलिस गझमान हिला ५-० असा धुव्वा उडवत विनेशने अंतिम फेरी गाठली.
तिने पहिल्या फेरीत अखेरच्या पाच सेकंदात अव्वल मानांकित सुसाकी हिला ३-२ असे पराभूत केले. त्यानंतर अटीतटीच्या झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत युक्रेनच्या ओक्साना लिवाच हिचा ५-७ असा पाडाव केला. उपांत्य फेरीत तिने क्युबाच्या खेळाडूला डोके वर काढण्याची संधी दिली नाही. ५-० अशी आघाडी तिने अखेरपर्यंत टिकवत विजय संपादन केला.