सांगण्यासाठी बरेच काही, पण शब्द अपुरे! संघर्षानंतरही ऑलिम्पिक पदक निसटल्यामुळे तीन पानी पत्रासह कुस्तीपटू विनेश फोगटने व्यक्त केल्या भावना

Vinesh Phogat: पॅरिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतील पदक न्यायालयील संघर्षानंतरही निसटल्यामुळे अखेर निराश झालेल्या कुस्तीपटू विनेश फोगटने तीन पानी पत्राद्वारे भावनांना वाट मोकळी करून दिली.
Vinesh Phogat
PTI
Published on

नवी दिल्ली : पॅरिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतील पदक न्यायालयील संघर्षानंतरही निसटल्यामुळे अखेर निराश झालेल्या कुस्तीपटू विनेश फोगटने तीन पानी पत्राद्वारे भावनांना वाट मोकळी करून दिली. भारताच्या २९ वर्षीय महिला कुस्तीपटूने शुक्रवारी ट्विटरवर मन हळवे करणारे पत्र लिहिले. सांगण्यासाठी बरेच काही असले तरी त्यासाठी शब्द अपुरे आहेत, असेही तिने या पत्रात नमूद केले.

महिलांच्या ५० किलो वजनी गटात विनेशने अंतिम फेरीपर्यंत धडक मारली होती. मात्र अंतिम फेरीच्या दिवशी सकाळी १०० ग्रॅम वजन अधिक भरल्याने तिला अपात्र ठरवण्यात आले. त्यानंतर विनेशने निवृत्तीची घोषणा केली. तसेच क्रीडा लवादाकडे दाद मागूनही तिची मागणी फेटाळण्यात आल्याने विनेशच्या पदरी रौप्यपदकाऐवजी निराशाच पडली. शनिवारी विनेश भारतात परतणे अपेक्षित असून त्यापूर्वी तिने पोस्ट केलेल्या या पत्राद्वारे अनेकांची मने जिंकली आहेत.

“सांगण्यासाठी बरेच काही आहे. मात्र त्यासाठी पुरेसे शब्द सध्या माझ्याकडे नाहीत. योग्य वेळ येईल तेव्हा मी पुन्हा बोलेन. ६ ऑगस्टची रात्र व ७ ऑगस्टची सकाळ, याबाबत एवढेच सांगेन की आम्ही हार मानलेली नाही. आमचे प्रयत्न थांबले नाहीत, पण घड्याळाचा काटा आमच्यासाठी थांबला. ती वेळ योग्य नव्हती,” असे विनेश पत्राच्या अखेरीस म्हणाली आहे. मात्र तिचे पूर्ण पत्र नक्कीच सुरुवातीपासून वाचण्यायोग्य आहे.

“एका लहान गावातील एक लहान मुलगी असल्याने मला ऑलिम्पिक म्हणजे काय किंवा या रिंग्जचा अर्थ काय आहे हे माहित नव्हतं. इतर मुलींना वाटतं त्याप्रमाणे मलाही लांब केस ठेवून हातात मोबाईल घेऊन हिंडण्याची माझी स्वप्न होती. पण एक सामान्य बस ड्रायव्हर असलेले माझे वडील मला सांगायचे की एके दिवशी ते रस्त्यावरून गाडी चालवत असताना त्यांच्या मुलीला ते विमानात उंच उडताना पाहतील. आम्हा तिघांमध्ये मी सर्वांत लहान असल्याने त्यांची मी लाडकी होते. जेव्हा ते मला त्यांच्या स्वप्नाबद्दल सांगायचे तेव्हा मला या विचाराने हसायला यायचं. त्यावेळी मला त्याचा अर्थ समजत नव्हता. माझ्या आईने, जिच्या आयुष्यातील कष्टांवर एक संपूर्ण कथा लिहिली जाऊ शकते, तिचे फक्त स्वप्न होते की तिची सर्व मुले एक दिवस तिच्यापेक्षा चांगले जीवन जगतील. स्वतंत्र असणं आणि तिची मुलं स्वतःच्या पायावर उभी राहणं हे एवढंच तिचं स्वप्न होतं. तिच्या इच्छा आणि स्वप्ने माझ्या वडिलांपेक्षा खूप साधी होती,” असे विनेश सुरुवातीला म्हणाली.

“पण ज्या दिवशी माझे वडील आम्हाला सोडून गेले, तेव्हा माझ्याकडे फक्त त्यांचे विचार आणि त्या विमानात उड्डाण करण्याचे शब्द होते. मला त्यांच्या स्वप्नांचा अर्थ कळला नव्हता, तरीही त्यांचे शब्द माझ्याजवळ होते. माझ्या आईचे स्वप्न तर त्यापेक्षाही दूर गेले होते. कारण, वडिलांच्या मृत्यूनंतर आईलाही तिसऱ्या टप्प्यातील कर्करोग असल्याचं निदान झालं होतं. येथे तीन मुलांचा प्रवास सुरू झाला ज्यांनी आपल्या एकट्या आईला आधार देण्यासाठी आपले बालपण गमावले. आयुष्यातील वास्तवाचा सामना करत जगण्याच्या शर्यतीत उतरताना लवकरच माझी लांब केसांची, मोबाईल फोनची स्वप्ने धुळीस मिळाली,” अशी लहानपणीची दुःखद कहाणीही तिने सांगितली.

“आई नेहमी म्हणायची देव चांगल्या लोकांबरोबर कधीही वाईट घडू देत नाही. जेव्हा मी सोमवीर माझा पती आणि सोबती, आयुष्यातील सर्वोत्तम मित्र यांच्यासोबत हा खडतर मार्ग ओलांडला तेव्हा माझा यावर अधिक विश्वास बसला. सोमवीरने माझ्या प्रत्येक भूमिकेत मला साथ दिली आहे. जेव्हा आम्ही आव्हानाचा सामना केला तेव्हा आम्ही समान भागीदार होतो असे म्हणणे चुकीचे ठरेल, कारण त्याने प्रत्येक पायरीवर त्याग केला आणि माझे कष्ट घेतले, माझे नेहमीच संरक्षण केले. त्याने माझा प्रवास त्याची प्राथमिकता ठेवली आणि निष्ठा, समर्पण आणि प्रामाणिकपणाने राहण्यास प्रोत्साहित केलं. तो नसता तर मी माझ्या जीवनाची कल्पनाही करू शकत नाही. तो माझ्या पाठीशी आहे म्हणूनच मी इथे आहे. तो नेहमी माझ्या मागे उभा असतो आणि गरज असते तेव्हा माझ्यासमोर असतो. माझं नेहमी रक्षण करतो,” असेही विनेशने अखेरीस नमूद केले. तसेच सर्व प्रशिक्षक व त्यावेळी सोबत असणाऱ्या सहाय्यकांचे तिने आभारही मानले.

.... तर २०३२ पर्यंत खेळू शकले असते!

माझ्यावर अपात्रतेची कारवाई झाली नसती, तर कदाचित मी २०३२च्या ऑलिम्पिकपर्यंत खेळू शकले असते. मात्र आम्ही ज्या ध्येयासाठी प्रयत्न करत होतो, ते अपूर्ण राहिले. गोष्टी आता पूर्वीसारख्या होऊ शकत नाही. माझ्यात जिद्द व कुस्ती नेहमीच असेल. पण भविष्यात काय होईल, हे सांगणे कठीण आहे. योग्य गोष्टींसाठी नेहमीच लढत राहीन,” असेही विनेशने नमूद केले.

logo
marathi.freepressjournal.in