विनेशच्या ऑलिम्पिक सहभागावर टांगती तलवार

संयुक्त जागतिक कुस्ती संघटनेच्या (यूडब्ल्यूडब्ल्यू) नियमाला बगल देऊल एकाच दिवशी दोन वजनी गटांतून निवड चाचणी दिल्यामुळे भारताची अनुभवी कुस्तीगीर विनेश फोगट नव्याने अडचणीत आली आहे.
विनेशच्या ऑलिम्पिक सहभागावर टांगती तलवार

नवी दिल्ली : संयुक्त जागतिक कुस्ती संघटनेच्या (यूडब्ल्यूडब्ल्यू) नियमाला बगल देऊल एकाच दिवशी दोन वजनी गटांतून निवड चाचणी दिल्यामुळे भारताची अनुभवी कुस्तीगीर विनेश फोगट नव्याने अडचणीत आली आहे. या संदर्भात भारतीय कुस्ती महासंघाने (डब्ल्यूएफआय) जागतिक संघटनेकडे तक्रार केली आहे. त्यामुळे ‘यूडब्ल्यूडब्ल्यू’चा निर्णय येत नाही तोवर विनेशचा ऑलिम्पिक सहभाग अधांतरीच राहणार आहे.

विनेशने ५० आणि ५३ किलो अशा दोन वजनी गटांतून चाचणी देण्यासाठी सोमवारी सर्व अधिकाऱ्यांना वेठीस धरले होते. त्यामुळे निवड चाचणीस उशीर झाला होता. त्यानंतर चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर चाचणी घेणाऱ्या हंगामी समितीने विनेशला दोन्ही वजनी गटांतून चाचणी देण्यास परवानगी दिली. अर्थात, ‘यूडब्ल्यूडब्ल्यू’च्या नियम ७ नुसार, एका मल्लाला एकाच दिवशी दोन वजन गटांतून चाचणी देता येत नाही. मात्र, विनेशने या नियमाला बगल दिली. सोमवारी रात्री उशीरा हंगामी समितीचे अध्यक्ष भूपेंद्रसिंग बाजवा यांनी आपले अधिकार वापरून विनेशला दोन वजनी गटांतून खेळण्याची परवानगी दिल्याचे मान्य केले. यानंतर ‘डब्ल्यूएफआय’ने तातडीने ‘यूडब्ल्यूडब्ल्यू’ला या संदर्भात सूचित केले. ही चाचणी आम्ही घेतलेली नाही. यात आमचा काही संबंध नाही, असेही ‘डब्ल्यूएफआय’ने स्पष्ट केले आहे. त्यांच्या या कृतीने भारतीय संघाबाबत नव्याने संभ्रम निर्माण झाला आहे.

चाचणी हंगामी समितीने घ्यायची आणि संघ ‘डब्ल्यूएफआय’ने पाठवायचा असे ठरले होते. मात्र, ‘डब्ल्यूएफआय’ने महिलांच्या ५० आणि ५३ किलो चाचणी संदर्भात जबाबदारी घेण्यास नकार दिल्यामुळे आता ‘यूडब्ल्यूडब्ल्यू’च्या निर्णयावर सर्व अवलंबून राहणार आहे. या चाचणीत विनेश ५३ किलो वजन गटातून पराभूत झाली, पण ५० किलो गटातून तिने विजेतेपद मिळवले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in