

भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगट हिने निवृत्तीचा निर्णय मागे घेतला असून पुन्हा एकदा कुस्तीच्या मॅटवर परतण्यास सज्ज झाली आहे. २०२८ मध्ये होणाऱ्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये (LA28) पदक जिंकण्याचं लक्ष्य ठेवत विनेशने निवृत्ती मागे घेत असल्याचे शुक्रवारी (दि.१२) जाहीर केले. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये फायनलच्या काही तास आधी वजन १०० ग्रॅम जास्त आढळल्यामुळे स्पर्धेबाहेर जावे लागल्यानंतर विनेशने निवृत्ती जाहीर केली होती.
सोशल मीडियावर एक पोस्ट करीत विनेशने निवृत्ती मागे घेत असल्याचे जाहीर केले. भावनिक पोस्टमध्ये विनेशने, "आजही मला हा खेळ मनापासून आवडतो. आजही मला स्पर्धा करायची आहे. यावेळी मी एकटी नाही. माझा मुलगा आता माझ्या टीमचा भाग आहे. निडर मनाने आणि कधीही न झुकणारी जिद्द घेऊन मी ऑलिम्पिककडे पुन्हा पाऊल टाकतेय' असेही सांगितले.
‘पॅरिसनंतर सगळं संपलं का?’ - विनेशचा आत्मचिंतनाचा काळ
“पॅरिसनंतर सगळं संपलं का, असा प्रश्न लोक मला सतत विचारत होते. खूप काळ माझ्याकडे त्याचं उत्तर नव्हतं. मला मॅटपासून, दडपणापासून, अपेक्षांपासून, अगदी माझ्या स्वतःच्या महत्त्वाकांक्षांपासूनही थोडा वेळ दूर जायचं होतं,” असं विनेशने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं.
“अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच मी स्वतःला मोकळा श्वास घेऊ दिला. माझ्या प्रवासातील यश-अपयश, त्याग आणि जगाला कधीच न दिसलेली माझी अनेक रूपं समजून घेतली...आणि त्याच आत्मचिंतनात मला उमगलं - आजही मला हा खेळ मनापासून आवडतो. आजही मला स्पर्धा करायची आहे.”
‘माझ्यातली आग कधीच विझली नव्हती’
“त्या शांततेत मला एक गोष्ट पुन्हा आठवली...माझ्यातली आग कधीच विझली नव्हती... ती फक्त थकवा आणि गोंगाटाखाली दडली होती. शिस्त, दिनक्रम, लढण्याची वृत्ती - हे सगळं माझ्या रक्तात आहे. मी कितीही दूर गेले तरी माझा एक भाग कायम मॅटवरच राहिला,” असं ती म्हणाली.
लॉस एंजेलिस ऑलिम्पिककडे (LA28) पाऊल ; यावेळी मुलगाही सोबत
"म्हणूनच आता मी लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये (LA28) पुन्हा पाऊल टाकतेय. निडर मनाने आणि कधीही न झुकणारी जिद्द घेऊन...यावेळी मी एकटी नाही. माझा मुलगा आता माझ्या टीमचा भाग आहे... माझी सर्वात मोठी प्रेरणा आणि या प्रवासातला माझा लहानसा चीअरलीडर," असंही विनेशने नमूद केलं.
पॅरिसमधील ऐतिहासिक कामगिरी, पण अखेर अपात्रता
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगटने इतिहास रचत ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू होण्याचा मान मिळवला होता. या वाटचालीत तिने जपानच्या चार वेळा जागतिक विजेत्या युई सुसाकीला पराभूत करत सर्वांचं लक्ष वेधलं होतं. मात्र अंतिम सामन्याच्या दिवशी दुसऱ्या वजन तपासणीत ठरावीक वजनापेक्षा जास्त वजन आढळल्याने तिला अपात्र ठरवण्यात आलं आणि तिचं ऑलिम्पिक पदकाचं स्वप्न अपूर्ण राहिलं. या निर्णयाविरोधात विनेशने कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्स (CAS) कडे धाव घेत संयुक्त रौप्यपदकाची मागणी केली होती. मात्र CAS च्या अॅड-हॉक विभागाने तिची याचिका फेटाळून लावली.
राजकारणातही सक्रिय
यानंतर विनेश फोगटने बजरंग पुनियासह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. २०२४ च्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत तिने जिंदमधील जुलाना मतदारसंघातून भाजपच्या योगेश बजरंगी यांचा पराभव करत विजय मिळवला. आता पुन्हा ती मॅटवर परतण्यास सज्ज झाली आहे.