विनेश फोगटची खेलरत्न, अर्जुन पुरस्कारवापसी
PM

विनेश फोगटची खेलरत्न, अर्जुन पुरस्कारवापसी

विनेश फोगटनेही आपला मेजर ध्यानचंद खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आहे

नवी दिल्ली : केंद्र सरकारने भारतीय कुस्ती महासंघाची मान्यता रद्द केल्यानंतरही कुस्तीमधील ‘दंगल’ अद्याप संपलेली नाही. साक्षी मलिकने जाहीर केलेली निवृत्ती, बजरंग पुनियाने पद्मश्री पुरस्कार परत केल्यानंतर आता राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या विनेश फोगटनेही आपला मेजर ध्यानचंद खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्राद्वारे तिने हा निर्णय कळवला आहे.

“मी माझा मेजर ध्यानचंद खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत करणार आहे. माझी अशी अवस्था करणाऱ्या ‘त्या’ ताकदवान व्यक्तीचे खूप खूप आभार,” असे विनेशने ‘एक्स’वर म्हटले आहे. महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण झाल्याबद्दल तत्कालिन अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्याविरोधात दंड ठोपटल्यानंतर त्यांच्याच मर्जीतील संजय सिंह भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी निवडून आले. त्यानंतर ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या साक्षी मलिक हिने कुस्तीतून निवृत्त होण्याची घोषणा केली. पाठोपाठ टोक्यो ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेत्या बजरंग पुनियाने पद्मश्री पुरस्कार परत करण्याची घोषणा केली.

विनेशने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले की, “देशासाठी ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना हे सगळं करण्यास भाग पाडण्यात आलं आहे. हे आम्हाला का करावं लागतंय, ते संपूर्ण देशाला माहिती आहे. तुम्ही देशाचे प्रमुख आहात. ही बाब नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचली असेल. पंतप्रधान मोदीजी, मी तुमच्या घरची लेक विनेश फोगाट आहे, मी गेल्या वर्षभरापासून ज्या अवस्थेत आहे, तेच सांगण्यासाठी तुम्हाला पत्र लिहित आहे. कुस्ती खेळणाऱ्या आपल्या तरुणींनी गेल्या काही वर्षांमध्ये खूप काही भोगलंय. आमचा जीव गुदमरतोय. साक्षीने आता कुस्तीतून संन्यास घेतला आहे. तर आमचं शोषण करणारा सगळ्यांना सांगत फिरतोय की, त्याचा कसा दबदबा आहे. त्याने याबाबत उद्धटपणे घोषणाबाजीदेखील केली.”

“मोदीजी, तुम्ही तुमच्या आयुष्यातील पाच मिनिटे काढा आणि त्या व्यक्तीने मीडियात दिलेली विधाने ऐका. तुम्हाला कळेल की त्याने काय केले आहे. त्याने महिला कुस्तीपटूंना ‘मंथरा’ म्हटले. इतकेच नव्हे तर महिला कुस्तीपटूंना अस्वस्थ करण्याची जाहीर कबुली दिली आहे आणि आम्हा महिलांना अपमानित करण्याची एकही संधी सोडली नाही. याहून गंभीर बाब म्हणजे किती महिला कुस्तीपटूंना मागे हटण्यास भाग पाडले. हे खूप भीतीदायक आहे.”

आम्हाला देशद्रोही ठरवले

“या सर्व घटना विसरण्याचा अनेकदा प्रयत्न केला, पण ते इतके सोपे नाही. मोदीजी, जेव्हा मी तुम्हाला भेटले, तेव्हा सर्व गोष्टी सांगितल्या. न्यायासाठी आम्ही वर्षभरापासून रस्त्यावर आहोत. आमची काळजी कोणी घेत नाही. आमची पदके आणि पुरस्कारांची किंमत १५ रुपये असल्याचे सांगितले जाते. पण, ही पदके आपल्याला आपल्या प्राणापेक्षाही जास्त प्रिय आहेत. जेव्हा आम्ही देशासाठी पदके जिंकली, तेव्हा संपूर्ण देशाला आमचा अभिमान वाटायचा. आता आम्ही आमच्या न्यायासाठी आवाज उठवल्याने आम्हाला देशद्रोही म्हटले जात आहे. आता पुरस्कारांचीही किळस येत आहे,’’ अशी खंतही विनेश फोगटने व्यक्त केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in