विराट तब्बल चौथ्यांदा वर्षातील सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटू

. विराटने शुभमन गिल, मोहम्मद शमी व न्यूझीलंडचा डॅरेल मिचेल यांना पिछाडीवर टाकून हा पुरस्कार जिंकला.
विराट तब्बल चौथ्यांदा वर्षातील सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटू

दुबई : भारताचा तारांकित फलंदाज विराट कोहलीने गुरुवारी कारकीर्दीत विक्रमी चौथ्यांदा आयसीसीच्या वर्षातील सर्वोत्तम पुरुष एकदिवसीय क्रिकेटपटूच्या पुरस्कारावर मोहर उमटवली. २०२३ या वर्षात विराटने एकदिवसीय कारकीर्दीतील ५० शतकांचा टप्पा गाठतानाच भारताला विश्वचषकाच्या अंतिम फेरीपर्यंत नेण्यात मोलाची भूमिका बजावली. त्यामुळे आयसीसीने विराटची या पुरस्कारासाठी निवड केली. विराटने शुभमन गिल, मोहम्मद शमी व न्यूझीलंडचा डॅरेल मिचेल यांना पिछाडीवर टाकून हा पुरस्कार जिंकला.

३५ वर्षीय विराटने गतवर्षी २७ एकदिवसीय सामन्यांत ६ शतके व ८ अर्धशतकांसह १,३७७ धावा केल्या. तसेच सचिन तेंडुलकरच्या ४९ शतकांचा विक्रम मोडीत काढला. त्याने विश्वचषकात सर्वाधिक ७५६ धावा करतानाच स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कारही पटकावला. विराटने यापूर्वी २०१२, २०१७, २०१८ या तीन वर्षीसुद्धा हा पुरस्कार पटकावला होता. तसेच त्याचा कारकीर्दीतील हा एकंदर सातवा आयसीसी पुरस्कार ठरला. विराटने २०१८मध्ये वर्षातील सर्वोत्तम कसोटीपटूतर २०१७ व २०१८मध्ये वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कारही मिळवला होता.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा उस्मान ख्वाजा २०२३ या वर्षातील सर्वोत्तम कसोटीपटू तर ऑस्ट्रेलियाचाच कर्णधार पॅट कमिन्स हा वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू (तिन्ही प्रकार मिळून) ठरला. कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने गतवर्षी एकदिवसीय विश्वचषक, कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद मिळवले.

logo
marathi.freepressjournal.in