IND vs SA: रांचीत विराटचे 'बावन'कशी शतक! पहिल्या सामन्यात भारताची दक्षिण आफ्रिकेवर १७ धावांनी सरशी; रोहितचे अर्धशतक

भारताचा तारांकित फलंदाज विराट कोहलीने (१२० चेंडूंत १३५ धावा) रविवारी एकदिवसीय कारकीर्दीतील ५२वे शतक झळकावले. विराटच्या बावनकशी शतकाला रोहित शर्मा (५१ चेंडूंत ५७ धावा) आणि कर्णधार के. एल. राहुल (५६ चेंडूंत ६० धावा) यांच्या अर्धशतकांची उत्तम साथ लाभली. त्यामुळे भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर १७ धावांनी मात केली.
IND vs SA: रांचीत विराटचे 'बावन'कशी शतक! पहिल्या सामन्यात भारताची दक्षिण आफ्रिकेवर १७ धावांनी सरशी; रोहितचे अर्धशतक
Published on

रांची : भारताचा तारांकित फलंदाज विराट कोहलीने (१२० चेंडूंत १३५ धावा) रविवारी एकदिवसीय कारकीर्दीतील ५२वे शतक झळकावले. विराटच्या बावनकशी शतकाला रोहित शर्मा (५१ चेंडूंत ५७ धावा) आणि कर्णधार के. एल. राहुल (५६ चेंडूंत ६० धावा) यांच्या अर्धशतकांची उत्तम साथ लाभली. त्यामुळे भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर १७ धावांनी मात केली. एकंदर रोहित-विराटच्या कामगिरी व भारताच्या विजयामुळे रविवार देशवासियांसाठी आनंदाचा ठरला.

झारखंड क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, रांची येथे झालेल्या या लढतीत भारताने दिलेल्या ३५० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेने अखेरच्या षटकापर्यंत कडवी झुंज दिली. मात्र ४९.२ षटकांत त्यांचा संघ ३३२ धावांत गारद झाला. मॅथ्यू ब्रीट्झके (८० चेंडूंत ७२), मार्को यान्सेन (३९ चेंडूंत ७०) आणि कॉर्बिन बोश (५१ चेंडूंत ६७) यांनी शानदार अर्धशतके साकारून आफ्रिकेच्या आशा कायम राखल्या होत्या. मात्र प्रसिध कृष्णाच्या गोलंदाजीवर रोहितने ५०व्या षटकात बोशचा झेल घेतला व भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. चायनामन फिरकीपटू कुलदीप यादवने ४ बळी घेत गोलंदाजीत छाप पाडली. याबरोबरच भारताने ३ लढतींच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली असून आता बुधवारी रायपूर येथे दुसरा सामना खेळवण्यात येईल.

आफ्रिकेचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. त्यांनी कसोटी मालिकेत भारताला २-० अशी धूळ चारली. आता ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेनंतर उभय संघांत पाच टी-२० सामनेही होणार आहेत. एकदिवसीय मालिकेसाठी अनुभवी फलंदाज राहुलकडे भारतीय संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. शुभमन गिल व श्रेयस अय्यर हे नियमित कर्णधार व उपकर्णधार विविध दुखापतीमुळे एकदिवसीय मालिकेला मुकणार असल्याने राहुलवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या मालिकेच्या निमित्ताने चाहत्यांना पुन्हा एकदा ३८ वर्षीय रोहित व ३७ वर्षीय विराट यांना खेळताना पाहण्याची संधी मिळत आहे.

दरम्यान, या लढतीतही भारताने नाणेफेक गमावली. टेम्बा बव्हुमाला या लढतीसाठी विश्रांती देण्यात आल्याने एडीन मार्करम आफ्रिकेचे नेतृत्व करत होता. त्याने भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारताने गिलच्या अनुपस्थितीत सलामीसाठी मुंबईकर यशस्वी जैस्वालला संधी दिली, तर चौथ्या स्थानावर महाराष्ट्राचा २८ वर्षीय फलंदाज ऋतुराज गायकवाडला प्राधान्य दिले. भारताकडून ६ एकदिवसीय व २३ टी-२० सामने खेळण्याचा अनुभव असलेला ऋतुराज शेवटचा एकदिवसीय सामना डिसेंबर २०२३मध्ये खेळला होता.

प्रथम फलंदाजी करताना रोहित व यशस्वी यांनी आक्रमक सुरुवातीवर भर दिला. मात्र यशस्वी चौथ्याच षटकात १६ चेंडूंत १८ धावा काढून बाद झाला. त्यानंतर मैदानात रोहित-विराटची जोडी जमली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑक्टोबरमध्ये झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात या दोघांनी शतकी भागीदारी साकारली होती. त्यानंतर प्रथमच एकत्रित खेळताना चाहते पुन्हा रोहित-विराटच्या (रोको) फलंदाजीचा आस्वाद लुटण्यास तयार होते. त्यांनीही चाहत्यांना निराश केले नाही.

रोहितने ५ चौकार व ३ षटकारांह ५१ चेंडूंत ५७ धावा फटकावताना ५९वे अर्धशतक साकारले. तर विराटनेही यावेळी अर्धशतकापूर्वीच दोन षटकार लगावताना १००हून अधिक स्ट्राइक रेटने फलंदाजी केली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १३६ धावांची भागीदारी रचली. यान्सेनने रोहितला पायचीत पकडून ही जोडी फोडली. मग ऋतुराज (८) व पाचव्या क्रमांकावरील वॉशिंग्टन सुंदर (१३) फारशी छाप पाडू शकले नाहीत. त्यामुळे भारताची १ बाद १६० वरून ४ बाद २०० अशी काहीशी घसरण झाली.

विराटने मग कर्णधार राहुलच्या साथीने संघाला सावरले. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी ७६ धावांची भर घातली. अखेर ३८व्या षटकात यान्सेनला चौकार लगावून विराटने थाटात शतक पूर्ण केले. त्याने सेलिब्रेशनही पाहण्यासारखे होते. शतकानंतरही विराटचे आक्रमण सुरूच राहिले. दुसऱ्या बाजूने राहुलने २ चौकार व ३ षटकारांसह एकदिवसीय कारकीर्दीतील १९वे अर्धशतक पूर्ण केले.

नांद्रे बर्गरच्या गोलंदाजीवर ४३व्या षटकात विराट बाद झाला. त्याने ११ चौकार व ७ षटकारांसह १३५ धावा केल्या. त्यानंतर रवींद्र जडेजा (२० चेंडूंत ३२) व राहुल यांनी मिळून संघाला ५० षटकांत ८ बाद ३४९ धावांचा डोंगर उभारून दिला. आफ्रिकेने २३ धावा अवांतरही दिल्या.

आफ्रिकेने मग रायन रिकल्टन (०), क्विंटन डीकॉक (०) यांना स्वस्तात गमावले. हर्षित राणाने त्यांना बाद केले. मग ब्रीट्झके, यान्सेन, बोश यांनी अखेरपर्यंत झुंज दिली. परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश लाभले नाही व भारताने १७ धावांनी रोमहर्षक विजय मिळवून मालिकेत आघाडी घेतली.

संक्षिप्त धावफलक

भारत : ५० षटकांत ८ बाद ३४९ (विराट कोहली १३५, के. एल. राहुल ६०, रोहित शर्मा ५७; ओटनिल बार्टमन २/६०) विजयी वि. g दक्षिण आफ्रिका : ४९.२ षटकांत सर्व बाद ३३२ (मॅथ्यू ब्रीट्झके ७२, मार्को यान्सेन ७०, कॉर्बिन बोश ६७; कुलदीप यादव ४/६८)

सामनावीर : विराट कोहली

हे आकडे महत्त्वाचे!

  • ३५२ एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार लगावणाऱ्यांच्या यादीत रोहितने अग्रस्थान मिळवले. रोहितने पाकिस्तानच्या शाहीद आफ्रिदीला (३५१) पिछाडीवर टाकले. रोहितच्या नावावर सध्या ३५२ षटकार आहेत.

  • ५२ विराटने एकदिवसीय कारकीर्दीतील ५२वे शतक साकारले. २०२५ या वर्षातील त्याचे हे दुसरे शतक ठरले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके साकारणाऱ्यांच्या यादीत त्याने २०२३मध्येच सचिन तेंडुलकरला (४९) मागे टाकले होते.

  • ८३ विराटची आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील शतकांची संख्या ८३ झाली आहे. यामध्ये कसोटीतील ३०, एकदिवसीय प्रकारातील ५२, तर टी-२०तील एका शतकाचा समावेश आहे. सचिनच्या १०० शतकांच्या विक्रमापासून विराट १७ शतके दूर आहे.

  • ३ विराटने रांची येथे तिसरे शतक साकारले. तसेच रांची येथे प्रथमच भारताने ३४९ इतकी धावसंख्या उभारली.

logo
marathi.freepressjournal.in