आशिया चषकात खेळण्याबाबत विराट कोहली संभ्रमावस्थेत; चाहत्यांमध्ये औत्सुक्य निर्माण

विराटने आपल्या पुनरागमनाबाबत स्वत: निवड समितीशी चर्चा केल्याचे वृत्त समोर आले आहे
आशिया चषकात खेळण्याबाबत  विराट कोहली   संभ्रमावस्थेत; चाहत्यांमध्ये औत्सुक्य निर्माण

झिम्बाब्वेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी निवडलेल्या संघामध्ये माजी कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीच्या नावाचा समावेश नसल्यामुळे तो आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत खेळण्याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. तो क्रिकेटच्या मैदानावर केव्हा पुनरागमन करणार, याबाबत त्याच्या चाहत्यांमध्ये औत्सुक्य निर्माण झाले आहे. उलटसुलट चर्चांचे पेव फुटले आहे. या दरम्यान, विराटने आपल्या पुनरागमनाबाबत स्वत: निवड समितीशी चर्चा केल्याचे वृत्त समोर आले आहे.

झिम्बाब्वेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत विराट कोहली खेळण्याची शक्यता होती. मात्र, संघात त्याचे नावच नाही. त्यामुळे विराट कोहलीला जाणीवपूर्वक वगळल्याची चर्चा सुरू झाली.

पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार कोहलीने स्वत: झिम्बाब्वे दौऱ्यासाठी सुट्टी मागितली आहे. त्यानंतर होणाऱ्या आशिया चषकापासून तो भारतीय संघात पुनरागमन करणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोहली खराब फॉर्मशी झुंज देत आहे. अशातच दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी-२० मालिका आणि वेस्ट इंडिज दौऱ्यात त्याला विश्रांती देण्यात आली. त्यामुळे तो सध्या क्रिकेटपासून दूर आहे. वृत्तानुसार, कोहलीने त्याच्या पुनरागमनाबाबत निवडकर्त्यांशी संवाद साधला आहे. तो आशिया चषक स्पर्धेत परतण्याची शक्यता व्यक्त होत असून त्यानंतर सातत्याने खेळणार असल्याचे सूत्रांकडून समजते. चाहत्यांना कोहलीच्या फॉर्मची चिंता आहे. कोहली सतत खेळला तरच तो आपला गमावलेला फॉर्म परत मिळवू शकेल, असे चाहत्यांचे आणि काही क्रिकेट तज्ज्ञांचे मत आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in