

बंगळुरू : भारताचा तारांकित फलंदाज विराट कोहलीने पुढील वर्षी होणारा विश्वचषक खेळण्यावर आपले लक्ष केंद्रित केले असले तरी, संघातील स्वतःच्या स्थानाबाबत आणि उपयुक्ततेबाबत त्याने स्पष्ट भूमिका मांडली आहे. जर सातत्याने माझ्या पात्रतेवर शंका उपस्थित केली जात असेल, तर ते ठिकाण माझ्यासाठी नाही, असे विराटने स्पष्टपणे सांगितले आहे. आपल्या ‘रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू’ या आयपीएल फ्रँचायझीच्या पॉडकास्टवर बोलताना ३७ वर्षीय कोहलीने ही भावना व्यक्त केली.
“मी दररोजच्या आयुष्यात स्वतःला सज्ज ठेवत असतो. २०२७च्या विश्वचषकाबद्दल मला अनेकदा विचारले जाते, परंतु त्याचे उत्तर माझ्याकडे स्पष्ट आहे. जर मी खेळत असेन, तर मला ते मनापासून करायचे आहे. भारतासाठी विश्वचषक खेळणे ही एक विलक्षण गोष्ट आहे, पण माझ्यामते हे मूल्य दोन्ही बाजूंनी जपले गेले पाहिजे. मी ज्या वातावरणात आहे, तेथे माझे मोल असणे गरजेचे आहे. जर मला माझी उपयुक्तता सिद्ध करावी लागत असेल, तर मी त्या ठिकाणी राहू इच्छित नाही,” असे विराट म्हणाला.
विराटने २०२४ मध्ये टी-२० क्रिकेटमधून आणि २०२५मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली असून तो आता फक्त एकदिवसीय प्रकारात खेळतो. एकदिवसीय सामन्यांचे वेळापत्रक कमी झाल्यामुळे कोहली आता भारतीय संघात क्वचितच दिसतो. आगामी १४ ते १९ जुलै दरम्यान इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या मालिकेसाठी तो संघात असेल. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी कोहली आणि रोहित शर्मा यांच्या भविष्याबद्दल कोणतीही स्पष्ट भूमिका घेतलेली नाही.
मी माझ्या खेळाशी प्रामाणिक असून मैदानावर इतरांपेक्षा जास्त मेहनत घेतो. ४० षटके सीमारेषेवर धावण्याची माझी तयारी असते, कारण मी तसा सराव करतो. पण एवढे करूनही जर मला माझी किंमत सिद्ध करावी लागत असेल, तर ते ठिकाण माझ्यासाठी नाही,” असे विराटने सांगितले. निवड प्रक्रियेबाबत त्याने स्पष्ट केले की, “गोष्टी गुंतागुंतीच्या करू नका. एकतर सुरुवातीलाच सांगा की माझी गरज नाही, पण जर मी सक्षम आहे असे मानत असाल, तर निकालांवरून वारंवार भूमिका बदलू नका.”
कोहलीने २०२५-२६ च्या हंगामात विजय हजारे करंडकात दिल्लीसाठी खेळताना केलेल्या शतकाचा आणि १६ हजार लिस्ट-ए धावा पूर्ण केल्याचा संदर्भ दिला. तिथे मी कोणाला काही सिद्ध करायला गेलो नव्हतो, तर खेळावरील प्रेमापोटी मैदानात उतरलो होतो आणि तिथे मला पुन्हा लहान मुलासारखा आनंद मिळाल्याचे त्याने नमूद केले.