

भारत-ऑस्ट्रेलिया संघांमध्ये बॉर्डर-गावस्कर करंडकासाठी 'कांटे की टक्कर' बघायला मिळत आहे. पाच सामन्यांच्या मालिकेतील तिसरी कसोटी (ब्रिस्बेन टेस्ट) अनिर्णित राहिल्यानंतर २६ डिसेंबर रोजीच्या बॉक्सिंग डेनिमित्त होणाऱ्या चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघातील काही खेळाडू गुरूवारी मेलबर्न येथे दाखल झाले. यावेळी मेलबर्न विमानतळावर भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीचा ऑस्ट्रेलियन महिला पत्रकारासोबत वाद झाल्याचं बघायला मिळालं. थोड्याच वेळात हा वाद निवळला, मात्र घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.
नेमकं काय झालं?
विराट पत्नी अनुष्का शर्मा आणि मुलांसह (वामिका आणि अकाय) मेलबर्न विमानतळावर पोहोचला. त्यावेळी 'चॅनल 7' या ऑस्ट्रेलियन वाहिनीच्या पत्रकाराने त्याचा व्हिडिओ बनवला. ते बघून विराट चिडला आणि कुटुंबासमवेत असल्याचे सांगत महिला पत्रकाराला कुटुंबियांचे फोटो हटवण्याची विनंती केली. "माझ्या मुलांसोबत मला काही प्रायव्हसीची गरज आहे, तुम्ही मला विचारल्याशिवाय फोटो/व्हिडिओ काढू शकत नाही," असे विराट म्हणाला. त्यावर, विमानतळ सार्वजनिक स्थळ असल्याचे उत्तर त्याला मिळाले. ऑस्ट्रेलियन कायद्यानुसार, कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही सेलिब्रिटीचे फोटो काढणे किंवा व्हिडिओ बनवणे यावर कोणतेही बंधन नाही. मात्र, थोड्याच वेळात, मुलांचे फोटो काढले नसल्याचे कोहलीला सांगितल्यावर त्याने मीडियासोबतचा गैरसमज दूर केला आणि चॅनल 7 च्या कॅमेरामनशी हस्तांदोलनही केलं.
कोहली त्याच्या कुटुंबीयांना, विशेषतः मुलांना नेहमीच मीडियापासून पासून दूर ठेवतो. लहान मुलांचे फोटो काढू नका, अशी विनंती तो अनेकदा मीडियाला करताना दिसला आहे. दरम्यान, एक दिवसापूर्वीच कोहलीने निवृत्तीची घोषणा केलेल्या रविचंद्रन अश्विनसाठी एक भावूक पोस्ट लिहिली होती.