ओव्हल येथे इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या वन-डे सामन्यात भारताने १०विकेट्स राखून दणदणीत विजय मिळविल्यानंतर आता दुसरा सामना गुरुवारी क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर होत आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतल्याने टीम इंडिया या सामना जिंकून मालिका खिशात घालण्यास उत्सुक आहे. मालिकेतील आपले आव्हान टिकविण्यासाठी इंग्लंडला मात्र हा सामना जिंकणे आवश्यक आहे. दरम्यान, या वन-डे सामन्यालाही माजी कर्णधार विराट कोहली मुकण्याची शक्यता व्यक्त होत असून तो खेळण्याबाबत संभ्रमावस्था आहे. मांडीचा स्नायू दुखावल्यामुळे कोहली पहिल्या सामन्यात खेळू शकला नव्हता.
एका वृत्तसंस्थेला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सूत्रांनी माहिती दिली की, कोहली मांडीच्या स्नायूदुखीतून अजून बरा झालेला नाही. त्यामुळे तो दुसऱ्या वन-डे सामन्याला देखील मुकण्याची शक्यता आहे. ओव्हलवर मंगळवारी झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात विराट कोहलीच्या जागी श्रेयस अय्यरला संघात स्थान देण्यात आले होते.
या सामन्यात भारतीय संघात एक मोठा बदल केला जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णाला विश्रांती देऊन शार्दुल ठाकूरला संधी दिली जाऊ शकते, असे सांगण्यात येते. शार्दुल संघात आल्यास एक अष्टपैलू खेळाडू भारताला मिळू शकतो. त्यामुळे भारताची गोलंदाजी आणि फलंदाजी अधिक सक्षम होऊ शकते. पहिल्या सामन्यातजसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीने भेदक मारा करत इंग्लंडचा संपूर्ण डाव ११० धावात गुंडाळला होता. बुमराहने १९ धावात सहा, तर मोहम्मद शमीने ३१ धावात तीन बळी टिपले होते. ग प्रसिद्ध कृष्णाने एक विकेट घेत त्यांना शानदार साथ दिली होती. त्यानंतर गोलंदाजांनी उभारलेल्या या मजबूत पायावर सलामीवीर रोहित शर्मा (५८ चेंडूंत नाबाद ७६) आणि शिखर धवन (५४ चेंडूत नाबाद ३१) यांनी विजयाचा कळस चढविला होता. या दोघांनी नाबाद १११ धावांची भागीदारी रचत इंग्लंडचे आव्हान एकही गडी न गमावता साध्य केले होते. मालिका खिशात घालण्यासाठी भारतीय संघाला फलंदाजी, गोलंदाजी याबरोबरच क्षेत्ररक्षणातील सातत्यही टिकवून ठेवावे लागेल.
मालिकेतील आव्हान टिकविण्यासाठी इंग्लंडचा फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण अश सर्वच आघाड्यांवर सुधारणा करावी लागेल. पहिल्या सामन्यात इंग्लंडची फलंदाजी गडगडली हे ढळढळीतपणे स्पष्ट असले, तरी त्यांना सलामीची जोडी फोडण्यातही अपयश आले, ही बाब दुर्लक्षून चालणार नाही.
इंग्लंडकडून कर्णधार जोस बटरलने सर्वाधिक ३० धावा केल्या;पण आव्हानात्मक धावसंख्येसाठी या पुरेशा नव्हत्या. त्यामुळे इंग्लंडचा संघ कोणतीं रणनीती ठरवितो, ते पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.