कोहली, रोहितची ब श्रेणीत गच्छंती; BCCI मध्यवर्ती करारातून 'अ' प्लस श्रेणी रद्द

भारतीय संघातील सर्वात अनुभवी खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची बीसीसीआयच्या मध्यवर्ती करारात ब गटात घसरण झाली आहे. ७ कोटींचे शुल्क असलेली अ प्लस श्रेणी बीसीसीआयने यावेळी रद्द केली आहे.
कोहली, रोहितची ब श्रेणीत गच्छंती; BCCI मध्यवर्ती करारातून अ प्लस श्रेणी रद्द
कोहली, रोहितची ब श्रेणीत गच्छंती; BCCI मध्यवर्ती करारातून अ प्लस श्रेणी रद्दसंग्रहित छायाचित्र
Published on

नवी दिल्ली : भारतीय संघातील सर्वात अनुभवी खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची बीसीसीआयच्या मध्यवर्ती करारात ब गटात घसरण झाली आहे. ७ कोटींचे शुल्क असलेली अ प्लस श्रेणी बीसीसीआयने यावेळी रद्द केली आहे. बीसीसीआयने सोमवारी ३० पुरुष आणि २१ महिला खेळाडूंना अ, ब आणि क या श्रेणीत समाविष्ट करून घेतले आहे.

या मोसमात खेळले गेलेले सामने तसेच त्यातील कामगिरी यावरून खेळाडूंना मध्यवर्ती करारात सामील करून घेण्यात आले आहे. भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिल, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा आणि अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा यांनी अ श्रेणीत आपले स्थान कायम राखले आहे. अ श्रेणीतील खेळाडूंना वार्षिक ५ कोटी, ब श्रेणीतील खेळाडूंना ३ कोटी तर क गटातील खेळाडूंना १ कोटी रुपयांचे अतिरिक्त शुल्क बीसीसीआयकडून देण्यात येते.

कसोटी आणि टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती पत्करल्यामुळे कोहली आणि रोहितचे सामने कमी झाले असून त्यांना त्यांच्या कामगिरीनुसार सर्वोत्तम ब गटात स्थान मिळाले आहे. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात खेळणाऱ्या खेळाडूंना अ प्लस श्रेणीत स्थान देण्यात येते. त्यानुसार गेल्या वर्षी कोहली, रोहित, जडेजा आणि बुमरा या खेळाडूंना स्थान मिळाले होते. यावेळी कोहली आणि रोहित फक्त एकाच प्रकारात खेळत असून जडेजाचे तिन्ही प्रकारातील स्थान डळमळीत झाले आहे. बुमरा हा एकमेव खेळाडू सध्या क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये खेळत आहे. त्यामुळेच बीसीसीआयने ही श्रेणी रद्द करण्याचा निर्णय घेतला. बुमराला गेल्या वेळी ७ कोटींचे मानधन मिळाले होते, मात्र पात्रता असूनही बुमराला ७ कोटींच्या मानधनावर पाणी सोडावे लागले आहे.

शमीला करारातून वगळले

गेल्या वेळी ३४ खेळाडूंना मध्यवर्ती करारात संधी मिळाली होती, मात्र यावेळी ही संख्या ३०वर आली आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी, सलामीवीर फलंदाज इशान किशन, मध्यमगती गोलंदाज मुकेश कुमार आणि मुंबईचा फलंदाज सर्फराझ खान यांना करारात स्थान मिळाले नाही. या खेळाडूंनी क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात गेल्या वर्षात एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. निवड समितीच्या भविष्यातील खेळाडूंच्या यादीत नसल्यामुळे शमीला संधी देण्यात आली नाही. सर्फराझ हा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघात होता, मात्र त्याला एकाही सामन्यात संधी मिळाली नाही.

जेमिमाला अ श्रेणीत बढती

कर्णधार हरमनप्रीत कौर, दीप्ती शर्मा आणि स्मृती मानधना यांनी महिलांच्या मध्यवर्ती करारात अ श्रेणीत आपले स्थान कायम राखले आहे. भारताला विश्वचषक जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावणारी मुंबईची खेळाडू जेमिमा रॉड्रिग्ज हिला अ श्रेणीत बढती मिळाली आहे. स्नेह राणा हिचेही ब श्रेणीत प्रमोशन झाले आहे. त्याचबरोबर शफाली वर्मा, रिचा घोष, रेणुका सिंग ठाकूर यांना ब श्रेणीत स्थान देण्यात आले आहे. १३ महिला खेळाडू क श्रेणीत आहेत. बीसीसीआयच्या महिलांच्या मध्यवर्ती करारानुसार, अ, ब आणि क श्रेणीतील खेळाडूंना अनुक्रमे ५० लाख, ३० लाख आणि १० लाखांचे मानधन देण्यात येते.

मध्यवर्ती करार (पुरुष)

  • अ श्रेणी (५ कोटी) : शुभमन गिल, जसप्रीत बुमरा, रवींद्र जडेजा

  • ब श्रेणी (३ कोटी) : विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल, मोहम्मद सिराज, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, ऋषभ पंत, कुलदीप यादव, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर.

  • क श्रेणी (१ कोटी) : अक्षर पटेल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, शिवम दुबे, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग, प्रसिध कृष्णा, आकाश दीप, ध्रूव जुरेल, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, नितीशकुमार रेड्डी, अभिषेक शर्मा, साई सुदर्शन, रवी बिश्णोई, ऋतुराज गायकवाड.

मध्यवर्ती करार (महिला)

  • अ श्रेणी (५० लाख) : हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा.

  • ब श्रेणी (३० लाख) : रेणुका सिंग ठाकूर, शफाली वर्मा, रिचा घोष, स्नेह राणा

  • क श्रेणी (१० लाख) : राधा यादव, अमनज्योत कौर, प्रतिका रावल, क्रांती गौड, उमा छेत्री, अरुंधती रेड्डी, श्री चरणी, यास्तिका भाटिया, हरलीन देओल, काश्वी गौतम, जी. कामालिनी, वैष्णवी शर्मा, तेजल हसबनीस.

logo
marathi.freepressjournal.in