ब्रिजटाऊन : भारतीय संघाने शनिवारी रात्री टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद मिळवले. या यशाचा आनंद साजरा करत असतानाच चाहत्यांना काही तारांकित खेळाडूंच्या निवृत्तीचा धक्काही बसला. अनुभवी विराट कोहली, कर्णधार रोहित शर्मा यांच्यानंतर अष्टपैलू रवींद्र जडेजाने रविवारी आंतरराष्ट्रीय टी-२० कारकीर्दीतून निवृत्ती जाहीर केली.
भारताने विश्वचषकाच्या अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेवर अवघ्या ७ धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. तब्बल १७ वर्षांनी भारताने टी-२० विश्वचषक उंचावला, तसेच २०१३नंतर प्रथमच एखाद्या आयसीसी स्पर्धेचे जेतेपद काबिज केले. या वाटचालीत विराट, रोहितसह जडेजाने मोलाचे योगदान दिले. विराट अंतिम लढतीतील सामनावीर ठरला. तर रोहितने भारताकडून स्पर्धेत सर्वाधिक धावा केल्या. मुख्य म्हणजे संपूर्ण स्पर्धेत अपयशी ठरूनही विराटने निर्णायक अंतिम लढतीत झुंजार अर्धशतक साकारले.
विराटने १२५ सामन्यांच्या टी-२० कारकीर्दीत १ शतक व ३८ अर्धशतकांसह ४,१८८ धावा केल्या. तर रोहितने १५९ सामन्यांत ५ शतके व ३२ अर्धशतकांसह ४,२३१ धावा फटकावल्या. जडेजाने ७४ टी-२० लढतींमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना ५४ बळी मिळवले व ५१५ धावा केल्या. या तिघांच्या निवृत्तीमुळे भारतीय टी-२० संघात मोठी पोकळी निर्माण होणार असून राहुल द्रविड यांच्याही प्रशिक्षण कारकीर्दीचा शेवट विश्वविजयाने झाला. आता जुलै महिन्यात गौतम गंभीर भारताचे प्रशिक्षकपद स्वीकारणार असल्याचे समजते.