"टी-२० विश्वचषकात विराट-यशस्वी यांनी सलामीला यावे; रोहितने चौथ्या क्रमांकावर खेळावे"

“आयपीएलमध्ये विराटने सलामीला येत सातत्याने धावा केल्या. सध्याचा फॉर्म बघता तो व यशस्वी सलामीला आले, तर मला मूळीच नवल वाटणार नाही...
"टी-२० विश्वचषकात विराट-यशस्वी यांनी सलामीला यावे; रोहितने चौथ्या क्रमांकावर खेळावे"

आगामी टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताने यशस्वी जैस्वालसह विराट कोहलीला सलामीला पाठवावे. सूर्यकुमार यादवने तिसऱ्या, तर रोहित शर्माने चौथ्या स्थानी फलंदाजी करावी, असे भारताचा माजी क्रिकेटपटू वासिम जाफरने सुचवले आहे. जाफरचा सल्ला पाहून अनेकांच्या भुवया उंचावू शकतात. मात्र त्याने यामागील कारणही स्पष्ट केले आहे.

२ जूनपासून अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे टी-२० विश्वचषक सुरू होईल. रोहितच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ ५ जून रोजी आयर्लंडशी सलामीचा सामना खेळेल. तर ९ जून रोजी भारताची कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी गाठ पडेल. २००७मध्ये पहिल्याच पर्वात टी-२० विश्वचषक उंचावल्यानंतर भारताला जेतेपदाने सातत्याने हुलकावणी दिली आहे. तसेच रोहित व विराट या अनुभवी खेळाडूंच्या कारकीर्दीतील हा अखेरचा टी-२० विश्वचषक ठरू शकतो. त्या पार्श्वभूमीवर जाफरने अमेरिका आणि विंडीजमधील खेळपट्ट्यांचा आढावा व सध्याचा दोघांचा फॉर्म पाहता काही नवे समीकरण सुचवले आहेत. मात्र थेट विश्वचषकात भारतीय संघ हा प्रयोग करण्याची शक्यता कमीच आहे.

“आयपीएलमध्ये विराटने सलामीला येत सातत्याने धावा केल्या. सध्याचा फॉर्म बघता तो व यशस्वी सलामीला आले, तर मला मूळीच नवल वाटणार नाही. रोहित हा मधल्या षटकांत फिरकीपटूंना चांगला खेळू शकतो. तेथील खेळपट्ट्यांनुसार तो मधल्या फळीत उपयोगी ठरेल. त्यामुळे सूर्यकुमार यादव आणि रोहित यांनी गरजेनुसार तिसऱ्या अथवा चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करावी,” असे ४६ वर्षीय जाफर म्हणाला.

विराटने आयपीएलमध्ये बंगळुरूकडून यंदा ऑरेंज कॅप पटकावताना ७४१ धावा पटकावल्या. यामध्ये ५ अर्धशतके तसचे एका शतकाचा समावेश होता. दुसरीकडे यशस्वीने राजस्थानकडून सलामीला येत प्रत्येकी एक शतक व अर्धशतकासह ४३५ धावा केल्या. रोहितने मुंबईकडून यंदा सर्वाधिक ४१७ धावा केल्या. मात्र काही सामन्यांत तो सातत्याने चाचपडताना दिसला. त्यामुळेच जाफरने त्याला मधल्या फळीत खेळवण्याचे सुचवले आहे.

“रोहितच्या कौशल्याविषयी कुणालाच शंका नाही. मात्र संघ हीत साधण्यासाठी तो तिसऱ्या अथवा चौथ्या स्थानी फलंदाजी करू शकतो. विराट जबरदस्त लयीत असल्याने भारताने याचा लाभ उचलला पाहिजे,” असेही जाफरने नमूद केले. त्याशिवाय शिवम दुबेने पाचव्या, ऋषभ पंतने सहाव्या, तर जडेजाने सातव्या स्थानी फलंदाजी करावी, असेही जाफरने सुचवले.

चार फिरकीपटू निर्णायक ठरतील!

रोहितने विचार करूनच १५ खेळाडूंत ४ फिरकीपटूंना स्थान दिले आहे. हे चारही फिरकीपटू भारतासाठी मॅचविनर ठरू शकतात. त्यापैकी युझवेंद्र चहल व रवींद्र जडेजा हे फिरकीपटू सर्व सामने खेळू शकतात. कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांना खेळपट्टी आणि वातावरणानुसार संधी मिळेल, असे जाफरला वाटते. जसप्रीत बुमराच्या साथीने मोहम्मद सिराज दुसरा वेगवान गोलंदाज असेल. हार्दिक पंड्या अथवा दुबे गोलंदाजी करणार नसले, तरच अर्शदीप सिंगला तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून अंतिम ११ खेळाडूंत स्थान मिळेल, असेही आपल्याला वाटत असल्याचे जाफरने स्पष्ट केले.

logo
marathi.freepressjournal.in