
यॉर्कर
ऋषिकेश बामणे
सुनील गावस्कर, कपिल देव, सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंह धोनी यांसारख्या महान खेळाडूंचा वारसा भारतीय क्रिकेटला लाभला आहे. ८०च्या दशकापासून ते एकविसाव्या शतकातील पहिल्या दशकापर्यंत प्रत्येक वेळी कुणी ना कुणी महानायक भारतीय क्रिकेटमध्ये उदयास आला. हा फलंदाज मैदानावर असेपर्यंत आपण सामना गमावू शकत नाही. हा फलंदाज या संघाविरुद्ध कोणत्याही स्थितीत खेळणारच, असे चाहते त्या-त्या काळच्या खेळाडूविषयी हमखास सांगायचे. गेल्या १२ ते १४ वर्षांपासून भारताचा कोहिनूर म्हणजेच विराट कोहली ही जबाबदारी यशस्वीपणे पेलत आहे, असे ठामपणे म्हणू शकतो.
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत रविवारी झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या लढतीपूर्वी विराटच्या कामगिरीविषयी सातत्याने चिंता व्यक्त केली जात होती. विराटचा फॉर्म हरवला आहे. तो पूर्वीसारखा जिद्दीने खेळता दिसत नाही. ऑफ स्टम्पबाहेरील चेंडूवर कोणताही गोलंदाज त्याला बाद करू शकतो. विराटने कसोटी आणि एकदिवसीय प्रकारांतूनही निवृत्ती जाहीर करून फक्त आयपीएलमध्ये खेळावे, असे सल्ले भारताच्या गल्लीबोळात सापडणाऱ्या रथी-महारथींनी आणि क्रिकेटतज्ज्ञांनी दिले. गेल्या काही काळापासून विराटचा धावांसाठी संघर्ष सुरू होता, हे खरे. मात्र यामुळे त्याच्या संघातील स्थानावर प्रश्नचिन्ह उगारणेच चुकीचे होते. अखेर रविवारी विराटने पुन्हा एकदा आपल्या बॅटद्वारेच टीकाकारांची तोंडे बंद केली. त्यातच पाकिस्तान म्हणजे विराटचा आवडता प्रतिस्पर्धी संघ. १११ चेंडूंतील नाबाद १०० धावांच्या खेळीसह विराटने सामनावीर पुरस्कार पटकावतानाच भारताला उपांत्य फेरीत नेण्यात मोलाची भूमिका बजावली.
वयाच्या ३६व्या वर्षीही विराट एखाद्या युवा खेळाडूला लाजवेल, याप्रमाणे मैदानात धावताना दिसतो. पाकिस्तानविरुद्ध १०० धावांमध्ये त्याने फक्त ७ चौकारांसह २८ धावा वसूल केल्या. उर्वरित ७२ धावा या त्याने धावून केलेल्या आहेत, हेच विराटच्या तंदुरुस्तीचा दाखला देते. एकदिवसीय कारकीर्दीतील ५१वे शतक झळकावणाऱ्या विराटने रविवारी चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिलेच शतक साकारले. मुख्य म्हणजे पाकिस्तानविरुद्ध आशिया चषक, चॅम्पियन्स ट्रॉफी, टी-२० विश्वचषक आणि एकदिवसीय विश्वचषक अशा सर्व पातळीवरील स्पर्धांमध्ये किमान एकदा सामनावीर पुरस्कार पटकावणारा विराट हा एकमेव भारतीय. एकदिवसीय प्रकारात सर्वाधिक शतके झळकावणाऱ्यांच्या यादीत विराटने सचिनला कधीच मागे टाकले आहे. आता त्याची आंतरराष्ट्रीय शतके ८२ झाली असून सचिनच्या एकंदर १०० शतकांचा पाठलाग तो यापुढेही करत राहील.
शतक जवळ आल्यावर विराट संथ खेळतो. स्ट्राइक स्वत:कढेच राखतो, असेही काहींचे म्हणणे आहे. मात्र संघाचा विजय पूर्णपणे आवाक्यात आला असेल व अन्य खेळाडूंनी त्यानुसार सहाय्य केले, तरच विराट शतक झळकावण्यास प्राधान्य देतो, हे तितकेच खरे. अखेरीस विराटच्या धावा या संघाच्या धावफलकातच गणल्या जातात. तसेच विराटने धावांचा पाठलाग करताना शतक झळकावले आणि भारताचा पराभव झाला, असे क्वचितच घडताना दिसते. त्यामुळे हक्काचे शतक साकारण्यासाठी त्याने स्वत:जवळ स्ट्राइक राखली, तर त्यात गैर काय? एकेकाळी जसे सचिनच्या शतकामुळे देशभरात आनंद साजरा केला जायचा, तसा आता विराटच्या शतकानंतर केला जातो, असे म्हटले तर वावगं ठरणार नाही.
विराटने दडपणाखाली साकारलेल्या असंख्य खेळींविषयी जितके लिहावे तितके कमीच. २०१४च्या टी-२० विश्वचषकात उपांत्य फेरीत आफ्रिकेविरुद्ध नाबाद ७२ धावा, २०१६च्या टी-२० विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ बाद ५० धावांवरून नाबाद ८२ धावांसह संघाला मिळवून दिलेला विजय. तसेच २०२२च्या टी-२० विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध साकारलेली आणखी एक नाबाद ८२ धावांची संस्मरणीय खेळी आणि हॅरीस रौफला लगावलेला तो षटकार. इतकेच काय, गेल्या वर्षी टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत आफ्रिकेविरुद्ध साकारलेले अर्धशतक. २०२३च्या एकदिवसीय विश्वचषकात सचिनच्या समोरच त्याचा मोडलेला एकदिवसीय शतकांचा विक्रम, यांसारख्या अनेक उदाहरणांमुळे विराट नेहमीच चाहत्यांच्या हृदयात घर करून राहील. आयपीएलमध्ये विराटचा समावेश असलेल्या संघाला अद्याप जेतेपद मिळवता आलेले नाही. मात्र भारतीय संघासह विराटने २०२४मध्ये टी-२०, २०११मध्ये एकदिवसीय व २०१३मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी अशा तीन आयसीसी स्पर्धांच्या जेतेपदाचा मान मिळवला.
तूर्तास, चॅम्पियन्स ट्रॉफीत विराटची बॅट तळपल्याने भारताच्या जेतेपदाच्या आशा आणखी वाढल्या आहेत. टी-२० तून निवृत्त झालेला विराट २०२७च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत खेळेल की नाही, हे सांगता येणार नाही. त्यामुळे कदाचित चॅम्पियन्स ट्रॉफीच विराटच्या कारकीर्दीतील एकदिवसीय प्रकाराची अखेरची आयसीसी स्पर्धा ठरू शकते. त्यामुळे ९ मार्च रोजी विराटच्या हाती पुन्हा एकदा चॅम्पियन्स ट्रॉफी पाहायला मिळावी, हीच इच्छा.