केवळ भारतीय क्रिकेटचाच नव्हे तर जागतिक क्रिकेटचा स्टार फलंदाज विराट कोहलीला (Virat Kohli) नुकताच प्रतिष्ठित 'आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ' (ICC Player Of The Month) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियात सुरु असणाऱ्या टी-20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) मध्ये विराट अप्रतिम खेळी करत असल्याने त्याला या खेळीची पावती मिळाली आहे.
विराटसोबतच विश्वचषकात चांगली कामगिरी करणाऱ्या दोन खेळाडूंनाही नामांकन देण्यात आले असून त्यात झिम्बाब्वेचा सिकंदर रझा आणि दक्षिण आफ्रिकेचा डेव्हिड मिलर यांचा समावेश आहे. भारताकडून अनेक वर्षे क्रिकेट खेळणाऱ्या विराटने काही महिन्यांपूर्वीच कर्णधारपद सोडले. 2019 च्या अखेरीपासून विराट खराब फॉर्ममध्ये होता. 70 शतके ठोकणारा विराट 71 वे शतक करू शकला नाही. पण खूप मेहनत आणि सरावानंतर विराटने अखेर 2022 च्या आशिया कपमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध शतक झळकावले आणि पुन्हा एकदा फॉर्ममध्ये परतला. भारताने विश्वचषक स्पर्धेत पाच सामने खेळले असून यातील तीन सामन्यांत विराटने अर्धशतक झळकावून नाबाद राहिला आहे. त्यामुळे भारताच्या विजयात विराट सिंहाचा वाटा उचलताना दिसत आहे. क्रिकेटमध्ये उत्साह वाढावा यासाठी ICC द्वारे महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार सुरू करण्यात आला. हा पुरस्कार दर महिन्याला दिला जातो.