सचिनचा शतकांचा विक्रम मोडणे विराटला अजूनही शक्य -पाँटिंग

कोहलीने दोन आठवड्यांपूर्वीच आशिया चषकातील अफगाणिस्तानविरुद्धच्या अखेरच्या लढतीत शतकदुष्काळ संपुष्टात आणला.
सचिनचा शतकांचा विक्रम मोडणे विराटला अजूनही शक्य -पाँटिंग
Published on

कारकीर्दीतील ७१वे शतक झळकावण्यासाठी जवळपास तीन वर्षांचा कालावधी लागला असला तरी विराट कोहली अजूनही सचिन तेंडुलकरचा १०० आंतरराष्ट्रीय शतकांचा विक्रम मोडू शकतो, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने व्यक्त केले आहे.

कोहलीने दोन आठवड्यांपूर्वीच आशिया चषकातील अफगाणिस्तानविरुद्धच्या अखेरच्या लढतीत शतकदुष्काळ संपुष्टात आणला. “विराटला कमी लेखण्याची चूक मी कधीच करणार नाही. त्याला आता लय सापडली असून यापूर्वीही तो फॉर्मात असताना कोणता पराक्रम करू शकतो, हे आपण पाहिले आहे. त्यामुळे विराटमध्ये १०० शतकांच्या विक्रमाला मागे टाकण्याची क्षमता अजूनही आहे,” असे पाँटिंग म्हणाला. सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतक झळकावणाऱ्यांच्या यादीत कोहली सध्या पाँटिंगसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

“विराटला अद्याप २९ शतके झळकावण्यासाठी किमान ५-६ वर्षे तरी खेळावे लागेल. तसेच वर्षभरात ५ कसोटी, २-३ एकदिवसीय प्रकारांतील शतके झळकावल्यास त्याला हे लक्ष्य साध्य करणे शक्य होईल. सचिननेसुद्धा वयाच्या चाळिशीपर्यंत तंदुरुस्ती टिकवून ठेवली होती. विराटसमोर सर्वात मोठे आव्हान तेच असेल,” असेही ४७ वर्षीय पाँटिंगने सांगितले.

... तर विराटला सलामीलाच पाठवावे!

सलामीला फलंदाजीस आल्यामुळे विराट कोहली सातत्याने धावा करून शतके झळकावणार असेल, तर ट्वेन्टी-२० विश्वचषकातही त्याला सलामीलाच पाठवावे, असे गमतीदार मत पाँटिंगने मांडले. “भारतीय संघाच्या व्यूहरचनेविषयी मी अधिक बोलणे चुकीचे ठरेल; मात्र कोहलीसारख्या फलंदाजांला अधिकाधिक चेंडू खेळायला मिळावे, असे तुम्हाला वाटणे स्वाभाविक आहे. तसेच जर ट्वेन्टी-२० सामन्यात सलामीला येऊन तो शतके झळकावणार असेल, तर त्याला सातत्याने संधी देण्यास काय हरकत आहे,” असेही पाँटिंगने नमूद केले.

logo
marathi.freepressjournal.in