विराट सुसाट

सुपर-१२ फेरीत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात नियमांचे भान राखत कोहलीने जी समयसूचकता दाखविली
विराट सुसाट

क्रिकेट हा खेळ केवळ रांगडेबाजपणाने खेळण्याचा खेळ नाही; तर डोकेबाजपणाने खेळण्याचा, मुत्सद्दीपणाने लढण्याचा एक शिस्तबद्ध क्रीडाप्रकार आहे, हे सध्या ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-२० क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत भारताचा अव्वल क्रिकेटपटू विराट कोहलीने अवघ्या जगाला दाखवून दिले आहे, खरोखरच. सुपर-१२ फेरीत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात नियमांचे भान राखत कोहलीने जी समयसूचकता दाखविली, ती त्यानेच लगावलेल्या षटकारांपेक्षाही उत्तुंग अशीच आहे, खचितच.

विजयासाठी लक्ष्याचा पाठलाग करताना डावाला आकार देण्याची उत्कट जिद्द, खेळपट्टीवर ठाण मांडून उभे राहण्याचा मनोनिग्रह, सहकाऱ्यांना धीर देण्याचे कर्तव्य आणि अटीतटीच्या क्षणी डगमगून न जाता विजयी होण्याचा दुर्दम्य आत्मविश्वास हे कोहलीत एकवटलेले सारेच गुण कसे अफलातून अन्ा‌् अनुपम! नेमके हेच गुण असलेला धीरोदात्त क्रिकेटपटू शेवटच्या षटकासाठी पाकिस्तानच्या संघात नसल्यानेच त्यांना झिम्बाब्वेकडून अवघ्या एक धावेने नामुष्कीचा पराभव पत्करावा लागला, हेही तितकेच खरे.

पाकिस्तानविरुध्दच्या सामन्यात ४ बाद ३१ अशी डावाची धडकी भरवणारी झालेली भारताची भीषण अवस्था केवळ कोहलीमुळेच सावरली गेली. शेवटच्या निर्णायक षटकात तर त्याने कमाल केली. एखादा फलंदाज फ्री हिटवर बाद झाला, तरीही तो धावांसाठी पळू शकतो, असे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) नियमावलीत नमूद असल्याचे भान राखत कोहलीने फ्री हिटवर त्रिफळाचीत होताच समसूचकता दाखवून तीन धावा पळून काढल्यानेच भारताचा पाकिस्तानवरील विजय सुकर झाला. चेंडू कमरेच्या उंचीपर्यंत आल्याचे लक्षात येताच पंचांकडे नो-बॉलचे अपील करण्याचे कोहलीचे प्रसंगावधानही कौतुकास्पदच!

टी-२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ५३ चेंडूंत नाबाद ८२ धावांची विजय मिळवून देणारी खेळी केल्यानंतर नेदरलँड‌्सविरुद्धच्या सामन्यात कोहलीने ४४ चेंडूंत ६२ धावा केल्या. ‘हौसला न छोड, कर सामना जहां का..’ अशाच ईर्षेने पेटून कोहलीची द बर्निंग ट्रेन बुलेटच्या वेगाने अशी काही सुसाट सुटली की जलदगतीने धावा काढण्याचे ख्रिस गेलचे ‘रेकॉर्ड स्टेशन’ मागे टाकून चक्क पुढे निघून गेली. देशाला विश्वचषक मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलून टीकाकारांची जिरविण्यासाठी विराट किती सुसाट बनला आहे, याचीच यावरून प्रचिती यावी, हमखास. नेदरलँड‌्सविरुद्धच्या सामन्यात सामनावीर म्हणून ५१ धावा करणाऱ्या सूर्यकुमार यादवला गौरविण्यात आलेले असले, तरी त्यामुळे रोहित शर्माप्रमाणेच (३९ चेंडूंत ५३ धावा) कोहलीने केलेल्या नाबाद ६२ धावांचे मोल कमी होत नाही. कोहलीने जास्त धावा करूनही सूर्यकुमारला सामनावीर हा पुरस्कार देण्यात आला, यात तसे वावगे काही नाही. त्यामुळे कोहलीच्या चाहत्यांनी निराश होण्याचे कारण नाही. खुद्द कोहलीसुद्धा नाराज झाला नसेल. कारण त्याला नियमांची जाणीव आहे, हे आता काय सांगायला हवे?

कोहलीने नेदरलँड‌्सविरुद्धच्या या सामन्यात भारताच्या डावाचा भक्कम पाया रचला. सुरुवातीला त्याने रोहित शर्माबरोबर दमदार भागीदारी रचली. त्यानंतर त्याने सूर्यकुमारबरोबरही अभेद्य भागीदारी उभारली. त्याने एक अप्रतिम झेलही टिपला. त्यामुळे कोहली तसा सामनावीर पुरस्काराचा दावेदार होता; पण निवडकर्त्यांना नियमांच्या चौकटीत सूर्यकुमार अधिक भावला. सामनावीर पुरस्कार कोणाला द्यायचा, याचा निर्णय विविध देशांतील माजी खेळाडू घेतात. काही माजी खेळाडू हे समालोचन करत असताना ते पूर्ण सामना पाहत असतील, असे मानले जाते आणि म्हणूनच त्यांना सामन्याचे सारे सार माहित असते, असे गृहित धरले जाते. त्यांच्याकडे आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या अनुभवाची शिदोरी असल्याने कसोटीच्या क्षणी भाकरी करपू न देता पद्धतशीरपणे कोणी फिरविली, याची जाण त्यांना असते. त्यामुळेच या माजी खेळाडूंकडून सामनावीर पुरस्काराचा मानकरी हा निर्धारित निकषांच्या कसोट्यांवर तावून सुलाखून घेत निवडला जातो. ज्या खेळाडूने सामन्यात सर्वात जास्त प्रभाव पाडला त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात यावा, असा नियम आहे. यासाठी धावा किंवा विकेट्स यांची संख्या महत्वाची नसते. सामन्यात खेळाडूचा एकंदरीत प्रभाव विचारात घ्यायचा असतो. कोहलीने या सामन्यात ४४ चेंडूंत नाबाद ६२ धावा केल्या. त्याचा स्ट्राइक रेट हा १४०.९० एवढा झाला. सूर्यकुमारने फक्त २५ चेंडूंत ५१ धावांची खेळी साकारली. त्यामुळे त्याचा स्ट्राइक रेट हा २०४.०० झाला. भारताची धावगती वाढविण्याच्या प्रक्रियेत कोहलीच्या बॅटपेक्षा सूर्यकुमारची बॅट किंचित अधिक सरस ठरली. अर्थात कोहलीचीही खेळी महत्वपूर्ण होती, हे त्याचे तथाकथित टीकाकारही नाकारणार नाहीत. पुरस्काराचा टिळा भाळी लागला नाही म्हणून का कधी कर्तृत्व झाकोळले जाते?

नेदरलँडच्या सामन्यात सूर्यकुमार कोहलीपेक्षा अधिक आक्रमकपणे फटकेबाजी करत वेगाने धावा करत असताना एक बाजू संयम आणि आक्रमण यांचा ताळमेळ साधत सुरक्षित राखण्याचा मुत्सद्दी पवित्रा कोहलीने घेतला. त्यामुळेच सूर्यकुमारलाही मनसोक्त तळपता आले आणि सामनावीर पुरस्काराचा मानकरीही होता आले. कोहली आणि सूर्यकुमार यांच्या बहारदार फलंदाजीच्या जोरावर भारताने नेदरलँडवर ५६ धावांनी विजय मिळवत टी-२० विश्चचषक स्पर्धेत दमदार आगेकूच केली. कोहलीने या सामन्यात नेदरलँड‌्सच्या फ्रेड क्लासेनला ‘एक्स्ट्रा कव्हर’ क्षेत्रात असा काही शानदार षटकार लगावला, की प्रेक्षकच नव्हे; तर स्वतः कोहलीही अचंबित झाला. त्याचा साथीदार सूर्यकुमारनेही दाद देऊन कोहलीचे कौतुक केले.

अचूक टायमिंग, चपळ पदलालित्य साधत कोहलीने मारलेल्या या षटकारानंतर स्टेडियमधील उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणेच फिटले असणार. क्रिकेटप्रेमींनी एवढा जल्लोष केला की आसमंत दुमदुमून गेला. ‘बदल रहा हैं देख, रंग आसमान का...’ असेच संकेत या षटकाराने दिले असणार, बहुधा. ‘तूने ही सजाये है, मेरे होठों पे ये गीत...’ अशीच चाहत्यांचीही भावना झाली असणार. कोणत्याही पुरस्काराशी तुलना होऊ शकणार नाही, असेच हे चाहत्यांचे प्रेम. हा षटकार एका महान फलंदाजाचा दर्जा सिद्ध करून गेला, निःसंशय!

आशिया चषकात सर्वात अधिक धावा काढण्याचा विराट विक्रम केल्यापासून कोहलीला स्फुरण चढले आहे, जणू. त्याची बॅट युद्धात पराक्रम गाजविणाऱ्या शूरवीरांच्या धारधार तलवारीप्रमाणे प्रतिस्पर्धी खेळाडूंची गोलंदाजी वैविध्यपूर्ण फटक्यांचे सपासप वार करून अक्षरशः कापूनच काढत आहे, म्हणा ना! मागील तीन वर्षांत कोहलीकडून अपेक्षित कामगिरी झाली नव्हती. त्यामुळे त्याच्या निवृत्तीच्या कंड्याही सोशल मीडियावर पिकविण्यात आल्या होत्या. टीकाकारांचे कोहली लक्ष्य नव्हे, तर भक्ष्य ठरला होता. आता जिगरबाज कोहलीने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्यात चमकदार कामगिरी करून टीकाकारांनी फुगविलेल्या फुग्यातील हवाच काढून घेतली आहे.

भारताला सामने जिंकून देण्यात मोलाची कामगिरी बजावत असताना कोहली अनेकविध विक्रमांची उभारणीही करीत आहे. नेदरलँड‌्सविरुद्ध १४०.९१च्या स्ट्राइक रेटने केलेल्या खेळीमुळे कोहलीने वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलचा विक्रम मोडला. टी-२० वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो आता दुसऱ्या स्थानावर पोहोचला. वर्ल्डकपमध्ये १ हजार धावा करण्यास त्याला आता फक्त ११ धावांची गरज आहे. अशी कामगिरी आतापर्यंत फक्त महेला जयवर्धनने केली आहे. त्याने ३१ सामन्यांत १ हजार १६ धावा केल्या आहेत. जयवर्धनेला मागे टाकण्यासाठी विराटला आता २७ धावांची गरज आहे.

कोहलीने टी-२० विश्वचषकात आतापर्यंतच्या कारकीर्दीमध्ये ९८९ धावा काढल्या आहेत. यादरम्यान त्याची फलंदाजीची सरासरी ८९.९० आणि स्ट्राइक रेट १३२.०४ अशी आहे. आतापर्यंत खेळलेल्या २१ डावांमध्ये विराटने १२ अर्धशतके झळकाविली आहेत. टी-२० वर्ल्डकपच्या इतिहासात सरासरीच्या बाबत पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान ५७च्या सरासरीसह दुसऱ्या, मायकल हसी ५४.६च्या सरासरीसह तिसऱ्या, बाबर आझम ५०.५ च्या सरासरीने चौथ्या, तर श्रीलंकेचा चरिथ असलंका ४७.३ च्या सरासरीसह पाचव्या क्रमांकावर आहे.

कोहलीला तर थेट सर डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमाला मोडण्याची नामी संधी आहे. कोहली पुढील काही सामन्यांत अशाच प्रकारे नाबाद होत खेळत राहिला तर क्रिकेटमधील या सर्वात छोट्या प्रकारात त्याची सरासरी ही कसोटी क्रिकेटमधील ब्रॅडमन यांच्या सरासरीपेक्षा अधिक होईल. तेव्हा सरसर, सरसर कोहलीने सर डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमाला सर करावे, हीच सदिच्छा. कसोटी क्रिकेटमध्ये सर डॉन ब्रॅडमन यांची सरासरी ९९.९४ इतकी आहे. जागतिक क्रिकेटमधील कोणत्याही स्तरावरील आणि फॉर्मेटमध्ये ब्रॅडमन यांची ही सारासरी अद्यापही सर्वश्रेष्ठ आहे, हे विशेष. कोहलीचे अनेकविध विक्रम असेच होत राहिले, तर भारतालाही आपसूकच विजय मिळत राहतील. ‘जीत जायेंगे हम, तू अगर संग हैं...’ अशीच त्याचे सहकारी आणि चाहते यांची मनोभावना असणार आहे. टी-२० विश्वचषकावर नाव कोरायचे, तर कोहलीचा आत्मविश्वास यापुढेही असाच बहरत राहणे जरुरीचे आहे. ‘गम नहीं जब तलक दिल में ये उमंग हैं...’ असा निर्धार आवश्यक आहे. कोहलीने टीकाकारांच्या विश्लेषणातील हवा काढून घेतली आहे; पण ही हवा आता आपल्याच डोक्यात जाऊ न देण्याची खबरदारीही कोहलीने घेतली पाहिजे आणि सातत्यपूर्ण कामगिरीकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे, निश्चितच.

yashodattpatekar@gmail.com

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in