विराटची माघार भारतासाठीच नव्हे, तर संपूर्ण मालिकेच्या दृष्टीने घातक! इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू नासीर हुसैनचे मत

३५ वर्षीय विराटने इंग्लंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांतून माघार घेतली होती.
विराटची माघार भारतासाठीच नव्हे, तर संपूर्ण मालिकेच्या दृष्टीने घातक! इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू नासीर हुसैनचे मत

चेन्नई : विराट कोहलीसारख्या तारांकित फलंदाजाशिवाय ३ ते ४ कसोटी सामने खेळणे भारतीय संघासाठी नक्कीच घातक ठरू शकते. मात्र यामुळे फक्त भारतालाच नव्हे तर संपूर्ण मालिकेला किंबहुना क्रिकेटला मोठा फटका बसेल, असे मत इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू नासीर हुसैनने व्यक्त केले.

३५ वर्षीय विराटने इंग्लंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांतून माघार घेतली होती. सध्या उभय संघांतील कसोटी मालिका १-१ अशा बरोबरीवर असून १५ फेब्रुवारीपासून तिसरी कसोटी खेळवण्यात येईल. या कसोटीसाठी विराट संघात परतेल, असे अपेक्षित होते. मात्र विराट आता तिसऱ्या व चौथ्या कसोटीलाही मुकणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच तो मार्चमध्ये धरमशाला येथे होणाऱ्या पाचव्या कसोटीतही खेळण्याची शक्यता कमीच आहे. अशा स्थितीत भारतीय संघाला चौथ्या क्रमांकावर पर्यायांची चाचपणी करावीच लागणार आहे.

“विराट आणखी दोन कसोटींना मुकणार असल्याचे मला समजले. हे खरे असेल तर भारतीय संघाला नक्कीच मोठा फटका बसू शकतो. मात्र कसोटी मालिकेच्या तसेच क्रिकेटच्या दृष्टीने हे निराशाजनक आहे. विराट हा क्रिकेटचा चेहरा म्हणून उदयास आला आहे. त्याच्या अनुपस्थितीत चाहते स्टेडियमकडे कमी वळतील. त्यामुळे सर्वांसाठीच हा एक झटका आहे,” असे हुसैन म्हणाला.

कुटुंबाला प्राधान्य देण्याच्या विराटच्या निर्णयाचा आपल्याला आदर असून चाहत्यांनीही याविषयी अफवा पसरवू नये. तसेच विराटच्या जागी तिसऱ्या कसोटीत के. एल. राहुल तंदुरुस्त असल्यास त्यालाच खेळवण्यात यावे, असेही हुसैनने सुचवले.

logo
marathi.freepressjournal.in